जिद्द एक प्रेरणा - निंबा पाटील

🍂🎯🍂🎯🍂🎯🍂🎯🍂🎯🍂
                               


















                                                              




प्रेरणा एक सुवर्णपान
दि.१ जुलै २०१७

                                                           जिद्द एक प्रेरणा - निंबा पाटील

      लहान होतो.झोळीत झोपायचो.डोळे आले होते.परिस्थिती इतकी वाईट होती कि दोन्ही डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना घट्ट चिकटलेल्या होत्या.घरच्यांचे सर्व प्रयत्न सुरु होते कि मी डोळे उघडावे,परंतू डोळे उघडवू शकत नव्हतो.पंधरा दिवस झाले परंतू परिस्थिती जैसे थे होती.घरच्यांची चिंता वाढत चालली होती.झोक्यातून त्यांचे बोलणे ऐकायचो.अजूनही ते आठवते.डोळ्यांचे काही खरं नाही असा साधारणतः सूर होता.दिलीप माळी माझ्या घरासमोर रहायचा.तो रोज मला झोळीतून काढून थोडावेळ बाहेर फिरवायचा.असाच एक दिवस तो मला झोळीतून काढतांना मी त्याच्या हातातून पडू नये म्हणून मला पकडून तो जोराने वळला.वळल्यामुळे माझे डोके अतिशय जोरात घरात असलेल्या लाकडी खांब्यावर आदळले.डोक्यावर प्रचंड आघात झाला त्याचा परिणाम म्हणून मी खटकन डोळे उघडले पण रडलो नाही.दिलीपला आनंद झाला.त्याने घरच्यांना सांगितले.सगळ्यांना खूप आनंद झाला. दिलीपचे खूप कौतुक झाले का तर त्याच्या प्रयत्नाने मी डोळे उघडले.मी जग पुन्हा नव्याने पाहू लागलो.शिकवण काय मिळाली तर काही अपघातांमुळे होणाऱ्या आघातांचे सकारात्मक परिणाम निघू शकतात आणि नेहमी सकारात्मक विचार करायला सवय लागली.

   कल्पक युक्त्या खूप असायच्या डोक्यात.अशीच एक कल्पक युक्ती डोक्यात आली.माझा भाऊ जितु पाटील आणि मी हॉटेल हॉटेल हा खेळ खेळायचा ठरवला.आमच्या बांबरूड रस्त्याला केळीच्या बागेत हॉटेल टाकायचे ठिकाण निश्चित झाले.हॉटेल तयार झाले.पहिला पदार्थ भजी करायचा ठरला.जितु पाटीलला भजी फार आवडायची.मग त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची चर्चा झाली.चूल,सरपण,कढई,बेसन पीठ,तेल,कांदा मग एक एक करून सर्व गोष्टी जमा करण्याचे ठरले.बाजूला कुर्हाड आणि केळीची खोड पडलेली होती.ते बघून जितु पाटीलला युक्ती आली कि मी कुऱ्हाड घेवून केळीची खोड कापून सरपण तयार करतो.मग मी म्हटले कि तू सरपण तोड मी जमा करतो.आम्हा दोघांना खूप आनंद झाला.जोरदार काम सुरु झाले.सरपण जमा होवू लागले अन तळलेली भजीही डोळ्यासमोर येत होती.पण हे करतांना दोघांचा समन्वय चुकला.जितु पाटीलने कुऱ्हाड खोड तोडण्यासाठी वर केली आणि मी त्याच वेळेस खोडाचा तुकडा घेण्यासाठी वाकलो.कुऱ्हाड सरळ माझ्या डोक्यात अगदी बरोबर मध्ये.जोरदार फटका बसल्याने उभा राहून डोके चोळत होतो.तोपर्यंत रडलो नाही.दोन्ही हात डोक्यावरून खाली आणल्यावर त्यांच्याकडे पाहिल्यावर दोन्ही हात रक्ताने ओले झाले होते.ते बघून रडायला लागलो आणि बेशुद्ध पडलो.नंतरचे काही आठवत नाही.शुद्धीवर आल्यावर डॉ.परदेशी विचारत होते,”काय रे कसे वाटते?”.मी म्हटले बरे वाटते.मी त्यांना पुन्हा म्हटले”मला परत शेतात सोडता का”.ते म्हणाले,”अरे,तुझ्या डोक्याला सहा टाके पडले आहेत”.घरी आल्यावर माझ्या बाबांनी सर्व घटनाक्रम समजून घेतला आणि सांगितले,कि खेळा आणि कल्पकतेने विचार करणे सोडू नका,एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती पूर्ण करण्यासाठी कितीही अडचण आली तरी माघार न घेता ती पूर्ण करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करायचे.खचून जायचे नाही.बाबांनी सांगितलेली गोष्ट मनावर बिंबवली गेली.आणि नंतर ती निरंतरपणे सरावात आणली.पुढे घरातच हॉटेल हॉटेल खेळ खेळलो.डोक्यावर पट्टी असतांना...

       बाल्यावस्था चालू होती.पहिली दुसरीत असेन.अभ्यास मोजकाच.खेळणे भरभरून..असेच एकदा खेळता खेळता ग्रामपंचायतीच्या गच्चीवर आम्ही चार पाच मुले पोहोचलो.त्यावेळेस दर्ज्या नव्हता.गच्चीवर जायला जिना जे.डी.सी.सी.बँकेच्या बाजूला होता.पण बँकेच्या गच्चीवर जाण्यासाठी एक लहान भिंत होती.हि भिंत लहान मुलांकरिता अत्यंत धोकादायक होती.कारण तोल गेला तर एकतर बँकेच्या जिन्यात नाहीतर कोंडवाड्यात.कोंडवाडा सुमारे वीस फुट खोल होता.जीव धोक्यात घालून आम्ही ग्रामपंचायतीच्या गच्चीवरुन बँकेच्या गच्चीवर येण्याचा खेळ खेळू लागलो.खेळतांना लक्षात आले कि कोंडवाड्यात वाळूचा ढीग आहे.सुचली भन्नाट कल्पना अन ती हि डोक्यात धुमाकूळ घालू लागली आणि खेळ बदलायचा ठरला.खेळ असा होता कि गच्चीवरून कोंडवाड्यातील वाळूवर उडी मारणे.उडी मारल्याने आपल्याला काही होणार नाही कारण आपण वाळूवर उडी मारतोय अशी कल्पना.वीस फुट खोली.नंबर ठरले.एक नंबरचा भिंतीवर उभा राहिला.त्याने खाली बघितले आणि म्हणाला,”जाय रे भो,मी नही मारणार पहिले उडी.मी दुसरा नंबरले मारसू”.सुंदर अश्या बालपणात ठरलेले नियम मोडणे मान्य असायचे.मग कोण मारणार पहिल्यांदा उडी? मी पुढाकार घेतला.थोडा घाबरत होतो.पण दृढनिश्चय केलाच होता.मारली उडी बरोबर वाळूवर.कोसळलो.परंतु वाळूच्या ढिगाला उतार असल्याने गटांगळ्या खात जमिनीवर आलो.नाकातोंडात,कानात,डोळ्यात वाळूचे कान गेले.थोडावेळ लागला सावरायला.माझी अवस्था बघून भिंतीवरचे शूरवीर घरी पळून गेले.तेवढयात माझ्या पाठीवर जोराने एक रट्टा पडला.एक जेष्ठ बाबा म्हणत होते,”एकुलता एक शेना रे तू,तुना मायबापना!,तुले काही व्हई जातं तं तर त्या काय करतात”.बाबाचा राग प्रचंड आला होता,परंतु म्हणणे पटले होते.मग ठरवले,कि आयुष्यात पुढाकार तर घ्यायचाच पण त्यातले धोके ओळखूनच.प्रचंड धोका असेल तर टाळायचं.मोजका आणि सावरून घेण्यासारखा धोका असला तर पुढे जायचेच.कारण त्यातून अनुभव,यश किंवा प्रोत्साहन मिळायची शक्यता जास्त असू शकते.उडी मारण्यात पुढाकार घेण्याचा उद्देश,मी सुचवलेला कल्पक खेळ यशस्वी करून दाखविणे असा होता.परंतु धोका प्रचंड होता.    

            असेच एकदा डोक्यात आले,आपले स्वतःचे घरी एक वाचनालय असावे.काही कॉमीक्स जमा करून एका फळीवर व्यवस्थित रचली,पण मन रमेना.आणखी काही पुस्तके पाहिजे म्हणून काय शक्कल लढवता येईल असा विचार करू लागलो.त्यावेळी चौथीत होतो.शाळेत एका लाकडी पेटीत गोष्टींची पुस्तके असल्याचे लक्षात आले.गुरुजी ती पुस्तके काही बाहेर काढायचे नाहीत आणि पेटीला खूप जपायचे.पेटीचे मागचे बिजागरे खोलून काही पुस्तके पेटीतून माझ्या वाचनालयात जावून बसली.पुढे हिम्मत वाढली.अभ्यासाची पुस्तके चोरून ते सुनील परदेशीला विकले.आलेल्या पैशांनी छोटी सायकल भाडयाने घेवून सायकल शिकायचा प्रयत्न केला.एक दिवस चोरी पकडली गेली.गुरुजी व वडिलांनी खूप धुलाई केली.हेतू चांगला होता पण मार्ग चुकीचा होता.हेतू काय तर आपले वाचनालय असावे व सायकल शिकावी,पण ते पूर्ण करण्यासाठी चोरी करण्याचा मार्ग अतिशय चुकीचा होता.आयुष्याला वळण लावणारा एक महत्त्वपूर्ण धडा शिकलो.    

            चौथीतीलच गोष्ट अ तुकडीला घुले गुरुजी शिकवायचे आणि ब तुकडीला हाजी गुरुजी.छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विषय स्वतंत्र पुस्तकाद्वारे शिकवला जायचा.घुले गुरुजी तो अत्यंत सुंदर गोष्टरूपी शिकवायचे.युद्धाचे वर्णन अश्या पद्धतीने करायचे कि तास संपला कि मुले फुटपट्टी तलवार समजून युद्धाला सुरुवात करायचे.इतका उत्साह आणि अभिमान ते जागृत करत.पुढे मी घुले गुरुजींच्या वर्गात बसू लागलो.हाजी गुरुजींचा मी विद्यार्थी पण अ तुकडीत बसू लागलो.हाजी गुरुजींच्या ते खूप उशिरा लक्षात आले.दोन महिने घुले गुरुजींच्या वर्गात बसल्यानंतर एक दिवस हाजी गुरुजी मला शोधत घुले गुरुजींच्या वर्गात आले.प्रचंड रागात होते.हे असे करणे म्हणजे त्यांचा अपमान आहे असा त्यांचा समज झाला.मला मारत मारत त्यांच्या वर्गात नेले.मीपण पठ्ठ्या कमी नव्हतो.हाजी गुरुजींचे लक्ष थोडे दुसरीकडे गेले की मी पसार.परत हाजी गुरुजी मला मारत मारत नेणार.मी परत त्यांच्या वर्गातून पसार.हा खेळ खूप दिवस चालला.शेवटी माझे वडील,हाजी गुरुजी व घुले गुरुजी यांची मिटींग झाली.त्यात मी घुले गुरुजींच्या वर्गात बसणार हे निश्चित झाले.वरवर वाटता हा खट्याळपणा वाटतो.पण व्यवस्थित विचार केला तर मला कोण शिकवणार ह्याचा निर्णय मी घेत होतो.हे परंपरेच्या खूप विरुद्ध होते पण मला समजणे मोलाचे होते.आयुष्यात तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल तर तशी बोलण्याची तुमच्यात हिम्मत हवी,त्यामुळे तुम्हाला फायदाच होतो आणि न बोलण्याने नुकसान....

       संवादाला किती महत्त्व असते याचा प्रत्यय पाचवीत गेल्यानंतर आला.A,B,C,D  पाचवीत शिकायला सुरुवात झाली.गोसावी सरांनी Z काढायला लावला.परंतू व्यवस्थित ऐकू न आल्याने सरांना परत विचारले कि काय काढू?त्याचा राग सरांना आल्यामुळे परत धुतला गेलो.त्याचा परिणाम असा झाला कि मी वर्गात अतिशय लक्षपूर्वक ऐकायला लागलो.नंतर या सवयीमुळे संवाद खूप सुधारले.आणि हो,धुतल्या जाण्याच्या प्रक्रियेमुळे पक्का होत होतो.

       पाचवी अ तुकडीत पहिला आलो.सहावीत मात्र ब तुकडी मिळाली.मला अ तुकडी पाहिजे होती,कारण अ तुकडी भारी समजली जायची.सरांना भेटण्याचे ठरविले.चौथीतील घुले गुरुजी आणि हाजी गुरुजींमुळे झालेली धुलाई यामुळे आठवली.थोडा विचारत पडलो.धाडस करून सरांना विचारले कि सर मला अ तुकडी पाहिजे.सरांनी समजावून सांगितले.अ आणि ब या दोन्ही तुकड्या सारख्या असतात.मलाही पटले.मनाशी ठरविलेच अ तुकडीच्या मुलांच्या गुणांपेक्षा ब तुकडीच्या मुलांचे गुण जास्त ठेवायचे.ते सहावी आणि सातवीत खरे करून दाखविले.अडचणीत संधी शोधण्याचा मा माझा पहिला प्रयत्न होता.मित्रहो,अडचणींना घाबरू नका.त्यात संधी दडलेल्या असतात.शांतपणे त्यांना सामोरे जाऊन त्यातील संधींना शोधा आणि त्याचे सोने करा.लोकमान्य टिळकांवर वत्कृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा व पहिला नंबर अश्या तीन कंपासपेटीरुपी बक्षीस पंधरा ऑगस्ट ला निश्चित असायचे.एन.आर.पाटील सरांनी एकदा सहावीत असतांना आठवीच्या वर्गात गणित सोडविण्यासाठी बोलावले.या विश्वासाला मी पात्र ठरलो नाही याचे खूप वाईट वाटले आणि आजही वाटते.सर म्हटले,’होते असे,काही चिंता नको’.परंतु त्या प्रसंगाने अभ्यासात आपल्या वर्गाची पुस्तके न वाचता पुढच्या वर्गाची पुस्तके वाचायची सवय लागली.मोठ्या मित्रांच्या सहाय्याने ‘मृत्युंजय’सारखी कादंबरीचे वाचन झाले.दोस्तहो,घडलेला प्रत्येक खराब प्रसंग काहीतरी नवीन शिकण्याची नवीन संधी देवून जातो.

         वडिलांच्या खूप लवकर लक्षात आले होते कि मला तांत्रिक गोष्टीत खूप रस आहे.त्यांनी मला तांत्रिक शिक्षण देण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा टेक्निकल माध्यमिक विद्यालयात शिकण्यासाठी पाठविले.आठवी इयत्तेपासून बेलगंगा येथे होस्टेलमध्ये राहणे सुरु झाले.पहिल्यांदा घरापासून लांब राहत होतो.घरच्यांची आणि लोह्टारच्या मित्रांची खूप आठवण येत होती.पहिला एक महिना रडण्यात गेला.वीस मुलांची एक बॅच आठवी,नववी,दहावीला असायची.एकूण साठ मुले होस्टेलवर असायची.रडतांना मी एकटा रडायचो नाही,तर सगळेच वीस मुले रडायची.आता आठवले कि खूप हसू येते.मोठे मामा मुख्याध्यापक होते.शिस्तीने अतिशय कडक.त्यांनी विचारले कि,“घरी परत जायचे का?”.मी हो म्हटले.त्यांनी वडिलांना बोलावून घेतले.त्यांनी समजावून सांगितले पण मी ऐकत नव्हतो.शेवटी वडिलांनी केविलवाणा चेहरा करत मला परत नेण्याचे ठरविले,त्याचवेळेस मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघून निर्णय बदलला आणि तेथेच राहण्याचे मान्य केले.मी बेलगंगा होस्टेलला राहायला लागलो.या वेळेस बाबांचे शब्दही आठवत होते कि एकदा पुढे पाऊल उचलले कि मागे फिरायचे नाही.मग हळूहळू बेलगंगेच्या वातावरणात रमलो.मामांची,मामींची खूप मदत झाली.दोघंही काळजी घ्यायचे.मित्रांनो,बदल हा सहज नसतो.त्या बदलामुळे तुमच्या आयुष्यात जर बदल घडणार असेल तर तो आत्मसात केला पाहिजे.होस्टेलचे जीवन खूप छान होते.निर्णयक्षमता,पुढाकार घेण्याची वृत्ती,मित्रांमध्ये मिसळून जाणे,स्वतःची कामे स्वतः करणे,एकटे प्रवास करणे,बोर्डिंग,भोजनालय,वसतिगृह यांचे कोणतेही वाटेला आलेल्या कामाचे काटेकोरपणे नियोजन करणे,भोजनालायाचा बाजार करणे,भोजनालायास्ठी मिलवरून लाकडे विकत आणणे,इ.बाबींमुळे स्वतःमध्ये बदल घडला.आत्मविश्वास वाढला.  स्वत:ची कपडे स्वत: धुवावी लागायची, इस्त्री करावी लागायची. छोटयाशा पेटीत सर्व वहया, पुस्तकांसह बाकीच्या पर्सनल गोष्टी काटेकोरपणे रचून ठेवणे, अंथरुणाच्या सकाळी उठल्यानंतर घडया करुन ठेवणे इत्यादी. बाल्यावस्थेतून किशोरअवस्थेतला हा प्रवास अतिशय सुंदर होता. खरं सांगायचं म्हणजे हा स्वत:ला भविष्यासाठी तयार करण्याचा काळ होता व मी तो पुरेपूर सदोपयोगी आणला.7 वी पर्यंत लोहटारच्या शाळेत नेहमी पहिला नंबर कायम ठेवला होता.परंतु होस्टेलला माझ्यासारखे वेगवगळया गावातून पहिला नंबर आलेले विद्यार्थी 8 वीला एकत्र आले होते. बार उंचावला गेला होता. स्पर्धा अत्यंत चिकट झाली होती. होस्टेलला निवड मुळातच पात्रता परिक्षा घेऊन झाली होती. त्यामुळे सगळे हुशार विद्यार्थी होते. तरीही 8वीला पहिला नंबर कायम ठेवला. 9वीला मात्र दुसरा आलो. दुसरा नंबर येण्याला अपयश समजलो. हसू येते आता. आयुष्यातील पहिले अपयश. घात झाला होता. हे होऊच कसे शकते वगैरे वगैरे विचार मनात आले. पहिले (उगीच मानलेले) अपयश कसेबसे पचवले. हा हा हा... खरे म्हणजे मोठे अपयश अजून आयुष्यात बघयचे होते. 10वीत ठरविले की उसळून पहिला नंबर पुनर्स्थापित करायचा आणि केलाही. मामांना विश्वास ठेवायला थोडे अवघड गेले पण मामींना खात्री होती की मी 10वीला पहिला नंबर परत मिळवणार. 83.85% मिळवून दहावीला पहिला आलो.

माजी विद्यार्थी होस्टेलला भेट दयायचे. असाच एक माजी विद्यार्थी, मी नववीत असतांना होस्टेलला येवून आम्हा थोडयाश्या जीवांना, पाखरांना ३ वर्षाच्या डिप्लोमा इन इंजिनियरींग महिमा शिकवून गेला. आणि तेव्हाच ठरविले होते की काहीही झाले तरी दहावीनंतर ३ वर्षात डिप्लोमा करुन इंजिनियर व्हायचे आणि आपल्या पायावर उभे राहायचे. दहावीला चांगले मार्क्स मिळाल्यामुळे वडीलांसकट सगळे ओळखीचे आणि नात्यातले लोक १२ वी सायन्स्‍ करायला सांगत होते. मग माझा अतिशय पक्का निर्णय नववीत असतांनाच झाला होता डिप्लोमा करण्याचा. नाशिक येथे डिप्लोमा इन मॅकॅनिकल इजिनियरींग शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेतला. खरं म्हणजे मला जळगाव कॉलेज पाहिजे होते. परंतु प्रवेश पत्रकात नासिक विभाग असल्याने व तांत्रीक शिक्षणाच्या यादीत मी मेरिट लिस्टमध्ये असल्याने माझा प्रवेश नाशिक कॉलेजमध्ये फिक्स करण्यात आला हाता. प्रवेशा दरम्यान मी जळगाव कॉलेजची विनंती केली, परंतू ती फॉर्मवर जळगांव कॉलेज न लिहील्याने अमान्य करण्यात आली. अपघाताने मी नाशिकमध्ये प्रवेश केला आणि हा अपघात माझ्या आयुष्याचा सुरेख टर्निंग पॉईंट ठरला.

नाशिकमध्ये रुम झाली, खानावळ ठरली सूरुवातील प्रचंड पाऊस पडला. इतका पाऊस बघण्याची सवय नव्हती. पावसाने घाणीचे व डासांचे साम्राज्य तयार झाले होते. त्यामुळे मी सुरुवातीलाच आजारी पडलो. डबल टाईफाईड झाला होता. सुनिता काकूंनी खूप काळजी घेतली. अशक्तपणा खूप आला होता. साधारणत: दोन महिने लागले पूर्ण बरा व्हायला. डिप्लोमा कॉलेजचे सुरुवातीचे अत्यंत महत्वाच्या दिवसात आजारपणामूळे गैरहजर राहिल्याचा फटका बसला. अभ्यासक्रम पूढे निघून गेला होता आणि त्यातून सगळे शिक्षण इंग्रजीतून खूप अवघड गेले. पहिल्या वर्षी चार विषयात पास न झाल्यामूळे नापास झालो. जीवनातील पहिले खरेखूरे अपयश. वडिल विचारायचे पहिल्या वर्षी फर्स्ट क्लास मिळेल का? मी त्यांचे मन दुखवायला नको म्हणून हो म्हणायचो. आतून मला माहित होते की, मी नापास होणार आहे. परिक्षेनंतरच्या सूटटयामध्ये स्वत:ला खूप तयार करुन घेतले. पहिले मोठे अपयश पचविण्यासाठी. निकाल लागला, वडिल सांगायचे की निकाल घेऊन ये. मी टाळायचो. शेवटी एक दिवस ते स्वत:च माझ्या कॉलेजला गेले व निकाल घेऊन आले. त्यावेळेस आम्ही पाचोऱ्याला राहायचो. ते घरी आले. मी विचारले काय निकाल लागला?

  ते काहीही बोलले नाही. दोन तास गेले. वडीलांची गंभीर मुद्रा सांगत होती की माझा अंदाज खरा आहे. आणि वडीलांनी अतिशय गंभीर चेहऱ्याने सांगितले की मी नापास झालो आहे. त्यांच्यासाठी हे सगळं म्हणजे आकाश कोसळण्यासारखं होतं. 10वी पर्यंत पहिला नंबर (9वी सोडून) आलेला माझा मुलगा डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला फेल झाला, हयावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता. त्या व्यतिरिक्त काहीही बोलले नाही. पण 2-3 दिवस त्यांच्याच विचारांमध्ये हरवलेले असायचे. आईचे आजारपण, त्यासाठी लागणारा पैसा, त्यातून माझ्या शिक्षणासाठी केलेली पैशांची ओढाताण आणि निकाल काय तर मुलगा पहिले वर्ष नापास. मी मात्र सराईत, अट्टलपणे माझे अपयश पचवले होते. किंबहूना मी 2-3 वेळेस स्वत:वर हसलो, की काय निंबा पाटील, 10 वी पर्यंत डिंग्या मारत होतास आणि डिप्लोमा पहिले वर्ष फेल. वडीलांशी बोललो. म्हटलो ताण घेऊ नका. नापास झालो, स्वर्गवासी नाही. विश्वास होता स्वत:च्या कर्तृत्वावर, क्षमतेवर. म्हटलो यापुढे तुम्ही सांगायचे तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत. ते सुध्दा वर्ष सुरु व्हायच्या अगोदर. अपार प्रयत्न करुन मी ते मिळविण्याचा प्रयत्न करेन. वडील शांत झाले आणि मीही. हया एका अपयशामुळे जगात यशाला किती किंमत आहे हे पुरेपुर कळले. काही लोकांनी टोमणे मारले. “भलता उडया मारी ऱ्हायंता, गया नापास हुई.” ते शब्द कानात पार्कींग करुन ठेवले. वेळोवेळी, अधून मधून आठवायला आणि प्रेरणा घ्यायला. राग नाही आला त्यांचा, धन्यवाद म्हटलो त्यांना. वडील म्हटले फर्स्ट क्लास मिळवता येईल का दुसऱ्या वर्षाला. तो मिळवला. वडीलांचा आत्मविश्वास परत येत होता. म्हटले डिस्टींक्शन मिळवून पहिल्या 3 मध्ये येता येईल का? ते ही मिळवले. डिस्टींक्शन मिळवून कॉलेजमध्ये दुसरा आलो होतो. त्या सर्व प्रकारात वडीलांना काय पाहिजे व मला स्वत:ला काय वाटते आणि स्वत:चा पक्का आणि दृढ निर्णय करुन ते साकार करणे ही माझी पॅशन झाली होती. दुसऱ्या लोकांना काय वाटते हया गोष्टी माझ्यासाठी क्षुल्लक झाल्या होत्या.

    तिसऱ्या वर्षाचा निकाल यायचा बाकी होता. महिंद्रा कंपनी आमच्या कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्युसाठी आली होती. लेखी परिक्षा झाली, तोंडी परिक्षा झाली. तोपर्यंत मी स्वत:ला कॉलेजमध्ये लो-प्रोफाईलला ठेवले हेाते. कारण पहिले वर्ष नापास, दुसरे वर्ष जेमतेम फर्स्ट क्लास, बाकीची मुले आणि मित्र खुप पुढे. महिंद्रामध्ये सिलेक्शनची यादी कॉलेजच्या बोर्डावर लागली. माझे मित्र निकाल बघण्यासाठी गर्दीत पुढे. मी मागेच उभा होतो.कारण तोपर्यंत मला अतिशय कमी अपेक्षा ठेवायची परंतू प्रयत्नांची पराकाष्टा करायची सवय लागली होती. आमच्या 6-7 मित्रांचा ग्रुप होता. एक मित्र गर्दीतून बाहेर आला आणि म्हटला आपले कुणाचेच सिलेक्शन झाले नाही. हिरमोड झाला होता. तेवढयात दुसरा मित्र आला व म्हटला,“अरे निंबाचे सिलेक्शन झाले आणि तो यादीत टॉपलिस्ट मध्ये आहे”. मुळात पहिल्या मित्राने यादी खालच्या क्रमांकापासून बघत पहिले 3-4 क्रमांकाची नावे न बघताच घोषीत केले होते की आपले सिलेक्शन झाले नाही. 30 जून 1997 ला निकाल लागला आणि 1 जुलै 1997 ला महिंद्रात रुजु झालो. समांतर प्रक्रियेत बी.ई.साठी फॉर्म भरले. बी.ईची प्रवेश प्रक्रिया ऑगस्टमध्ये होती. वडीलांना विचारले काय करु, नोकरी करु की बी.ई.साठी जाऊ. वडील म्हणायचे तू ठरव. असे पहिल्यांदा दिसत होते की वडील अपेक्षा व्यक्त करत नव्हते. मी ही थोडा गोंधळलो होतो. मग ठरवले, जर पुणे किंवा मुंबईच्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले तर बी.ई. करायचे नाहीतर नोकरी करायची व पार्टटाईम बी.ई. करायची. तोपर्यंत कंपनीत मोठया मोठया मशिन्स व डाईस बघुन खुप प्रभावित झालो होतो. त्यातून किती शिकू आणि किती नको असे झाले होते. ऑगस्टमध्ये बी.ई.च्या ॲडमिशनसाठी एका मित्राला राधेशाम रत्नपारखीला घेऊन पुण्यात गेलो. रात्री उशिरा होणार होती प्रवेश प्रक्रिया. रांगेत उभा होतो आणि श्याम माझ्यामागे. श्याम मला एक वर्ष पुढे होता. डोळयांसमोर पुण्या, मुंबईतल्या एकेका चांगल्या कॉलेजचे ॲडमिशन फुल होताना बघत होतो. माझा काऊंटरला नंबर येईपर्यंत सगळी चांगली कॉलेजमध्ये ॲडमिशन फुल झाले होते. शासकीय कॉलेज अमरावती आणि कर्जत बाकी होते. काऊंटरवरुन विचारणा झाली, कुठले कॉलेज पाहिजे? मी डोळे मिटले, विचार केला व म्हटलो, “मला ॲडमिशन नको”. आणि माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्वपूर्ण अध्याय सुरु झाला. वडीलसुध्दा खुश झाले व म्हटले की चांगला निर्णय घेतलास. कारण बी.ई. च्या शिक्षणाचा खर्च त्यांना अतिषय डोईजड जाणार होता. त्यात आईचा आजारपणाचा खर्च आणि बहिणींचे लग्न त्यांना डोळयांसमोर दिसत होती. आणि मी नोकरी करुन त्यांना हातभार लागणार होता. हा एक माझ्या आयुष्यातला अचूक आणि निर्णायक प्रसंग होता. टर्निंग पॉईन्ट.

    महिंद्रात पहिले वर्ष ॲप्रेन्टीस आणि दुसरे वर्ष कंपनी ट्रेनी म्हणून होते. दोन वर्ष जर परफॉर्मन्स चांगला ठेवला तरच परमनंटचा चान्स होता. जीव तोडून कामाला लागलो. 2-2 शिफ्ट काम करायचो. डाई आणि प्रेस मशिन हया फिल्डमध्ये शिकायची खुप घाई झाली होती,कारण कॉलेजला त्याबद्दल काहीही शिकलो नव्हतो. साहेबही चांगले मिळाले होते. साहेब जे काम करतात ते पटकन शिकून त्यांना त्या कामातून मोकळे करण्याचा नेहमी प्रयत्न करायचो. जेणेकरुन ते पुढची जबाबदारी पूर्ण करु शकतील. पहिले वर्ष पूर्ण झाले कामाचा रिपोर्ट अत्यंत चांगला होता. शेवटचा इंटरव्ह्यु प्लॅन्ट हेड घेणार होते. त्यातून पास झाले तर दुसऱ्या वर्षात प्रवेश होणार होता. प्लॅन्ट हेड जे कंपनीचे जनरल मॅनेजर होते. त्यांनी संध्याकाळी इंटरव्ह्युला बोलावले.

    मी प्लॅन्ट हेडच्या कॅबीनमध्ये प्रवेश केला. इंटरव्ह्युला सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी मला जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरे चांगली दिली. कारण सुरुवातीचे प्रश्न हे टेक्निकल होते. नंतरच्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देता आली नाहीत. नंतरचे प्रश्न हे मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन आणि फायनान्सवर होते. माझ्या लक्षात येत होते की इंटरव्ह्यु होत नाहीये. मग मी त्यांना विनंती केली की मागच्या एका वर्षात मी जे काम केले, त्याबद्दल प्रश्न विचारा. कारण त्यावेळी मी ऑपरेटींग इंजिनिअर म्हणून काम करत होतो. मॅनेजर म्हणून नाही. माझी विनंती साहेबांना काही पटली नाही हे मी त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरुन ओळखले होते. त्यांनी हाय लेव्हलचे प्रश्न विचारणे सुरुच ठेवले. इंटरव्ह्यु संपला. निकाल दोन आठवडयांनंतर कळणार होता. परंतु माझ्या लक्षात आले हेाते की, दुसऱ्या वर्षीचा प्रवेश शक्य नाही. प्लॅन्ट हेड माझ्या इंटरव्ह्यु पेपरवर फायनल रिमार्कस् लिहीत होते आणि त्यावेळी मी “पुढे काय” हयाचा विचार करत होतो. साहेबांचा रिमार्क पूर्ण व्हायच्या आत माझा निर्णय पक्का झाला होता. पुणे किंवा मुंबईच्या चांगल्या कॉलेजमधून पेमेंट शीटमधून बी.ई. करायची. त्यावेळी पेमेंट शीटसाठी शासकीय वार्षिक फी रु.32000/- लागायची आणि फ्री शीट, जी मेरीटबेसवर मिळत असायची तिला रु.4500/- वार्षिक फी लागायची. महिना रु.3500/- पगार असल्याने सेव्हींग चांगले होते. पहिल्या वर्षाची फी तयार होती. वडीलांशी बोललो, ते म्हणाले तुला योग्य वाटेल तो निर्णय घे. वडीलांकडून जेवढे शक्य होईल, त्याव्यतिरिक्त पैसा लागणार होता. त्यासाठी बी.ई. करताना काहीतरी व्यवसाय करु असे ठरवले. आणि माझे महिंद्रातले पहिले एक वर्ष संपायला दोन आठवडे बाकी असताना बी.ई. प्रवेशाच्या पध्दतीला लागलो. महिंद्रात पहिल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आमच्या विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री. देवभानकर साहेब मी जेथे काम करत होतो त्या ठिकाणी मला भेटायला आले. त्यांचा चेहरा जरा गंभीर होता. ते मला बोलले काम थांबव आणि जरा बाजूला ये. मी बाजूला गेलो. त्यांना त्याच दिवशी कळाले होते की जनरल मॅनेजरने मला कंपनी ट्रेनी म्हणून दुसऱ्या वर्षासाठी घेण्याचे नाकारले होते. त्यांनी मला विचारले की तुझ्या इंटरव्ह्युमध्ये काय घडले होते. मी सर्वकाही त्यांना सांगितले. त्यांनी ते व्यवस्थित ऐकून घेतले व म्हणाले की निंबा, तुझा इंटरव्ह्यु चांगला झाला नाही हे त्याच दिवशी का नाही सांगितलेस मला? माझ्याकडे उत्तर नव्हते. देवभानकर साहेब म्हणाले की हा टूल आणि डायचा नविन प्लॅन्ट आहे. तुझ्या समोरच हया प्लॅन्टचे उद्घाटन झाले आणि हया प्लॅन्टसाठी घेतलेल्या नवीन इंजिनिअर्सच्या पहिल्या पाच बॅचमधील तु एक आहेस. 12 लोक हे जपानमधून प्रशिक्षीत होऊन मॅनेजरचे काम करतील. मग इंजिनिअरचे काम कोण करणार आणि तुझे काम चांगले आहे. पण तुझ्या इंटरव्ह्युबद्दल तु मला त्याच दिवशी सांगितले असते तर ही वेळ मी येऊ दिली नसती. मी म्हणालो असू द्या सर. माझा प्लॅन बी तयार आहे आणि प्लॅन सी पण. त्यांनी विचारले काय प्लॅन आहेत. मी म्हणालो बी.ई. करणार आणि धंदा पण. साहेब जोरदार हसले. म्हटले छान. पण जर तुला महिंद्रात दुसऱ्या वर्षी प्रवेश मिळाला तर काय करशील? मी म्हणालो की जर दुसऱ्या वर्षानंतर मला परमनंट करणार असाल तर मी महिंद्रा continue करेल, जो की माझा मुळ प्लॅन होता-Plan-A. साहेब म्हटले संध्याकाळी मला भेटल्याशिवाय घरी जाऊ नको. आणि दुपारी ते आणि 4-5 मॅनेजर लोक एका गाडीत बसून जनरल मॅनेजरला भेटायला गेले. आणि त्यांनी जनरल मॅनेजरची समजूत काढून माझा दुसऱ्या वर्षाचा प्रवेश निश्चित करुन आणला. संध्याकाळी देवभारकर साहेबांना भेटलो. ते म्हणाले की दुसऱ्या वर्षात चांगले काम कर म्हणजे मला तुला परमनंट करता येईल. जातांना शाब्बास म्हणाले, की तुझ्याकडे तुझे बॅकअप प्लॅन रेडी होते. तेव्हा मला Plan A, B, C चे महत्व कळाले. नंतर सवयच लागली. कुठलीही गोष्ट असो. प्लॅन करायची. तो प्लॅन सक्सेस नाही झाला तर असा विचार करुन दुसरा व तिसरा प्लॅन रेडी करुन ठेवायच. अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट वरील प्रकरणातून शिकलो. ती म्हणजे वेळेवर Communication करायची. देवभानकर साहेबांना जर त्याच दिवशी सांगितले असते तर पहिल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी माझी आणि सगळयांची ओढाताण झाली नसती.

    नंतर माझे करिअरमध्ये अपयश कधी बघितलेच नाही. जे ठरविले ते पूर्ण केले. हा लेख प्रकाशित होताना मी माझ्या करिअरचे 20 वर्ष पूर्ण करत आहे. 16 वर्ष महिंद्रात काम केले. त्यानंतर संपूर्ण नवीन प्लॅन सेटअप करण्याच्या फोर्डने मला सिलेक्ट केले. फोर्डमधील अनुभव हासुध्दा अत्यंत चॅलेंजिंग आहे. प्लॅन्ट सेटपासून, सर्व नवीन लोकांना घेऊन त्यांना ट्रेन करुन गाडयांचे प्रॉडक्शन सुरु करणे हे एक आव्हान होते. ते निलया पध्दतीने पार पाडले. एक जबरदस्त अशी टीम तयार केली जी कुठल्याही आव्हानांना स्विकारते आणि पार पाडून दाखवते. माझ्या लिडरशिपला फोर्डने ॲप्रेशिएट केलं.

    हे सर्व तुमच्या बरोबर शेअर करायचा हेतू असा की तुम्ही दुसऱ्याच्या अनुभवातून शिकावे. शिकणे ही निरंतर प्रक्रिया आहे. ती कधीही थांबता कामा नये. प्रत्येक चांगला किंवा वाईट प्रसंग काही ना काही शिकवतो. शिकून स्वत:ला निरंतर सुधारत असलं पाहिजे. पुढे काय असा विचार करता आला पाहिजे. जे मिळवले त्यात समाधान मानावे परंतु What’s next पण विचारायला हवे. प्लॅन रेडी असले पाहिजे. कधी काही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता आल्या पाहिजेत जिद्द आणि चिकाटीतून. आई वडीलांकडून शिक्षणाची अपेक्षा ठेवावी, पण आपली नोकरी किंवा धंदा ही त्यांची जबाबदारी नाही हे नेहमी लक्षात ठेवा. ती आपली जबाबदारी असते.
    लोहटारच्या सर्व विद्यार्थी अवस्थेत असलेल्यांना भविष्यातील यशासाठी शुभेच्छा!  धन्यवाद!

*निंबा दगडू पाटील*
*फोर्ड मोटार कंपनी,भारत*
*प्रेरणा एक सुवर्णपान ब्लॉग*
 http://prerana1suvarnpan.blogspot.in/?m=1

*प्रेरणा एक सुवर्णपान फेसबुक पेज*
https://m.facebook.com/preranaeksuvarnpan/

*Email प्रेरणा एक सुवर्णपान*
preranaeksuvarnpan@gmail.com

*whatsapp प्रेरणा एक सुवर्णपान*
9665911657


*काही प्रेरक अभिप्राय*

*गणेश पाटील,पारोळा
खूपच छान जीवनचरीत्र,लेखकालाही लाजवेल अशी मांडणी👌🏻👌🏻

*सुनिल बारी,निंबोल रावेर
Dada lekh ani lekhak apratim ahe.
Really appreciate efforts of Shri Nimba Patil
Salam bhai...1 preranadayi adhyay
Assal sone
Pratek anubhav manat ghar Karun gela👌👌👌

*Borade sir: Bharat ekdam jhakas Lekhan ✍🏻✍🏻✍🏻
देवाशीष: प्रेरणादायी मिञा!!
keep it up

*शरद तोत्रे सर: खुप प्रेरक👌👌💐💐

*Nilesh Bhamare sir: Bharat nice motivated👍👍

* Prakash Chavan Nashik: खुपच प्रेरणादायी व्यक्ती मत्व वाचायला मिळाले.

*ज्ञानदेव नवसारे,त्र्यंबकेश्वर
प्रेरणा घ्या प्रेरणा द्या 👌🏻👌🏻👍🏻

मस्त भरत 👌🏻


*खरच खुप सारी ऊर्जा मिळाली. लेख वाचुन..👍🏻👍🏻🙏🏻
देवडे सर लासलगाव,नाशिक 


*ज्योतीताई: भरत भाऊ...भारीच👍
ज्योती बेलवले,ठाणे

*+91 94225 67496‬: खूप छान उपक्रम,....प्रेरणा देणारा उपक्रम..💐💐

*ज्योतीताई: खुपच प्रेरक👌👌💐💐

*प्रेरणा एक सुवर्ण पान.....*

नावा सारखाच लेख एक प्रेरणादाई सुवर्ण पान म्हणता येईल..
निंबा पाटील  यांनी अत्यंत सहज, सरळ व सोप्या भाषेत हा लेख आपल्यसमोर मांडलाय. दैनंदिन जीवन जगत असतांना कसे शिकत गेलो याची ते याठीकाणी सहज माहिती करून देतात. अगदी लहानपणीच्या खेळातील चूका व वडीलधा-या मंडळीकडून मिळालेलं मार्गदर्शन व याचा घेतलेला सकारात्मक बोध पासून ते आपल्या वेगवेगळ्या कंपन्या च्या नोकरीतील कार्यानुभवावर अधारीत मौलिक मार्गदर्शन याठीकाणी केले आहे.
याचा विविधांगी अनुभवपुर्ण लेखाचा सर्वांना नक्कीच फायदा होईल..... 

लेखक कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!! 

सुनिल खंडेलवाल, 
काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे


*भरत *प्रेरणा एक सुवर्णपान*
प्रेरणादायी उपक्रम
👍👍👍
तुझा उपक्रम पाहून मनात विचार आलाय आपणही गावातील मुलांसाठी काहीतरी करावं
🙏🙏🙏

अप्रतिम

विक्रम अडसूळ
सदस्य,
अभ्यासक्रम मंडळ महाराष्ट्र राज्य


*अतिशय हालअपेष्टा सोसून आयुष्य सुंदर करणार्या सरांनी उत्तमरित्या अपघातावर मात करण्याची शिकवण दिली.सरांना सलाम🙏🙏🙏🌺🌹
विजय बागडे मालेगाव


*सहज हृदयात स्थान निर्माण केलंय आपण.आमच्या चिमुकल्याला तुमचा संघर्ष समजावून सांगितला.त्यानं कुतुहलानं पुढे काय पुढे काय असं विचारत सर्व तुमच्याविषयी माहिती जाणून घेतली.आपल्या लेखातून माझ्या मुलानं स्वप्न पाहिलंय खूप अभ्यास करून तो मोठा अधिकारी होऊन विदेशात फिरायला घेऊन जाणार आम्हांला..सर...तो लहान आहे आता,पण त्यानं स्वप्नं पाहिलंय हेच महत्त्वाचे...
असो लेख मनाला भावला..
आपल्या संघर्षास सलाम..
पुढील वाटचालीस शुभेच्छा 
🌹💐🌹💐💐🌹

रत्नाकर सोनवणे बदलापूर,ठाणे

No comments:

Post a Comment