NO SHORT-CUT FOR SUCCESS - VINOD MAHAJAN



                 

                            🔮                           प्रेरणा एक सुवर्णपान -7🔮

                                 NO SHORT-CUT FOR SUCCESS - VINOD MAHAJAN

        सकाळी आईचा आवाज आला, रमेश गुरुजी आलेत तुला शाळेत घेऊन जायला.मी आपला  मागच्या खोलीत जुन्या डब्यांच्या मागे लपून बसलेलो, ही होती सुरुवात माझ्या शालेय जीवनाची.दुसरीपर्यंतचे दिवस मी खूप त्रास दिला आणि सहन पण केला.शाळेत जाण्यासाठी खूप मार खाल्ला. तेंव्हा सगळ्यांना असे वाटले,हा मुलगा काही पुढे शिक्षण घेणार नाही.मला शाळेत घेऊन जायला रोज नवीन व्यक्ती असायची,कधी भाऊसिंग भाऊ (आमचा सालदार),कधी वडील.रोज आई वडिलांना म्हणायची,आज राहू द्या याला घरी खूप रडतोय पण वडील ऐकायचे नाही.प्रत्येक पालकांना माहित असते आपल्या मुलाला वळण कसे लावायचे ते आणि त्याचाच परिणाम म्हणजे  तिसरीपासून मला शाळा खूप आवडायला लागली.त्यावेळी मराठी शाळेत सकाळी पिण्यासाठी दूध भेटायचे पण साखर वापरायला परवानगी नव्हती.मग आम्ही लपून साखर आणायचो आणि गुपचूप दुधात टाकायचो.मराठी शाळेत  प्रत्येक मुलाला आपले एक झाड लावावे लागायचे आणि मग चौथीपर्यंत त्या झाडाची  काळजी स्वतः घ्यावी लागायची.माझं झाड जणू माझ्या जीवनाचं अविभाज्य भागच झाले होते.खूप मजा केली,ते वयच असत मजा करण्यासाठी,आनंद लुटण्यासाठी आणि पालक म्हणून आपण ती मुलांना करू द्यायला हवी. मराठी शाळेत रमेश गुरुजी,पंढरीनाथ गुरुजी आणि इतर सर्व शिक्षकांचे खूप  मार्गदर्शन लाभले.

       पाचवी ते दहावी लोहटार मराठी माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले.शाळेमध्ये पहिला नंबर येण्यासाठी एक हेल्थी स्पर्धा होती.सातवी नंतर सायन्स विषयाची खुप आवड लागली. आठवीमध्ये,सायन्सचा अभ्यासक्रम बदललेला होता. शिक्षकांसहीत सगळे गोंधळलेले होते,पुस्तकामध्ये खूप चुका होत्या.तक्रारी सोडवण्यासाठी प्रत्येक तालुका लेव्हलला  शिक्षकांच्या वर्षभरात 3 ते  4 मिटींग्स व्हायच्या.आम्हाला तेव्हा A.B.Mahajan सर सायन्स शिकवायचे.मी रोज काही तरी प्रश्न घेऊन जायचो. एके दिवशी ते मला म्हणाले, विनोद,तु तुझे सगळे प्रश्न एकत्र कर,मी ते सगळे त्या मिटिंगमध्ये मांडतो.सायन्स पुस्तकात,गाईड आणि अपेक्षितमध्ये दिलेल्या ग्रहांनाअसलेल्या चंद्राची संख्या कधीच match  होत  नव्हती,आणि कुणालाच  खरं उत्तर माहित नव्हतं.यामुळे मी खूप गोंधळलो होतो.त्यामुळे मी सरळ खगोलशास्रज्ञ Dr.जयंत नारळीकर यांनाच पत्र पाठवलं आणि विशेष म्हणजे त्यांचे उत्तर पण आले आणि मग मी खुप पत्र वेगवेगळ्या एजन्सीजला पाठवली  जसे नवनीत,अपेक्षित.नववीत सहामाही परीक्षेत सायन्समध्ये मला 60 पैकी 59 मार्क्स मिळाले.माझ्यापेक्षा जास्त आनंद A.B.Mahajan सरांना झाला होता.ते पुर्ण गावात  आनंदाने  सांगायचे,एक मार्क  पण कापायला जागा नव्हती,पण मुद्दाम एक मार्क कापला.या सर्व प्रसंगांमुळे मला खुप प्रेरणा मिळाली आणि माझी सायन्सची आवड अजून वाढली.

        अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही ना काही नवीन गोष्टी करायची खुप आवड होती.मी सातवीत असेल, तेव्हा दूरदर्शनवर टर्निंग पॉईंट सिरीयल यायची.त्यात एका एपिसोडमध्ये दाखवले,कशा ट्यूब लाईट्स गॅस फ्लेमच्या सहाय्याने वितळून वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू तयार करायच्या.मग काय मी आणि मनोज वाघ,आम्ही काही ट्यूब लाईट्स जमा केल्या आणि  धरणाकडे जाऊन तेथे आमचा  प्रयोग केला.मोठा जाळ करून  त्यात ट्यूब लाईट्स टाकल्या  आणि काही वेळाने त्या इतक्या जोरात फुटल्या की आम्ही तेथून पळ काढला.पुढे आम्ही अजून एक प्रयोग केला, गंधक (Sulphur) जाळण्याचा.त्यात गंधकाचा धुर आमच्या श्वासात गेला.पुस्तकात वाचल्यानंतर कळले की गंधक विषारी असते,आणि मग काय आम्ही खूप घाबरलो,आता आपण संपणार,आपलं काही खरं नाही.पुढचे दोन दिवस खुप टेन्शनमध्ये होतो पण सुदैवाने काही झाले नाही.अभ्यासाबरोबरच खेळ पण खुप खेळलो.कबड्डी आणि खो खो,आंतर शालेय स्पर्धेमध्ये खेळलो. कबड्डीत आमची टीम डिस्ट्रिक्ट लेवलला रनर अप झाली.क्रिकेट  तर जीव की प्राण.आमच्या  जवळच्या शेतापासून,नदी, मराठी  शाळा,हायस्कूलचे ग्राउंड,धरणाकडचे ग्राउंड या सर्व ठिकाणी क्रिकेट खेळलो. गोट्या,भोवरे सारखे सगळे मैदानी खेळ खेळलो.मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी मोबाईल जनरेशनच्या आधीच्या जनरेशन मध्ये जन्माला आलो.आता तर सगळे खेळ मोबाईल वरच खेळले जातात.

       आला महत्वाचा टप्पा,तो म्हणजे दहावीचा.दहावी म्हटली की ती फक्त एका व्यक्तीची नसते,पुर्ण कुटुंब त्यासाठी तयारी करत असत.माझ्या बाबतीतही काही वेगळं नव्हतं.समर क्लासेस साठी,जळगावला मनोहर कॉम्पेटिशन क्लासेस जॉईन केले.दोन महिने तिथेच राहायचे होते.असा पहिला प्रसंग होता जेव्हा मी घरापासून लांब राहायचे होते.खुप होम सिकनेस जाणवला.पण जीवनात काही  तरी करायचे म्हणून सगळ्या  परिस्थितीशी जुळवून घ्यायचे  ठरवले.आपल्या घरच्यांच्या असलेल्या अपेक्षा पण बरीच हिम्मत देऊन गेल्या.त्या क्लासमध्ये वेगवेगळ्या गावातून, शहरातुन मुले आली होती.तिथे मला जाणवले,आपण जे आपल्या शाळेपर्यंत विचार करत होतो,जग त्या पेखा खुप मोठे आहे.खूप टॅलेंटेड मुले आहेत या जगात आणि विचार केला,या जगात टिकायचे असेल तर  खुप  मेहनत घ्यावी लागेल.कॉम्पिटिटिव्ह एक्झाम काय असतात ते मला तिथेच  कळले.IQ exams,General Knowledge exams,खुप काही शिकायला मिळाले.पुढे वर्षभर प्रत्येक महिन्यात एक रविवार,क्लासेससाठी लोहटार ते जळगाव अप डाउन केले.अप डाउनमध्ये जळगाव ते नागद S.T. संध्याकाळी 5.30 ला सुटायची.बऱ्याच वेळेस येणे झाल्याने S.T.चे ड्रायव्हर काका ओळखीचे झाले होते.त्यांनी बऱ्याच वेळेस गाडी माझ्यासाठी लेट केली. 

         दहावीत शाळेत पहिला नंबर आला,पण परसेन्ट अपेक्षेपेक्षा  कमी होते,थोडे वाईट वाटले  पण  लगेच पुढच्या तयारीला  लागलो.माध्यमिक शाळेत खुप शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्यात अर्थातच पहिले होते माझे वडील P. K. Mahajan सर. माझ्या जीवनावर त्यांचा खुप प्रभाव आहे.परिस्थितीवर मात कशी करायची याची प्रेरणा मला त्यांच्याकडूनच मिळाली.त्यांच्या  व्यतिरिक्त A. B महाजन सर, सोन्नी सर,V.P वाणी सर,K.D परदेशी सर,N.R पाटील सर, B.S चौधरी सर,एन.एन.पाटील सर,V. D वाणी सर,वाघ सर आणि इतर सर्व शिक्षकांनी खूप मनापासून शिकवले आणि त्यामुळेच पाया पक्का होण्यास मदत झाली.चांगले मित्र मिळाले. रितेश ब्राह्मणे,सचिन येवले,बापू परदेशी,विनोद सोनावणे,कैलास सपके,नितीन ठाकरे आणि इतर बरेच….

         11वी आणि 12वी सायन्स जळगावला नुतन मराठा कॉलेजमध्ये करायचे ठरवले.राहायला मोठ्या बहिणीकडे.एक रूमचे घर असून ही, मोठ्या बहिणीने माझ्या शिक्षणासाठी खुप सपोर्ट केला.घर ते कॉलेज अंतर 5 ते 6 Km.त्यासाठी एक सेकंड हॅन्ड सायकल विकत घेतली.रोज  सकाळी 6 ते संध्याकाळी 8 पर्यंत क्लासेस आणि कॉलेज  सुरु झाले.खूप मेहनत घेतली  आणि त्याचाच रिझल्ट म्हणजे 11वी फर्स्ट एक्झाममध्ये  Physics1 आणि 2, Maths1 आणि 2 मध्ये 40 out of 40 मार्क्स मिळाले.एका रात्रीत स्टार होणे म्हणजे काय असते ते मला तेंव्हा कळले.मला सगळे शिक्षक आणि विद्यार्थी ओळखायला लागले.दोन शिक्षकांनी मला खुप पाठींबा दिला,बागुल सर आणि थोरात सर.त्यांना खुप अभिमान वाटायचा माझा,एक विद्यार्थी ग्रामीण भागातून असून शहरी विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळवतोय म्हणून.१२वीत घरी भाचा लहान असल्या कारणाने अभ्यास व्यवस्थित होत नव्हता. तेंव्हा एका मित्राला (रितेश पाटील) विचारलं,अभ्यासासाठी त्यांची रूम वापरायला कारण त्यांच्याकडे एक रिकामी रूम होती.रोज रात्री जेवण करून अभ्यासासाठी त्याच्याकडे सायकलने 3 km जाऊ लागलो आणि सकाळी उठून परत घरी यायचो.मला अजून आठवत,की  मी रात्री १२ वाजता प्रॅक्टिस म्हणून सराव पेपर करायला घ्यायचो.खूप मेहनत घेतली. नकळतपणे अशी बरीच माणसे असतात जे आपल्या जीवनात मदत करत असतात आणि त्यांचा एक मदतीचा हात किंवा सल्ला जीवनाची दिशा बदलायला कारणीभूत ठरू शकतो.रिझल्ट पण अपेक्षेप्रमाणे लागला.PCM (Physics, Chemistry,Maths) ग्रुपमध्ये 94.3% मिळाले.सर्व काही आनंदमय झालं होत.घरचे खूप खुश होते.पुढे काय करायचे याचे काही माहित नव्हते.घरात कोणी सायन्स केले नसल्या कारणाने Engg.ॲडमिशन बद्दल काही माहित नव्हते.

         मित्रांसोबत Engg.चे फॉर्म भरले.9 कॉलेजचे पर्याय द्यायचे होते तिथे मी फक्त 7 पर्याय भरले.सगळे पुण्याचे कॉलेज आणि मेकॅनिकल ब्रांच.दुर्दैवाने त्यावर्षी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ इंजिनीरिंगसाठी पुणे युनिव्हर्सिटी मधून बाहेर पडले आणि 70% ॲडमिशन कोटा,30% झाला आणि माझा नंबर लास्ट कॉलेजमध्ये 1 मार्काने मिस झाला.त्यानंतर मी 70% कोट्यातून होम युनिव्हर्सिटी मध्ये SSVPS कॉलेज धुळे येथे ॲडमिशन घेतली.मी आणि वडील सर्व डॉक्युमेंट घेऊन कॉलेज मध्ये गेलो आणि सर्व डॉक्युमेंट जमा केले.मन काही ऐकत नव्हतं.त्यावेळी लोहटार गावातील सिनियर विद्यार्थी मनोज येवले आणि ईश्वर परदेशी यांच्याबद्दल ऐकुन होतो.त्यांनी Agricultural Engg.राहुरीतून  केले होते आणि ते खूप चांगल्या  job ला होते म्हणुन मी आणि  वडिलांनी निर्णय घेतला की Agricultural Engg.च्या ॲडमिशन साठी प्रयत्न करायचा.पुण्याला जाऊन आम्ही 30% कोट्यातून डुप्लिकेट डॉक्युमेंटवर ॲडमिशन घेतली,या अटीवर की ओरिजिनल डॉक्युमेंट 10 दिवसात राहुरी कॉलेजला जमा करायचे.परत धुळ्याला गेलो, तेथे SSVPS कॉलेजने डॉक्युमेंट द्यायला नकार दिला.तेंव्हा मला वडिलांचा कायद्याच्या ज्ञानाचा अनुभव आला.भांडण झाले,शेवटी कॉलेजने डॉक्युमेंट परत केले आणि माझी ॲडमिशन Agricultral Engg.ला राहुरीत झाली.

        पहिल्या दिवशी वडील सोडायला आलेले,हॉस्टेल रूम अलॉटमेंट झाली आणि  संध्याकाळी सगळ्या विद्यार्थ्यांचे  पालक घरी निघून गेले.बरीच मुले होम सिकनेसमुळे रात्री रडली. मग सगळ्यांचा ग्रुप जमला,पण इथे तर अजुन एक संकट वाट बघत होत,कॉलेज चालू होतंय न होतंय तोपर्यंत,Govt. job च्या मागणीसाठी फायनल इयरच्या  विद्यार्थ्यांनी संप पुकारला.पहिले 3 महिने रोज सर्व Engg. चे विद्यार्थी सकाळपासून ते संध्यकाळपर्यंत युनिव्हर्सिटी गेट वर बसायचे.काही विद्यार्थी उपोषणावर ही बसले.हाईवे रास्ता रोको आंदोलन झाले.सर्व विद्यार्थ्यांना राजकीय कैदी म्हणून पोलीस घेऊन गेले.3 तास पोलीस स्टेशन ग्राउंड वर ठेऊन नंतर सोडून दिले.तेंव्हा मला कळालं की Agricultural Engg.ची अवस्था फार काही चांगली नाही,जॉब ही खुप कमी होते.सुदैवाने 3 महिन्यांनी कॉलेज सुरु झाले.त्यावेळी रॅगिंग पण खूप असायची.पुर्ण वर्षभर रॅगिंग झाली.खुप दिवस रडलो. एके दिवशी अचानक किरण भाऊ (मोठा भाऊ) आणि त्याचा मित्र भेटायला आले. त्यांना जाणवलं की आमची अवस्था खुप वाईट आहे,पण सर्व मित्रांनी त्यावेळी सांभाळुन घेतलें.मला नंतर कळालं  की घरी गेल्यानंतर भाऊ आणि आई खूप रडले.आई वडिलांच्या मागे लागली की त्याला परत घरी आणा.पण माझी हिम्मत अजून वाढली होती.सर्व काही सहन केलं कारण ठरवलं होत की संयम ठेऊन जगायचं, हे दिवस पण निघुन जातील. 

        खुप मेहनतीने  सुरवातीचे 2 वर्ष  युनिव्हर्सिटी  टॉपर झालो.3rd इयर ला जाणवायला लागले कि आता फायनल इयर नंतर काय? जॉब मिळाला नाही तर काय? ठरवलं कि IIT M. Tech.साठी प्रिपरेशन करायचे आणि त्यादृष्टीने अभ्यासाला सुरुवात केली,२ वर्ष खुप मेहनत घेतली.माझ्या रूम मध्ये प्रत्येक भिंतीवर फॉर्मुले लिहिलेले होते कारण मला रात्री कधीही जाग आली आणि मला एखादा फॉर्मुला नाही आठवला तर तो दिसावा म्हणून.बॅच मधल्या सर्व मित्रांनी खुप सपोर्ट केला.माझा वेळ वाचावा म्हणून मित्र चहासुद्धा पॅक करून रूममध्ये आणून द्यायचे,कारण आधीच्या बॅचच्या GATE स्कोरच रेकॉर्ड मोडायचं टार्गेट माझ्या बॅचने मला दिले होते.रिझल्ट लागला आणि सर्वांच्या प्रयत्नांना यश आले.मी कॉलजेचे सर्व जुने रेकॉर्ड ब्रेक केले होते. 
GATE (Entrance exam for IIT) percentile score होता 99.3, All India rank 3,Topper in Maharashtra state.रिझल्टचा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही.त्या दिवशी  पॅरेण्ट डे असल्या कारणाने सगळ्या विद्यार्थ्यांचे पालक  आलेत होते.माझ्या घरचे पण सर्व जण होते.मी आणि माझे काही मित्र रिझल्ट चेक करायला शहरात सायबर कॅफेमध्ये गेलो. वेबसाईट वर सर्वांचे रिझल्ट पाहिले आणि आम्ही शॉक झालो.सगळ्यांच्या नंबरवर एकच वाक्य “Sorry you are not qualified”.सगळे सुन्न झाले.आम्ही शहरातून हॉस्टेल वर आलो,मी काहीच न बोलता सरळ रूममध्ये गेलो आणि रडायला लागलो,मला बघुन आईपण रडायला लागली.काही वेळाने माहिती आली की कॉलेजच्या एका सरांनी रिझल्ट चेक केला आणि मी All India 3rd आलो आहे.माझा विश्वासच बसेना.मी सरळ सरांना फोन लावला तेंव्हा कळाले की वेबसाईटमध्ये काही तरी technical problem होता त्यामुळे ते सेम वाक्य दाखवत होते.मग काय सगळ्यांनी मिळुन मला डोक्यावर घेतलं  आणि कॉलेज कॅम्पसमध्ये मिरवणूक काढली.त्यावर्षीच्या सोशल गॅदरिंगच्या उद्घाटनाचा मान वडिलांना मिळाला.खुप लोकांनी मेसमध्ये जेवताना,आई आणि वडिलांना गुलाब जामून खाऊ घातले.वडिलांची शुगर 350 च्या वर गेली होती.  आनंदाश्रू डोळ्यात मावत नव्हते. खुप आनंदाचा दिवस होता माझ्यासाठी आणि सर्व घरच्यांसाठी कारण सगळ्यांच्या त्यागाची परतफेड झाली होती.अभ्यासाव्यतिरिक्तही खुप काही शिकायला मिळाले.हॉस्टेल लाईफ व रॅगिंग पण खुप काही शिकवून गेले.जिवाभावाचे मित्र जोडले गेले. त्यानिमित्ताने सिनियर विद्यार्थ्यांशी रिलेशन वाढले,बोल्डनेस आला. प्रत्येक  गोष्टीकडे  बघण्याचे दोन दृष्टिकोन असतात,पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह.तुम्ही ते कसं  बघताय ते ठरवेल की त्याचा  तुमच्यावर काय परिणाम होईल.

      काही दिवसांनी,फायनल इयर इंजिनीरिंग चा रिझल्ट लागला आणि मी युनिव्हर्सिटी टॉपर झालो होतो.घराच्या सर्व लोकांच्या उपस्थितीत कृषी मंत्र्यांच्या हातून 2 गोल्ड मेडल विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात प्रदान करण्यात आली.पुढचे काही दिवस वेगवेगळ्या न्यूज पेपर मध्ये न्यूज पब्लिश झाली,सत्कार समारंभ झाले.जे मला ओळखत पण नव्हते अशा वेगवेगळ्या गावातुन अभिनंदनासाठी लोकांचे पत्र आले.राहुरीत शिक्षण पुर्ण करू शकलो याचे श्रेय हे घराच्या लोकांना जाते.बऱ्याच वेळेस,मी घरी पैसे मागितले आणि सांगितले की मनी ऑर्डर करा तरी वडील सगळे काम सोडून लगेच दुसऱ्या दिवशी यायचे,कारण आई वडिलांना नेहमी वाटायचे की पैसे नसल्याने मला प्रॉब्लेम होत असेल.वहिनी आणि लहान बहिणीने प्रत्येक वेळेस येताना खाऊ तयार करणे,माझी बॅग भरून देणे सर्व काही आनंदाने केले.

        आता पुढचा टप्पा  होता IIT M.Tech.चा आणि तो पण  खुप लांब वेस्ट बंगाल येथे  खरगपूरला.आतापर्यंतच्या अनुभवाने खुप काही शिकविले होते त्यामुळे मनाने पुर्ण तयारी करून गेलो.M.Tech.च्या दोन ही वर्षाला बॅचमध्ये टॉपर झालो.कॅम्पस इंटरव्यू मधुन सिलेक्शन झाले पण तेही चेन्नई येथील TAFE कंपनीमध्ये,तरी ठरवले जायचे म्हणून.मला ट्रेनमध्ये बसवायला सगळे घर यायचे जळगावला.सगळ्या नातेवाईकांमध्ये आश्चर्य वाटायचे कि इतक्या दूर कसा राहतोय मुलगा आणि घरचे पण कसे पाठवताय.दोन वर्ष चेन्नई ला काढली.नंतर एक्सपेरियन्स वाढल्याने कंपन्या बदलल्या,बॉश ग्रुप अहमदाबाद,जॉन डियर पुणे  आणि आता महिंद्रा अँड महिंद्रामध्ये सिनियर मॅनेजर,प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणून कार्यरत आहे.खुप लोकांचे,विद्यार्थ्यांचे कॉल येतात,जास्त करून सगळ्यांना रेडिमेड जॉब हवा असतो. पण फार कमी विद्यार्थी किंवा पालकांचे फोन येतात ते गायडन्स साठी,डायरेक्शनसाठी. मित्रहो,सध्या जगात खुप संधी उपलब्ध आहेत फक्त गरज आहे ती प्रयत्न करण्याची.
“There is no short-cut for success and no replacement for hard work.”

 You should believe in yourself.

क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही.

       I would like to take this opportunity to thank all people (my wife Poonam,my sweet daughter Ovi,my family members,teachers, friends,relatives and many more…) who supported,helped and guided me from my childhood till today in my ups and down during different phases of my life.

       Quoting the famous quote which applies to all of us
“And Miles to go before we sleep”.

Regards,
Vinod Mahajan Son of Prakash Krishna Mahajan (Sir) 
A/P: Lohatar Tal. Pachora Dist.Jalgaon

Senior Manager, Research and Development, 
Construction Equipment Division
Mahindra and Mahindra
*********************************************************************************************
♻ Email प्रेरणा एक सुवर्णपान
preranaeksuvarnpan@gmail.com

♻ whatsapp प्रेरणा एक सुवर्णपान
भरत पाटील- 9665911657

प्रेरणा एक सुवर्णपान Broadcast ला ॲड व्हायचे असल्यास 9665911657  नंबरवर whatsapp करा.दर पंधरवाड्यात दीपस्तंभ आपल्या भेटीला...स्वअनुभव रेखाटत

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

No comments:

Post a Comment