परिस्थिती हीच शक्ती - विजय शिंपी


♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮
प्रेरणा एक सुवर्णपान -4⚜ 

परिस्थिती हीच शक्ती - विजय शिंपी

मित्रहो,
सप्रेम नमस्कार,

  माझा प्रवास थोडा वेगळा आहे. मी एका गरीब कुटुंबात जन्माला आलो.माझ्या कुटुंबात मी सर्वात लहान होतो. चार मोठया बहिणी आणि पाचवा मी असे एकूण सात जणांचे कुटुंब. वडील कपडे विकण्याचा व्यवसाय करायचे आणि आई शिवणकाम.सगळं अगदी आनंदात चालले होते,पण एकेदिवशी आई अचानक सोडून गेली आणि पूर्ण परीवारावर जणू आभाळ कोसळले तेव्हा मी फक्त पाच वर्षांचा होतो.वडील थोडे खचले.परंतू धीर सोडला नाही, अशा परीस्थितीत वडीलच आई बनले.

  आईशिवाय कुटुंब कसे जगते ही एक गोष्ट आयुष्यात भरपूर काही शिकवून गेली.चार बहिणींचे लग्न कसे होणार? परिस्थिती जेमतेमच. शिक्षणाची काही काळजी करण्याची आवश्यकता नव्हती कारण गावात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा होती.अशा परिस्थितीत मी इ.1लीत असताना मोठया बहीणीचे लग्न झाले.मात्र आता घरची परीस्थिती खालावली होती. इ.2रीत असताना दुसऱ्या बहीणीचे लग्न झाले.पण मात्र आता घरची परिस्थिती फारच खालावली होती. हे सगळे आता मला कळायला लागले होते. वडील नेहमी प्रेरणा देत, बाळा तु चांगला अभ्यास कर आणि काहीतरी बनून दाखव. त्यादृष्टीने मी पण प्रयत्न सुरु केले. कारण परिस्थिती डोळयासमोर होती. परिणाम पण दिसू लागले. कारण इ.4थीत असताना मी दुसरा क्रमांक पटकावला होता. आनंद भरपूर झाला. पण दु:खही झाले. कारण फक्त दोन गुण कमी पडल्याने मी दुसरा..शाळेतली स्पर्धा अन् परिस्थितीशी दररोज होणारी स्पर्धा यात कायमच जगत होतो.शालेय जीवनातील शिक्षक अन् मित्र खूप शिकवत होते.मित्रांच्या आईमध्येच आई शोधत होतो.थोडं कौतुक अन् हक्क गाजवणारं आई नावाचं बेट नव्हतं याचं दुःखही होतं..

  आता मात्र शर्यत सुरु झाली होती. काहीतरी वेगळे करण्याची जिद्द सुरु झाली आणि आता माध्यमिक शाळेत प्रवेश झाला होता.तिकडे वडीलांचाही व्यवसाय आता बऱ्यापैकी सुरु होता,पण नियतीला हे बघवले नाही आणि एक रात्र ही आमच्यासाठी काळरात्र ठरली. सगळयात लहान बहीण सोडून गेली त्यामुळे गाव सुध्दा सोडावे लागले.आता मात्र माझाही धीर सुटत चालला होता.दोन महिन्यांनी वार्षिक परीक्षा होती इ.5वीची. आता असे वाटायला लागले होते की, देवाने एवढे वाईट दिवस मलाच दाखवायचे होते? पण का? मला सावरत मी धीटपणे परीस्थितीचा सामना केला आणि गावी येऊन इ.5वीची परीक्षा दिली आणि निकाल आला.या सगळया गोष्टींचा परिणाम स्वरुप मी 5वा क्रमांक पटकावला.पहिला येण्याची अपेक्षा करणारा आता घसरला.परिस्थिती खूप शिकवून जाते काही क्षण जीवन बदलायला पुरेसे असतात.. आणि त्यात इ.6वीला शाळा सोडून नगरदेवळा येथे प्रवेश घ्यावा लागला. इच्छा नसूनही हे सगळे आता परीस्थितीनुरुप करावे लागले होते.आजही अश्रु डोळयात भरुन येतात कारण शिक्षकांची आणि मित्रांची साथ आता सुटली होती.नवीन जागा, नवीन लोकांशी संपर्क आणि त्यातून अभ्यासावर लक्ष हे माझ्यासाठी एकाकी लढाई लढल्यासारखे झाले आणि त्याच वर्षी अजून काही नियतीला दाखवायचे होते ते म्हणजे 3 नंबरच्या बहीणीची सासरी हत्या. आता मात्र मी आणि वडील एकटे पडलो. आणि आता असे  वाटायला लागले की, जगायचे तरी कशाला? आणि कोणासाठी? लहान वयात या सगळया गोष्टी घडतच चालल्या होत्या. आता वडीलांचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला होता.शेवटी तो दिवस आला आणि आम्ही दोघे परत गावी रहायला गेलो.खूप काही कळत नसतांनासुद्धा गरिबीचे सामाजिक चटके लहान वयातच अनुभवत होतो.गावी आल्याने खूप आनंद झाला. एवढया पहाडासारख्या दु:खात कुठेतरी परत आशेची किरणं दिसू लागली. कारण तेच शिक्षक आणि जीवाभावाचे मित्र आता परत भेटले होते. आणि माझा प्रवेश आता परत शाळेत इ.7वीत झाला होता.

 मित्रांनो, 7वी ते 10वी पर्यंतचा प्रवास हा आयुष्यात खूप काही शिकवून गेला. त्याला कारण असे की, वडीलांचा व्यवसाय पूर्णपणे बंद झालेला आणि आता दोघांना दोन वेळेचे जेवन सुध्दा अवघड झाले होते.मग मी ठरवले की, आता काहीही काम जे हाती मिळेल ते करुन रोजचा उदरनिर्वाह करायचा. परंतु गावात मात्र रोजगार मिळायचा तो फक्त शेतीचा, म्हणजे शेतमजूरीचा. मग मी सुट्टीच्या दिवशी शेतात मजूरी करु लागलो आणि कधी शेतीत न गेलेले वडीलही आज मिळेल ती शेतमजूरी करु लागले. कामाची कधीही मला लाज वाटली नाही. अशात, शेजारच्या गावातील श्री. भारत पाटील यांनी आमच्या गावात किराण्याचे नवीन दुकान उघडले होते. त्यांनी मला आपल्या दुकानावर काम करण्यास होकार भरला आणि जवळ जवळ मला त्यांनी दीड वर्षे त्यांच्या घरी ठेवले. जेणेकरुन मी दोन वेळेचे जेवन आता पोटभर करु लागलो आणि वडीलांनाही देऊ लागलो. दिवसामागून दिवस जात होते. आणि परीस्थिती मला खूप धडे देतच होती. मात्र हार न मानता तिच्यावर मात देत मात्र पुढे चालत राहिलो, कारण मला जिंकायचे होते. शेवटी आता मात्र इ.10 वी पर्यंतचे  शिक्षण संपले होते. वार्षिक परीक्षाही देऊन झाली होती आता निकालाची उत्सुकता लागली होती आणि शेवटी निकाल लागला. टक्केवारी ऐकून खूप आनंद झाला आणि मात्र तो क्षण आला ज्याची आवर्जून वाट बघायचो, 10वी नंतर पुढे काय? कुठले क्षेत्र निवडायचे? पुढील शिक्षणाचा खर्च कसा करणार ? असे अनेक प्रश्न डोक्यात घर करुन गेले. इच्छा भरपूर होती परंतु नाईलाज म्हणून मी पण मित्राकडे बघून आय.टी.आय. करायचे ठरविले आणि मार्गदर्शक ठरली ती म्हणजे एकमेव परीस्थितीच.भावांनो,परिस्थिती सारं शिकवून जात होती.फक्त तिला सामोरं जात होतो.

  शेवटी आय.टी.आय. मध्ये प्रवेश झाला कारण प्रवेशशुल्क नाममात्र होते. सुरूवातीच्या दोन महिन्यांपर्यंत दिवस ठिक गेले सुट्टीत शिवणकाम करुन मी आणि वडीलांनी जमा केलेले पैसे कामी आले, परंतु  आता मात्र पुढे काय करायचे कारण 2 वर्षे काढायची होती ती पण जामनेर येथे...परंतु माझी इच्छाशक्ती खुप प्रबळ होती आणि नेहमी प्रेरणा दयायची ती म्हणजे “कणा” ही कुसुमाग्रजांची कविता. खुप छान लिहीली आहे त्यांनी, जी आम्ही इ. ९वीत शिकलो होतो, त्यातली एक ओळ मला खुप आधार नेहमीच देते. 

“खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला,
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला,
मोडुन पडला संसार, तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवुनी, फक्त  लढ म्हणा.”

  सुटीच्या दिवशी मग जे मिळेल ते काम जसे की खताच्या कारखान्यात, घर बांधकामात,केटरर्सकडे लागलो आणि वडील, मोठी बहीण,समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती या सगळयांच्या पाठींब्याने आणि आर्थिक मदतीने 2 वर्षे व्यावसायिक शिक्षण पुर्ण केले. फायनल परीक्षेच्या आधी एक बहुराष्ट्रीय कंपनीने नाशिक सातपूर येथे मेळावा आयोजीत केला होता. सूचना मिळताच खूप आनंद झालेला, कारण मुंबईकर काकांनी सांगितले, एल अँड टी खूप मोठी कंपनी आहे. मेळाव्यात हजेरी लावली. तेथील दृश्य बघून कपाळावर घाम फुटला कारण जवळ जवळ 150 ते 200 मुले आलेली होती. शेवटी मोठया आत्मविश्वासाने लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा दिली. निकाल आला,परंतु दुर्दैवाने अजून साथ सोडलेली नव्हती. कारण लेखी परीक्षेत दुसरा आलेलो मी तोंडी परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलो.वर्गमित्र रामकृष्ण  हा उत्तीर्ण होऊन टेक्निशियन ट्रेनी या पदाकरीता पात्र ठरला होता. दु:खी न होता मी सकारात्मक विचार करु लागलो. कारण हाताची संधी दवडली होती.थोडं शहाणपण आलं की आतला आवाजच माणसाची ढाल बनतो..म्हणून स्वतःला प्रेरित करीत होतो.

  आता शेवटी निकालाची उत्सुकता... निकाल लागला...मी थांबलोच.. पण त्यानंतर मित्राची एका बहुराष्ट्रीय कंपनीत नियुक्ती मला हिणवायची.मी का नाही...स्पर्धा होतीच पण सोबतीनं समृद्ध होण्याची.. कारण परत मौका हा तब्बल एक वर्षानंतर येणार होता. मग आता एक वर्ष करायचे तरी काय? रोजगार कुठल्याही परीस्थितीत हवा होता. पण त्याआधी अप्रेंटिशीप करणे आवश्यक होते.

      एका दिवशी वर्तमानपत्रात बातमी वाचली आणि सरळ मुंबईला निघालो. मुलाखतीस कंपनीही खूप नामांकीत होती. रिलायंस एनर्जी... मुलाखत संपली आणि मी त्यात पात्र ठरलो. आनंद गगनात मावेनासा झाला कारण फक्त 4 जणांचे सिलेक्शन झालेले अवघ्या महाराष्ट्रातून... आणि मुंबईत राहायचाही प्रश्न सुटला होता. काका मुंबईत शासकीय नोकरीत होते आणि  त्यांनी  मला निश्चिंतपणे रहा येथे म्हणून सांगितले आणि काकूनेही खुप प्रेम आईसारखे दिले त्यामुळे माझे 1 वर्षे हे खुप आरामात गेले.या काळात मिळालेली शिष्यवृत्ती ही वडीलांना घरी पाठवायचो. वर्ष संपले आणि ज्यावर लक्ष केंद्रीत केलेले तो दिवस उजाडला एल अँड टी मध्ये परत टेक्निशियनची भर्तीची सुचना मिळली  आणि या वेळेस मात्र कुठलीही संधी न गमावता बाजी मारली आणि माझी नियुक्ती शेवटी झाली. एका बहुराष्ट्रीय  कंपनीचा मी एक हिस्सा झालो.समाजातील असामाजिक तत्वांचे आज तोंड बंद झाले होते,कारण लोक म्हणायची,काय करणार आय.टी.आय.करुन किती मुले फिरताहेत रीकामटेकडी.मला खुप आनंद झालेला कारण आज माझ्या मेहनतीची लढाई मी जिंकलो  होतो ज्या कंपनीत माझे सिलेक्शन झाले होते ती भारतातील एक नामांकीत कंपनी होती आणि माझ्यासारखा एक आय.टी.आय. झालेल्या विदयार्थ्याला विश्वासच होईना, कारण या कंपनीने सुरुवातीपासुनच,म्हणजे ट्रेनिंगपासुनच कायमस्वरुपी (स्थायी) रोजगाराची हमी भरली होती.मित्रांनो,इतिहास खूप शिकवत होता पण वर्तमानात राहूनच भविष्यासाठी झगडत होतो.यशाने हुलकावणी दिली होती पण न डगमगता सामोरं जायला हवं,संयमाची,चिकाटीची ही स्थिती होती.

  आता मला रोजगार मिळाला होता आणि सगळे हळूहळू  ठीक होत चालले होते कारण दोन वेळेच्या जेवणाची सोय झाली होती. नोकरी करत आता 2 वर्षे पूर्ण झालेली, बऱ्यापैकी पैसा बचत झाला होता. आता मात्र मी माझी डिप्लोमाची इच्छा पूर्ण करु शकत होतो,परंतु वडील गावी एकटेच रहात असल्याने मला बघवत नव्हते,पुढे प्रेमविवाह केला.लोक म्हणतात की,एका व्यक्तीच्या यशामागे स्त्रीचा हात असतो, हे मला कळाले कारण मला त्याचा स्वयंअनुभव आलाय. पत्नीच्या आग्रहाने मी आता डिप्लोमा करायचे ठरविले.कारण फक्त 2 वर्षांचा प्रश्न होता. आय.टी.आय. नंतर दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळवायचा.अशा रीतीने मी शेवटी डिप्लोमा इन इलेक्ट्रीकल इं. मध्ये पूर्ण केला. मार्क्सही चांगले मिळाले. आता मला एल अँड टी कंपनीत 4 वर्षे पूर्ण झालेली होती.आता माझी स्वप्नंही मोठी होती कारण माझी इच्छाशक्तीही प्रबळ झाली होती.

      शेवटी तो दिवस आला वर्ष 2 मे 2014 रोजी मला एक जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीत म्हणजेच SCHWING SETTER (I) मध्ये जॉब ऑफर कनिष्ठ इंजिनीअरची मिळाली होती. मी सुध्दा संधीचे सोने केले.गेली 3 वर्षे मी लखनौ (उत्तर प्रदेश) येथे नोकरी करीत आहे. एक पदोन्नतीसुध्दा मिळाली.आज मी वरीष्ठ इंजिनिअर असून सर्व्हीस विभागात पूर्ण प्रदेशाची जबाबदारी सांभाळतो आहे.झोकून देऊन काम केल्यावर त्याचा परतावा हा मिळतोच..मंजील बहुत दूर है...

      मित्रांनो,हितगुज करतांना सारं डोळ्यासमोर उभं राहिलंय पण हो,परिस्थिती ही माणसाला खूप शिकवून जाते.समाजातील चांगल्या वाईट बाबींचा मलाही अनुभव आलाय.येतोय..पण आपली स्वप्नं ही स्वप्नंच राहू देऊ नका..येणाऱ्या परिस्थितीचा बाऊ करू नका..परिस्थिती हीच आपली शक्ती असते..साधं आय.टी.आय करून कमवता कमवता शिक्षण पूर्ण करणं थोडं अवघडंच होतं,पण आतला आवाज सारखं जागं करायचा..निवडलेल्या क्षेत्रात आपल्यातला बेस्ट द्या..निश्चितच यशस्वी व्हाल..आय.टी.आय ते वरिष्ठ इंजिनियर पदापर्यंतचा प्रवास खूप शिकवून गेलाय..
हे सारं मिळवलंय ते फक्त माझे वडील हेच आई,बाप,समाज,गाव झाल्या कारणाने..स्वतःमधला वाचमन नेहमी जागा असू द्या...धन्यवाद ....

विजय पंडीत शिंपी
वरिष्ठ इंजिनियर,
SCHWING SETTER (I)
Mob- 8795821686

***************************************************
♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻
💎 प्रेरणा एक सुवर्णपान ब्लॉग 💎

⚜ *जिद्द एक प्रेरणा - निंबा पाटील*
 http://prerana1suvarnpan.blogspot.in/?m=1

⚜ *मेहनतीचा दीपस्तंभ- दत्तात्रय पाटील*
https://prerana1suvarnpan.blogspot.in/p/2.html?m=0

⚜ *“Believe in Consistent Efforts”- Kishor Mahajan*
https://prerana1suvarnpan.blogspot.in/p/blog-page_31.html?m=0

♻ *प्रेरणा एक सुवर्णपान फेसबुक पेज*
https://m.facebook.com/preranaeksuvarnpan/

♻ *Email प्रेरणा एक सुवर्णपान*
preranaeksuvarnpan@gmail.com

♻ *whatsapp प्रेरणा एक सुवर्णपान*
भरत पाटील- 9665911657

🔮🎇🔮🎇🔮🎇🔮🎇🎇🔮🎇

*आपला अभिप्राय जरूर कळवा.*

*प्रेरणा एक सुवर्णपान Broadcast ला ॲड व्हायचे असल्यास 9665911657  नंबरवर whatsapp करा.दर पंधरवाड्यात दीपस्तंभ आपल्या भेटीला...स्वअनुभव रेखाटत*

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

No comments:

Post a Comment