जीवन एक संघर्ष - रफिक मन्यार


🍂⚜🎯🍂⚜🎯🍂⚜🎯🍂⚜

🍂 प्रेरणा एक सुवर्णपान - 10🍂

जीवन एक संघर्ष - रफिक मन्यार

     लहानपणापासूनच पोलिओग्रस्त असल्यामुळे दोन्हीही पायांनी दिव्यांगत्व आले होते.आम्ही पाच भावंडं.चार भाऊ अन् एक बहीण.लहानपणापासून दिव्यांग आल्यामुळे आई वडीलांसह सर्वांना चिंता होती.'याचं भविष्यात कसे होईल?'.

        गावाच्या प्लॉटमध्ये आम्ही रहायला.गावातला नवा भाग पण मजूरांचा भाग.गरिबी घरात अन् गल्लीतही डोळ्यासमोरच होती.बालवाडी घरीच घरातल्यांसोबतच झाली.पुढे शिक्षणासाठी गावातल्या प्राथमिक शाळेत ॲडमिशन झाले.मोठे भाऊ,वडील, काका पाठीवर घेऊन शाळेत घेऊन जायचे. श्री.ठाकरे गुरूजी मला गुरू म्हणून लाभले.गुरूजींच्या तालीममध्ये शिकलो त्यामुळे घडत गेलो.लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला भाषण देऊ लागलो अन् 15 अॉगस्टला बक्षीस मिळवू लागलो. गुरूजी मुद्दामच मला पुन्हा गावकरींसमोर भाषण देण्यास सांगायचे.सरपंच,सदस्य,ग्रामस्थ खुश व्हायचे अन् योग्य ते बक्षीस देत असे.शाळेत अन् गावात कौतुकाचा  विषय बनलो.लोकांचं सहज बोलणं आठवतं,"करीमदादाना पोरगा हुशार शे,मानणं पडी तेले." हुशार म्हणून प्राथमिक शाळेत ठाकरे गुरूजींनी ट्युशन फी घेतलीच नाही.गुरूजींचा खूप ऋणी आहे आजही.

        माझे माध्यमिक शिक्षण गावातच झाले.जीवनाला कलाटणी देणारा हा काळ असतो.अन् येथेच आयुष्याला कलाटणी मिळाली.प्रवास सुरूच होता.सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखे पायी चालत चालत शाळेत जाता येत नव्हते.भावांसोबतच वेळेवर शाळेत जात होतो.कधीकधी भाऊ रोजंदारीनं कामाला गेले,कि जीव शाळेत जाण्यासाठी टांगणीला लागायचा.ढसाढसा रडूही यायचे.गल्लीतून मुलं शाळेत जाऊ लागल्यावर पोटात गोळा येई.अन् वाटायचे आपणही चालत जावे.नशीबात नव्हते.याच काळात प्रवीण मित्र झाला.5 वी ते 7 वीपर्यंत प्रवीणने मला पाठीवर तर कधी सायकलीवर शाळेत पोहोचविले.माझा जीवाभावाचा सवंगडी झाला प्रवीण.इयत्ता सातवीत असतांना आर.सी.बाफना फाऊंडेशन यांच्याकडून सायकल भेट मिळाली.खूप आनंद झाला.पुन्हा सोबती मिळाला हक्काचा.आता मी एकटाच शाळेत जाण्याची तयारी करीत असे.पण भाऊ,प्रवीण,शाळेतील मित्र खड्ड्यातील अडकलेली सायकल बाहेर काढण्यासाठी पाठीमागे असायचेच.वडीलांचे निधन झाल्यावर आईवर कुटुंबातील सर्वांची जबाबदारी आली.काकांनिही सोबत सोडली नव्हती.एका छोट्या घरातच राहत होतो सर्वजण.घरातले सर्वजण सुट्टीच्या दिवशी कामाला जायचे अन् प्लॉट पूर्णपणे खायला उठायचा.लहान भावंड काम करतात म्हणून मीही काम शोधू लागलो पण मला काम कसे मिळणार होते.मी ठरवले,की सायकल पंक्चर दुकान काढायचे.बस सुरू झाला दररोजचा प्रवास.सकाळी आठ ते दहा अन् संध्याकाळी पाच ते सात असे चार तास दुकान चालवायचे. स्वतःला कमवा आणि शिकाचं महत्त्व पटवून देत होतो.सर्वांना कौतुक वाटायचे.भावंडासह प्रवास सुरु होता दहावीपर्यंत.या कमाईतून आमच्या वह्या,पेन,पुस्तके व्हायची.8 वी ते 10 वी ट्युशन अरुण पाटील सरांकडे लावली होती.सरांनी तिघंही वर्षे फी घेतलीच नाही.अभ्यास,काम चालूच होते.

        दहावीचं वर्ष आयुष्याला खूप मोठा संदेश देऊन गेला.शाळेत टॉप तीनमध्ये असायचो.भाषणात अन् वत्कृत्वातही बक्षीस ठरलेले असायचे.श्री.एन.आर.आबा मुख्याध्यापक असतांना त्यांनी 15 अॉगस्टलाच शाळेचे संचालक मंडळ अन् गावातील ग्रामस्थ,शिक्षक,विद्यार्थ्यांसमोर "रफिकने जर यावर्षी पहिला क्रमांक पटकावला,तर त्याचा पुढील सर्व शिक्षणाचा  खर्च आम्ही सर्व शिक्षक करू" असे सांगितले.खूप आनंद झाला होता.पुन्हा शिकायला भेटणार होते.खर्च वाचणार होता.कुटुंबाचं ओझं हलके होणार होते.दिवसाचे नियोजन करून अभ्यास करत होतो.क्रमांक डोक्यात नव्हताच फक्त चांगल्या गुणांनी पास व्हायचं ठरवलं होतं.परीक्षा झाली.नियमित प्रवास  सुरू होता.चर्चा रंगलीच होती.पण पायाखालची जमीन सरकली होती.स्वप्नांचे मजले ढासळले होते.सारा केलेला अभ्यास डोळ्यासमोर येत होता.ज्या विषयाची भिती होती त्यानंच घात केला होता.सारं स्वप्न धुळीस मिळाल्यागत झालं होतं.नापास झालो होतो.दुःखाच्या खाईत माझ्यासकट माझं कुटुंबही गेलं.आता याचं भविष्यात कसे होईल.सारे प्रश्नच डोळ्यांसमोर.गावात पहिला क्रमांक ज्या मित्राला भेटला,पास जे झाले त्यांची चर्चा तर होतीच पण रफीक नापास झाला यावर कोणाचाच विश्वास बसेना.मित्र भेटायला येत होते.तो दिवस जीवनाचा 'निकाल' लावून गेला असे वाटायचे.पुढे पुन्हा आपले काम सुरूच ठेवले. *'रफिक पंक्चर दुकान'*.तोच आधार होता.पुढे तीन वेळा गणित पेपर दिला पण नियतीला हे मान्य नव्हते,माझा अभ्यास कमी पडला होता.कोणीही या परिस्थितीला कारणीभूत नव्हतं.मी स्वतःच होतो.दिवसामागून दिवस जात राहिले.मित्रांचे उच्च माध्यमिक शिक्षण होत आले होते.मी पूर्णपणे शैक्षणिकदृष्ट्या थांबलो होतो.

       अचानक एके दिवशी पोस्टमन समाज कल्याण विभागातून आलेलं पत्र देऊन गेला.पत्र वाचताच पुन्हा शिकण्याची आशा पूर्ण होणार होती.सिल्लोड आयटीआयमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कोर्स 2 वर्षे कालावधीचा करावयाचा होता.तेही दहावी नापास अन् आठवी पास विद्यार्थी.पुन्हा आशा पल्लवित झाल्या.आईनं खूप धीर दिला.तिचे शब्द ऊर्जा भरून गेलेत."बेटा,तू जा के देख वहा। मैं कुछ भी करूंगी लेकीन तुझे पढाऊंगी। तू धीर मत छोड। तेरे भाई भी है मेरे साथ"| आईनं फीचे पैसे उसनवारी करत दिले अन् मला पाठविले.'स्वतःच्या पायावर तू कमवता हो,तूला नोकरी नाही मिळाली तरी चालेल पण तुझ्या हातात कौशल्य येईल', हा तिचा दृष्टिकोन जीवनच बदलवून गेला.आयटीआय सिल्लोडला केला.स्वतःच्या हिमतीवर करायचा अन् जगायचाही असे ठरविले.पूर्णपणे झोकून दिले अन् तिथे क्रमांकही पटकावला.औरंगाबादला निरोप समारंभ झाला तिथेच प्रमाणपत्र,1 हजार रूपये अन् इलेक्ट्रॉनिक्स साहित्य मिळाले.इलेक्ट्रॉनिक्स हेच जीवन झालं होतं.

      हाती कौशल्य आले होते.आता कंपनीत जावे की घरीच छोटेसे दुकान करावे हे ठरवत होतो.शेवटी गावीच दुकान टाकावे असे ठरवले.भांडवल नव्हते.घराचा सर्व कारभार मजूरीवर चालत होता.त्यात मला पैसे मिळणारच नव्हते.प्रॕक्टीस असावी यासाठी मी दररोज पाचोरा येथे सायकलीवर दहा कि.मी.वर्मा इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडे दोन महिने काम केले.दररोज तीन पायी सायकल चालवून,रस्त्यावर थांबून डोक्यावर तळपता सूर्य घेऊन जीवनाचा संघर्ष जगत होतो.हार मानणार नव्हतो.हाच प्रवास मनाला बळकटी देत गेला.पुढे घरातच छोटंस दुकान थाटलं.पुठ्यावर लिहून जाहिरात करू लागलो.मित्रपरिवारास सांगायला लागलो.भावांनिही आपल्यापरिने जाहिरात केली.अन् घरातच दुकान चालवू लागलो.आईला मदत होत होती.पुढे समाजकल्याणमार्फतच 25 हजाराचे कर्ज काढले स्वहिमतीवर अन् दुकान टाकले.स्वतःच्या दुकानावर उदरनिर्वाह होत होता.जबाबदाऱ्या पार पाडीत होतो.

      लग्नाचे वय झाले होते.मुलगी कोण देणार?,कुटुंब शोधातच होते.अन् 'आबेदा' ही सहचरिणी लाभली.दोघं पायांनी मी दिव्यांग असतांना तिच्या वडिलांनी म्हणजेच सासऱ्यांनी खूप विश्वास ठेवला ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी.कुटुंबासह मलाही खूप आनंद झाला.चारचौघांसारखे आयुष्य जगता येणार होते.आबेदा खूप प्रोत्साहन देते.पाठीमागे उभी राहते.दोन चिमुकली मुलं आहेत.हम दो,हम हमारे दो। माझी आई वडील,पत्नी,भावंडे,काका-काकू,नातेवाईक,सर्व जीवनात लाभालेले मित्र,शिक्षक,माझं गाव यांचा मी सदैव ऋणी राहीन.

     दोस्तहो,जगणंच विसरलो होतो लहानपणी तुम्हांला पाहतांना.घरात अठराविश्व दारिद्रय होते.मजूरी करतच जीवन जगणारे माझे कुटुंब.मित्रांसोबत कधीच क्रिकेट खेळता आले नाही की सुरपारंब्या,विटी टोलविता आली नाही,भोवरा आणता आला नाही.जागेवरून गोटी टोलवत होतो,पण वेळ लागतो म्हणून गंमतच पाहण्यात धन्यता मानत होतो.मित्र ही खूप मोठी संपत्ती आपली.गुरूजनांचा नेहमी आदर करा.माझ्या गुरूजनांच्या प्रोत्साहनामुळेच मला काहीतरी मिळवता आले.जीवनात आलेला क्षण जगा.सामान्य जीवन वाटेला आले नाही म्हणून दुःख अजिबात नाही पण गावातील रिकाम्या हातांनी फिरणारी तरुणांची टोळी पाहून वाटते,की आपल्यात लपलेला वॉचमन शोधा.प्रत्येकात काहीना काही दडलेले असते.परिस्थितीचा बागुलबुवा न करता सामोरं जा,संकटांना झेला,वेळ जाऊ द्या.शांत अन् प्रामाणिक प्रयत्न करत अभ्यास करा.स्वतःच्या पायावर उभे राहत नवा आदर्श निर्माण करा.अपयशही स्विकारा.स्वतःला सिद्ध करतांना धाप लागतेच पण थांबायचे नाही.चालतच रहायचंय.जीवन संघर्ष चालूच राहणार सामोरं जाऊ या...!

शेवटी एवढंच सांगू इच्छितो...

असफलता एक चुनौती है, स्वीकार करो
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम
संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम
कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

📝
रफिक करीम मन्यार
रफिक इलेक्ट्रॉनिक्स
लोहटार ता.पाचोरा जि.जळगाव
9960471739

खालील लिंकला क्लीक करून video पाहता येईल.

जीवन एक संघर्ष

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

No comments:

Post a Comment