काळ सर्वतोपरी आहे - ईश्वर परदेशी




🍂 प्रेरणा एक सुवर्णपान - 13🍂

काळ सर्वतोपरी आहे - ईश्वर परदेशी

 लहानपण फार मनोरंजक नसल्यामुळे पुसटसे आठवते. शाळेत नाव टाकायचे म्हणून कदाचित वडीलांनी ऐन दिवाळीच्या आसपास शाळेत आणलेले.नेमकी जन्मतारीख माहिती नसल्याने तत्कालीन सर्व प्रचलित मापदंड म्हणून कानाला हात पुरवून पाच वर्षे वयाचे गणित लावून ०१ जून १९७४ अशी जन्म तारीख लिहून (मी नंतर शाळा सोडल्याच्या दाखल्यावरुन कळते) शाळेत नाव घातले.पहिल्या वर्गात पहिला दिवस श्री.कासार गुरुजींनी ज्यावेळी इतर मुले संपूर्ण  उजळणी व मुळाक्षरे उच्चारत होती त्यावेळी मला पाटीवर एक ते दहा इतके अंक लिहून गिरवायला सांगितले.मी ते सलग किती वेळ करत राहिला हे मला ठाऊक नव्हते.किंबहुना कोणी मला थांबवायचा प्रयत्नही करत नव्हते.शाळेच्या घंटा वाजल्याच्या आवाजाने इतर सर्वच उठून चालले होते,जे माझ्यासाठी नवखेच,परंतु मी काय करावे असा प्रश्न मला पडला होता. इतक्यात गुरुजींच्या लक्षात आले. म्हणाले, "बाळा आता घरी जा, उदया सकाळी यायचं." मी ताडकण उठलो आण‍ि एखादयाला जन्मठेपेच्या शिक्षेतून मध्येच मुक्ती मिळाल्यागत पळतच घरी पोहचलो.

       संध्याकाळ नेहमीसारखीच. रात्रीचे साडेनऊ दहा वाजले असतील. वडील नेहमीप्रमाणे शेतात जायचे म्हणून मलाही शेतात जायचे असा मी हट्ट धरला  पण आज शेतात जायचे काम नाही,म्हणून माझी समजूत घालून झोपी घातले गेले. परंतु मध्यरात्री दरम्यान मला जाग आली.मी इरतत्र पाहिले.वडील दिसले नाहीत. गल्लीत बैलगाडी दिसली नाही.रडायला लागलो.मला शेतात जायचेच म्हणून घराच्या मोठमोठया पायऱ्या उतरत अंगणात आलो. आई जागी झाली व आवाज दिला. मी अजून जोराने पळायला लागलो, तितक्यात श्री. हिरालाल भाऊ अंगणात खाटेवर झोपले होते,ते उठले त्यांनी मला अडविले, दटावले व तेथेच थांबविले. मी हुंदके देत जागेवर मला शेता जायचे म्हणून सांगत होतो.आईने अंगणात येऊन घट्ट हात धरुन वर ओटयावर आणले व समजावयाला लागली,की तू उदया सकाळी शेतात जा म्हणून. परंतु मी ऐकत नव्हतो.तेवढया रात्री तिने मला दुधात भाकरी चुरुन खाऊ घातली.मी अजूनही हुंदके देतच होतो.डोळे वाहत होते.नाक वाहत होते.आता झोप, सकाळी जा म्हणून मला शांत केले गेले.मी झोपलो नेहमीप्रमाणे उजाडले,परंतु सकाळ नेहमीची नव्हती. शाळेत जाणारे मोठ्या  भाऊ बहिणींनी सोबत अंघोळीला नंबर लावला होता. मी आपला अजूनही शेतातच जायचे रडगाणे गात होतो. हो शेतातच जायचे म्हणून समजूत घालणे सुरुच होते. कपडे घातले गेले,चहा दिला गेला आणि हातात एक नायलॉनची थैली दिली गेली. आत पाटी,पेन्सिल असेल कदाचित.मी ती जोराने जमिनीवर फेकली.उतरत्या पायरीकडे झेप घेतली. मला आईने आवरले. स्वत: हातात ती थैली उचलून एका हातात बारकी काडी धरुन माझ्या मागे अंगणात उतरली. मला काय करावे कळतच नव्हते. माझे पाय समोर समोर जात होते व माझे डोळे मागावर असलेल्या काडीकडे पहात होते.रडणे सुरुच ! मध्येच मला आठवण आली, मी म्हणालो की मला शेतातच जायचंय. तिला आवरले नसेल कदाचित तिचा हात उंचावला व बारकी काडी माझ्या एका पायाच्या पोटरीवर पडली. डोळ्यात झटकन अश्रू जमले. पुन्हा पाय उचलून पुढे, दुसऱ्या पोटरीवर काडी पडली. दुसरा पाय त्याहीपेक्षा पुढे. मी आता चालत नव्हतो तर पळत होतो. पळता पळता (हायस्कूलची) चढती आली. चढती चढणे संपल्यावर लक्षात आले की कालची ती शाळा जवळ आलीय. रडतच आईला सांगितले की तू घरी परत जा.मी जातो शाळेला, किंबहूना असे न केल्यास आई थेट शाळेत आली असती अशी भिती मनात आली असेल. मी शाळेत पोहचलो. आजचा दिवस कसा गेला माहित नाही. परंतु शाळेतून घरी वापस जातांना पाय जड झाले होते आणि मन त्याहीपेक्षा अवजड. बराच वेळ झालेला परंतु मी काही घरापर्यंत गेलो नव्हतो. सगळे घरी आले. परंतु मी नाही हे जाणून आई शाळेच्या दिशेने निघाली.श्री.पंडित लोहार यांची जूनी दुकान जिथे होती त्याच्या समोरुनच जात होतो. तितक्यात समोरुन आई येतांना दिसली.मी बघितले,परंतु ती सकाळची आई नव्हती. मला पोहचायला उशीर झालेला पाहून व्याकूळ झालेली ती माय होती. तिने ताडकन कडेवर उचलले व कवटाळले व घरी घेऊन गेली. फार अधिक भावना न समजू शकणारे ते वय परंतु काय कुणास ठाऊक त्यानंतर मला शाळेत जाण्यासाठी म्हणून कोणालाही कधीही सांगावयाची आवश्यकता नाही भासली,कदाचित मी सुध्दा स्वत:ला कधी चला,आता शाळेत जा,म्हणून म्हणायची वेळ आल्याचे आठवत नाही.

      अगदी तिसरी पासून दहावी पर्यंत शेतातून शाळेत, सुट्टी सोडली तर दररोज वेळेच्या आत पोहचणे व शाळा संपल्यावर मी कधी पायी-पायी चालल्याचे मला आठवत नाही. माझी चाल नेहमी पळतच राहिली. मी कुणी बैलगाडी,सायकल,मोटार सायकलला कधी लिफ्ट मागितली नाही. कुठे थकलो म्हणून क्षणभर विसावा घेतला नाही. हायस्कूलमध्ये जात असतांना नेहमीच असे व्हायचे की, मी पुढे-पुढे पळत आहे आणि श्री सोनार यांची पांढऱ्या रंगाची काठेवाडी बैलजोडीची गाडी मागे-मागे धावायची. फफूटा मेल, पायात चप्पल नसली तरी, कमी गतीवर कधी धावलीच नाही.हे पळणेच मला आंतरिक शक्ती निर्माण करून देत असे.वेळेचे भान जागृत करून देत असे.

 मराठी शाळेत श्री.नामदेव गुरुजी आठवणीतून जात नाहीत. कारण आहे,त्यांनी ग्रामपंचायतजवळ काही दिवस चालविलेला आमचा ४थी ब चा वर्ग.श्री नामदेव गुरुजी मन लावून शिकवायचे. खेळ जसे- मामाचे पत्र अजूनही आठवते व इतर खेळही तिथे घ्यायचे. त्यांच्यामुळे शाळा संपल्यावर मराठीच्या पुस्तकातील जमाडी जम्मत, इतिहास-भुगोल वाचणेची गोडी लागली. जम्माडी जम्मत तर पाठच झाले होते. हायस्कूलमध्ये आलेपासून मी अतिशय भाग्यवान असल्यागत शिक्षकगण लाभलेत. विशेषकरुन श्री. जे.डी. सर ज्यांच्यामुळेही कदाचित ११.२० चा ठोका मी कधीही चुकवला नाही. श्री.सुभाष सरांचे इतिहास-भुगोल, श्री.पी.के. महाजन सरांची हिंदी,श्री.वाघ सरांची ABCD,मोहन सरांची चित्रकला, श्री.परदेशी सरांची इंग्रजी स्पेलिंगचे पाठांतर, श्री. व्ही.पी. वाणी सरांचे मराठी, श्री. व्ही.डी. सरांचे भूगोल,श्री. सोनी सरांचे सातवीचे गणित,श्री. अरुण सरांचे भौतिकशास्त्र, श्री. एम.एस.पाटील सरांचे इंग्रजी व्याकरण व संस्कृत आणि श्री.एन.आर पाटील आबांचे रसायन सोबत संत ज्ञानेश्वर व मुक्ताईच्या गोष्टी कधी विसरणे शक्य नाही. शेवटी हेडसरांचे (श्री. पी.के. पाटील सर) Ninety Nine Rupees ची सलग दोन महिने चाललेली कहानी मस्तिष्क पटलाच्या पलीकडे गेली तर बोला ! *माध्यमिक शिक्षण जीवनाला कलाटणी देऊन गेले.भरभरून जगता आले.तहानभूक विसरणे म्हणजे नेमकं काय याचं उत्तर गुरूजनांमुळेच मिळालं.*

   त्यावेळी शेतातच राहत होतो. रात्री दिव्याचा/कंदिलचा वापर करुन अभ्यास करायचो. 9 वीत असतांना मोठया भाऊने वायर ओढून घरापर्यंत विहिरीवरुन लाईन आणली. वडील दररोज सकाळी चार वाजता उठवायचे, चहा करुन दयायचे आणि मग माझा अभ्यास सुरु व्हायचा.रात्री चांदण्यांच्या सहाय्याने वेळेचा अंदाज घ्यायचो.सकाळी घराच्या विशिष्ट भागावर पोहोचलेला सुर्यप्रकाश यावरुन वेळेची योग्य माहिती मिळत होती. त्यानुसार तयारी करुन शाळेत पायीच पळत जाणे, दुपारी डबा संपविल्यावर गल्लीतून रामधन भाऊ च्या घरुन आवाज यायचा, हे आकाशवाणीचे जळगाव केंद्र आहे.-------- पुढचे शब्द मी कधीच ऐकले नाहीत, कारण तिथे शाळेची मधली सुट्टी संपलेली असायची. यामुळे आम्हांस कधी घडयाळ किंवा सायकल यांसारख्या वस्तू आवश्यक बाबी म्हणून जाणवल्या नाहीत. रात्री सगळे झोपेत असतांना वडिलांची नजर माझेकडेच. मला जर अभ्यास करतांना डुलकी लागती तर लगेच वडीलांची हाक यायची. रोज हे ठरलेलेच रहायचे. शाळा व्यतिरिक्त मित्र म्हणून किंवा इतर काही खेळ म्हणून नव्हतेच कधी. पुस्तके आणि मी स्वतःच स्वतःचा मित्र बनलो होतो. दहावीची परीक्षा संपली.सुट्टया गेल्या.निकाल लागला. वर्गात ३९ मुले सर्व पास. मी पहिला आलो.नेहमीची सवय असल्यागत फार वेगळे काही वाटले नाही.

      पुढे काय असते माहिती नाही.नशिबाने चाळीसगावच्या बहिणीकडे पाठवण्याचे ठरले. आमच्या पाहुण्यांनी ११वीला रा.वि. मध्ये प्रवेश निश्चित केला. पांढरा शर्ट व खाकी हाफ पँटवरच. कधी काळी वडिलांनी म्हटलेले आठवते की, *"पोरा, अंगाकडे व कपडयांकडे कधी बघायचे नाही, तरच पुढे जाशील."* त्यामुळे त्याबद्दल कधी नाराजी नाही किंवा उत्सुकताही नाही. ११वी चे पहिले दोन महिने इंग्रजी फार अधिक कळत नव्हते. मला हळूहळू मार्ग सापडला.भौतिक, रसायन,जीवशास्त्र विषयाचे सर्व मराठी-इंग्रजी शब्दकोष विकत घेतले आणि असतील नसतील ते शब्दार्थ पाठ करुन टाकले.तेव्हा कुठे आता ११ वीला समजायला लागले होते.११ वीचे श्री. येवले सरांचे गणित,श्री.वानखेडे सरांचे भौतिक, श्री.भिरुड सरांचे वनस्पतिशास्त्र व श्री.पाटील सरांचे रसायन शास्त्र अजूनही डोक्यात आहे. चांगले लोक,मित्र व चांगले शिक्षक ही माझी नेहमीच जमेची बाजू राहिली.मी कधीही स्वत:ची कोणाशी तुलना केली नाही किंवा आवश्यकता पडलीच नाही. नियमित अभ्यासामुळेच अकरावीत पहिला अन् बारावीतही पहिला आलो. तरीही कुठे जायचे यासाठी माझ्याकडे काहीही सुत्र नव्हते. 

     वैद्यकीय क्षेत्रासाठी माझ्या पाहुण्यांनी भरपूर घोडदौड केली. परंतु मार्कच कमी असल्याने खुल्या प्रवर्गातून प्रवेश भेटला नाही. कृषी क्षेत्राबद्दल श्री.पाटकर सरांचा मोठा मुलगा सांगायचा. आम्हीही धुळे, पुणे दापोली व राहूरी येथे प्रवेश अर्ज पाठवले. ऑगस्ट १९९२ मध्ये राहूरी येथे कृषी अभियांत्रिकीत प्रवेश मिळाला. नंतर तिथे कळाले,की आपल्या गावातील श्री.मनोज येवले व आमचे मावसभाऊ श्री. सुदाम परदेशी त्यातच शिक्षण घेत आहेत.नवीन ठिकाणी आलेलो.होस्टेल जीवन,अतिशय वाखाणण्यासारखं महाविद्यालय! पट्टीचे शिक्षक व भव्य ग्रंथालय ! अगदी परीक्षेच्या आदल्या रात्रीसुध्दा अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पुस्तक आवडले तर वाचूनच काढत होतो.त्यामुळे परीक्षेत जेमतेम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. बी.टेक संपल्यावर कॅम्पसमध्ये निवड नाही झाली. कारण खाजगी कंपनीत काम करण्यासारखा माइंड सेट नव्हता कधी. उच्च शिक्षणाकरिता GATE  ला स्कोर कमी पडला म्हणून IIT खरगपूर ला प्रवेश भेटाला नाही. प्रशासकीय सेवा परिक्षांबद्दल फार रुची नव्हती. परंतु भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीकडून घेतल्या जाणाऱ्या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे मला पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना (पंजाब) येथे उच्च शिक्षणाची संधी भेटली. दरम्यान मला कावीळ झालेला होता. पंजाबला जायचे म्हणून घरी आलेलो. सर्वांचे मन नाही म्हणत होते, परंतु वडील आजारी असूनही सांगत होते की तू जा…. मी निघालो.लुधियाना गाठले. प्रवेश झाला.संध्याकाळी जालंधर पोहचलो.शोधत शोधत मनोज च्या रुमवर होस्टेलचा जुगाड होईपर्यंत जालंधर ते लुधियाना अपडाऊन केले. त्याकाळी मनोज सोबत सुवर्ण मंदिर व वाघा बॉर्डर ही बघितली. त्याने काम पडले म्हणून दिलेले ८०० रुपये अजूनही माझ्याकडे कर्ज म्हणून आहेतच. लुधियानात मला भारतातील सर्व भागातून व काही विदेशी लोकांसोबत रहायचा योग आला. तिथेच 'द हिंदू' या वृत्तपत्राशी मैत्री झाली.माझे इंग्रजी चांगले उजळू लागले.बी-टेकला असतांना संदीप पवार मुळे लिहायला शिकलेले,इंग्रजी आता संवाद करु लागले होते. शिक्षक म्हणून भेटलेली माणसे, त्याकाळाची अतिभव्य ग्रंथालय व मनमुक्त काम करु देणारे वातावरण व प्रयोगशाळा यांच्यामुळे मला कावीळच्या प्रघात असूनही फार अवघड झाले नाही.परंतु लुधियानातील खानावळीतील बटरने मला दुसऱ्यांदा कावीळचा झटका दिला. तब्येत जास्तीची बिघडली असल्याचे जाणवल्याने नाईलाजाने घरी परतलो. पाहुण्यांनी डॉक्टरला दाखविले. वडीलांनी लगेच भेंडा फॕक्टरीला नेले. कावीळचे औषध घेतले. काही दिवसांनी बरे वाटले.पुन्हा गाडी सुरु झाली. हा काळ मार्च १९९७ चा होता. 

     पुढे पदव्युत्तर शिक्षण संपत आले होते. वडीलांना पाचोऱ्यात अपघात झाला होता. योगायोगाने मोठी बहीण व पाहुणे पाचोऱ्यातच होते. त्यांनी दवाखान्यात नेले. चाळीसगाव येथे हलविले. वडीलांची पायाची शस्त्रक्रिया झाली डॉ.बापूंकडे. त्यामुळे घरी आलेलो होतो.साधारण मार्च १९९८ ची गोष्ट. दवाखान्यांतून डॉ. बापूंच्याच गाडीतून वडीलांना घरी आणले. थोडे दिवस राहून लुधियानासाठी निघालो.जातांना वडीलांना ओसरीतील पलंगावर झोपलेल्या अवस्थेतच निरोप घेतला. आज २७ मे,१९९८. उदया सकाळी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा शेवटचा पेपर म्हणून अभ्यास सुरु होता. अचानक होस्टेलच्या फोनवर घरुन फोन होता. वडीलांची तब्येत ठिक नाही. लवकर परत ये. मी संभ्रमात होतो. STD वर जाऊन घरी फोन केला. पाहुण्यांनीच फोन उचलला. वडील अतिशय गंभीर आजारी असल्याचे सांगितले. मी विचारले, की कोणत्या दवाखान्यात आहेत?  ते म्हणाले,घरीच आहेत. मी म्हटले, मला बोलायचंय त्यांच्याशी, ते म्हणाले, ते बोलू शकत नाही. तू लवकर निघून ये. मी अस्वस्थ झालो होतो. आता जी ट्रेन सापडेल तिने निघावी तरी घरी जाण्यासाठी २७-३० तास लागतात आणि उदयाची परीक्षा नाही दिली तर पूर्ण एक वर्ष वाया जाणार. वाटायला लागले होते की वडील आता राहिलेले नाहीत.परंतू मनाची समजूत घालत होतो. मी होस्टेलला परतलो.वडीलांनी दिलेली श्रीमद् भगवद् गीता उघडली. मनात धीर येईपर्यंत श्लोक वाचत होतो. मन स्थिरावले. पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली.पहाटे चार वाजता झोपलो.दुसऱ्या दिवशी परीक्षा देऊन दुपारी जी ट्रेन भेटली.तिने घराकडे रवाना झालो.. दुसऱ्यादिवशी (२९ मे, १९९८) ला पाचोऱ्याला पाहुण्यांच्या ऑफिसात पोहोचलो. समोर बसलेल्या साहेबांनी सांगितले. याचेच वडील होते का ते? मला जाणीव झाली होती, की वडील आता नाहीत.पायाखालची जमीन सरकली.मी स्वत:ला सावरले. घरी दु:खच दु:ख होते.

काही दिवसांनी पुन्हा परतलो. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढच्या तयारीला सुरुवात केली. विविध परीक्षांची तयारी सुरु होती. दरम्यान सिफेट, लुधियानात २२०० रु. महिन्याची तात्पुरती नोकरी सुरु केली. दरम्यान पी.एच.डी. साठी प्रवेश परीक्षा मुलाखती देणे सुरु होते. शास्त्रज्ञसाठी परीक्षा देणेही सुरुच होते. करता करता केंद्रिय कृषी अभियांत्रिकी संस्थान,भोपाळ येथे संशोधन सहाय्यक म्हणून नोकरी भेटली. ०१ जानेवारी २००० रोजी लुधियानात पी.एच.डी. साठी प्रवेश घ्यायचा, म्हणून मोठया भावाने पाठविलेले ९००० रु. घेऊन ११/१/२००० रोजी भोपाळ गाठले. तेथे रुजू होऊन दोन दिवसांसाठी घरी आलो. तोपर्यंत त्यातील ४००० रु. संपलेले होते. ५००० रु. मोठया भावाला परत केले. कळले की, ते पैसे गाय विकून दिलेले होते.फार वाईट वाटले.वडीलांनंतर भावांनी कधीही वडीलांची उणीव वाटू दिली नाही. भोपाळच्या नोकरी सोबत,नवीन गोष्टी शिकणे,परीक्षा देणे,नोकरीसाठी व सोबतच पी.एच.डी साठी परीक्षा व मुलाखती देणे सुरुच होते.भारतीय कृषी अनुसंधान परीषदेच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पी.एच.डी करण्यासाठी फेलोशिपसाठी २००१ साली माझी निवड झाली. त्यावेळी आय. आय.टी खरगपूर येथेही गावातील विनोद महाजन करवी फॉर्म भरला. मुलाखतीच्या वेळी भेट झाली. ही माझी पी.एच.डी.ची ९ वी मुलाखत होती. २९/२/२००२ ला मी आय.आय.टी खरगपूर मध्ये पी.एच.डी सुरु केली. मला नशिबाने शिक्षणासाठी सर्वोत्तम शाळा,विद्यालय,महाविद्यालये व संस्थांने मिळत गेलीत व  महाबीजमध्ये मला ऑक्टो-२००४ मध्ये नियमित नोकरी लागली व जुलै २००५ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे नोकरी लागली. सदर क्षेत्र माझ्यासाठी अतिशय अनुकूल आहे.काळासोबत धावत होतो अन् दिशा ठरवत होतो. विविध विषय शिकविणे व कृषी तंत्रज्ञानात संशोधन करण्याचे भाग्य मला मिळाले आहे.माझे कुटुंब अन् नातेवाईक यांची अनमोल साथ कायम पाठीशी राहिली. पुढे गावाच्या शिवारात शाश्वत जलस्त्रोत व गावात शाश्वत श्रमश्रोत निर्माण करणे हे माझे स्वप्न आहे.

     काळ खूप मजबूत असतो,तो कुणासाठीही थांबत नाही.त्याच्याशी मैत्री करा.आपली दिशा ठरवा.त्या दिशेने मार्गक्रमण करा.आवडीच्या क्षेत्रात स्वतःला झोकून द्या.समाधान,यश मिळतेच.एक रस्ता दुसऱ्या रस्त्याला मिळतोच.स्वतःवर विश्वास ठेवा.थोरांचे बहुमोल मार्गदर्शन अन् संदेश नेहमीच दिशादायी असतात.शेवटी,काळ सर्वतोपरी आहे.

🎇 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 

📝 ईश्वर लखीचंद परदेशी.
सहयोगी प्राध्यापक,
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
मो. 9421077883

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

No comments:

Post a Comment