जखम झाली प्रेरकशक्ती - एकनाथ पाटील



🍂🎆🎇🎯🍂🎆🎇🎯🍂🎆🎇

🔮 प्रेरणा एक सुवर्णपान - 8🔮

जखम झाली प्रेरकशक्ती - एकनाथ पाटील

      धुळयापासून 35 ते 40 कि.मी.अंतरावर डोंगराळ व खडकाळ भागामध्ये वसलेले छोटेसे गाव खोरदळ हे माझे मूळ गाव.गावाची लोकसंख्या 2700 ते 2800.गावात सर्वच शेतकरी,मजूर खूप कष्ट करणारे कष्टकरी लोक.गावापासून आमचे शेत 2 कि.मी.अंतरावर होते.वडीलांना गावापेक्षा शेतात रहायला आवडायचे.शेती ही 3 एकर बागायती असल्याने शेतामध्ये भाजीपाला,कलिंगड याचे उत्पन्न घ्यायचे.ते सांभाळण्यासाठी शेतातच रमायचे म्हणूनच त्यांनी शेतात एक मजबूत,दमदार कितीही पाऊस आला,वारा आला तरी काहीही होणार नाही अशी झोपडी बांधली होती.दिवसभर आई वडील काबाड कष्ट करुन दमून थकून कधी रात्री झोपायचे हे त्यांचं त्यांना देखील कळायचे नाही.याच शेतात झोपडीत माझा जन्म झाला.गावातले घरे कशी असतात,गावातील लोक कशी राहतात,गावातील मुले कशी एकत्र खेळतात हया गोष्टी मला फार मजेशीर वाटायच्या कारण गाव आणि माझी कधीही जास्त ‍ जवळीक नव्हती.कारण जन्मच शेतातला असल्यामुळे माझा मित्रपरिवार कोणीही नव्हता.मी माझा एकटा खेळायचो.दोन्ही साईट सांभाळायचो,एकटाच बोलायचो.स्वतःचा मित्र स्वतःच होतो.हे लहानपणापासून वाटेला आलेलं.असे माझे एकाकी अन् रमणीय बालपण शेतात मजेशीर,आनंदात गेले.

    वडीलांनी निर्णय घेतला की आता याला शाळेत दाखल केला पाहिजे.त्यांनी मला गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलीत दाखल केले.आई-वडील गावात राहायला आले.गावात आल्यावर मला खूप भिती वाटायची.मुलांमध्ये खेळायला जायलाही भिती वाटायची.हे आमच्या गावाचे पोलिस पाटील यांच्या लक्षात आले.ते आमच्या घराच्या जवळच रहायला होते.त्यांनी मला बोलावून विचारले,की तू कोणाला घाबरतो?.चल मी तुझ्याबरोबर येतो.ते मला शाळेत सोडायला यायचे.माझी शाळा सुटली की घ्यायलाही यायचे.जिल्हा परिषद शाळेत माझे प्राथमिक शिक्षण सुरु झाले.मला 1 ली व 2 रीसाठी बि-हाडे गुरुजी होते. त्यांच माझ्याकडे विशेष लक्ष असायचे.4 थी पर्यंतच प्राथमिक शिक्षण चारचौघांसारखेच पूर्ण झालं.

    चौथी पास झाल्यावर पुढील शिक्षण घेण्यासाठी गावात शाळा नव्हती.गावापासून दूर दुसऱ्या गावी शिक्षणासाठी जावे लागायचे.गावात ५ वी ते १० साठी शाळा होती तिला ग्रँन्ट नव्हती.ती नविनच सुरु झाली होती.मला पण हया शाळेत दाखल करण्यात आले.5वी ,6 वी,7 वी मी हयाच शाळेत शिकलो पण कधी शिक्षक असायचे तर कधी नसायचे.तास होत नव्हते,बरेच माझे मित्र पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावी नातेवाईकांकडे जात होते.अभ्यास काय,कसा,खूप संबोध जगातच नव्हते असे शिक्षण भेटत होते.घरात चर्चा झाल्यावर आईनेही ठरवले यालाही पुढील शिक्षणासाठी माझ्या माहेरी लोहटारला पाठवायचे.आईने आमच्या आबांना (मामांना) विचारले. त्यांनीही लगेच पाठव हया वर्षी म्हणून सांगितले.हाच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला.

     मी पंडित जवाहरलाल नेहरु माध्यमिक विद्यालय, लोहटार हया शाळेत 8 वी पासून दाखल झालो.शाळेचा पहिला दिवस मला अजूनही आठवतो. मी शाळेत नविन असल्यामुळे सर्व गोष्टी मला नवीनच होत्या. एवढी मोठी इमारत असलेली शाळा.प्रत्येक तास झाला की नवीन सर नवीन विषय घेवून यायचे.पहिल्या दिवशी शाळेचे टाईम टेबल माझ्या वर्गाचे क्लासटिचर व्ही.पी.वाणी सर यांनी लिहून दिले.त्याचप्रमाणे सर्व चालू होते.तास आला इंग्रजीचा गोसावी सरांचा.सरांची वर्गात एन्ट्री झाली आणि सरांनी जशी शिकवायला सुरुवात केली तसे मला एवढया जोरात हसायला आले कि विचारुच नका कारण सर काय बोलत होते,मला काहीच कळत नव्हते.काय सरांनी मजबूत चोपला.रडू येत होतं.आयुष्यात नवीन भाषा इंग्रजी अशीही शिकवतात हे पहिल्यांदा कळत होतं अन् सर्व वर्गाला माहित पडले.नविन ॲडमिशन आहे म्हणून...पहिला दिवस खासच होता...

         माझे वर्गात बरेच मित्र परिवार जमले.त्यात समाधान, कौस्तुभ,नामदेव,प्रविण हे खास मित्र होते अन् आजही आहेत. अशाप्रकारे हसतखेळत,आनंदाने माझे 10 वीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले.10 वीचे रिझल्ट आले. मला 10 वीला 54% गुण होते. आमच्या आबांनी मला आय.टी.आय साठी ॲडमिशन घे म्हणून सांगितले.तेथे मला जो ट्रेड पाहिजे होता तो मिळाला नाही. मग मी 11वी 12 वी आर्टसमधून पास झालो.आता आपल्याला कोण नोकरी देणार हया प्रश्नावर अडकलो.सारं जीवन बेरोजगारमय वाटत होतं.

   पुढे आमच्या आबांनी (मामांनी) शेतीत माझे मन रमावे म्हणून किंवा शेतीची मला आवड निर्माण होईल म्हणून दोन म्हशी घेवून दिल्या.शेतातली बरीच जबाबदारी माझ्यावर सोपवली. आबांनी म्हशी आणल्या खऱ्या पण मला दूध सुध्दा काढता येत नव्हते.आबा म्हणायचे,"दूध तूच काढायचेस,कितीही वेळ लागू दे, पण दुसरे कुणाला बसवायचे नाही".माझा मित्र समाधान याने मला दूध काढायला शिकवले.नंतर मात्र मी चांगल्या प्रकारे दूध काढायला शिकलो. शेतातले बरेच कामे मी करायला शिकलो.मी मनाशी ठरविले होते. रिकामे राहण्यापेक्षा काम करीत राहणे कधीपण चांगले.आपण नोकरीसाठी प्रयत्न पण चालू ठेवायचे.कितीही कष्ट करावे लागले तरी चालतील पण थांबायचे नाही.

  2006 ला महाराष्ट्र पोलिस दलाची मोठी भरतीची जाहिरात निघाली.याच्या अगोदर 2005 ची भरती निघाली होती.त्यात प्रथमच माहिती पडले कि पोलीस  दलात पण मोठया प्रमाणात जागा निघतात.मग मात्र ठरवले आता काहीही झाले तरी चालेल आपण पोलिस दलात भरती व्हायचेच. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले.एक आनंद मनात होता तो म्हणजे आपण 12 वी पास आहोत.पोलिस दलात शिक्षणाची अट ही 12 वी पासची आहे. बस मग काय कितीही प्रयत्न करावे लागले तरी चालेल पण आपण भर्ती झालोच पाहीजे असे मनाशी पक्के ठरविले.तयारीसाठी सुरुवात केली.सकाळी लवकर उठून व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणे,लोहटार ते भडगाव नॉनस्टॉप रनिंग करायचो,रनिंग नंतर देान तास व्यायाम ठरलेला असायचा. संध्याकाळी पण व्यायाम,रनिंग अशी मी. 2006 ची भरतीची तयारी केली.भरती आली.मी मुंबई व ठाणे हया दोन ठिकाणी अर्ज केले होते.मुंबईला मला ग्राऊंडला 100 पैकी 89 गुण होते व ठाण्याला 86 गुण होते. मग काय गावात चर्चा असायची एवढे गुण आहेत तर मग तुझे काम होणारच असे मित्रपरिवार, गावातील जेष्ठ मंडळी सांगायची, मग काय आपण पण हवेत असायचो.पेपर झाला. ७५ गुणांचा पेपर देवून मी घरी आलो. सर्व प्रश्नपत्रिका चेक केल्यावर लक्षात आले.आपण तर पेपर पास सुध्दा होणार नाहीत.त्याचे कारण स्पष्ट दिसत होते.आपला अभ्यास भरपूर कमी आहे.एक आणि दोन पुस्तक वाचून आपण ही परीक्षा पास होऊ शकत नाही. परीक्षेचे रिझल्ट्स् आले 75 पैकी 31 गुण आणि पासिंगसाठी 35 गुण पाहिजे होते.मी नापास झालो होतो.आता मी हया भरती प्रक्रियेतून बाहेर पडतो होतो.मी खूप नाराज झालो कारण मी पहिल्यांदा एवढया मेहनतीने, मनाने प्रामाणिक प्रयत्न केले होते.मला आठवते मी 1ली ते 12 वीपर्यंत एवढया एकाग्रतेने कधीही अभ्यास केला नव्हता. सर्वात आश्चर्याचा धक्का मला बसला तो या भरतीचे फायनल मेरिट लागले तेव्हा क्लोज मेरीट होते 137 आणि मला पेपर नापास होऊन गुण होते 124 मुलाखती 25 वेगळे.मुलाखत 25 गुणांची असायची.प्राथमिक व माध्यमिक अभ्यासाचे आता महत्त्व पटले होते.खूप सारे संबोध स्पष्ट नसल्याने सारं बिनसलं होतं.पण स्वतःच जबाबदार आहोत म्हणून स्वतःला धीर देत होतो. आपण योग्य वाटेवर आहोत हे मनात पक्के ठरवलं.आणखी थोडी मेहनत घ्यावी लागेल अन् पुढील नियोजनास सुरूवात केली.

      त्यावेळेचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी घोषणा केली होती.दरवर्षी 15000 पोलिस भरती महाराष्ट्रात होत राहणार म्हणून हया बातमीने आम्ही सुखावलो होतो.नवीन मार्ग दिसत होता.पुन्हा एकदा 2007 ची भरती डोळयांसमोर ठेवून तयारी चालू केली.2007 ची भरतीची तयारी चालू केली.पण हे सर्व करीत असतांना नेहमी वाटायचे आपण एकटे हे नाही करु शकत म्हणून गावातून जेवढी मुले भरतीसाठी तयारी करत होते.ते सर्व एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगला गृप तयार झाला.मग जास्तीत जास्त एकत्र राहून अभ्यास करायचो.एकमेकांची पुस्तके अदला बदल करुन वाचायचो.एखादया कट्टयावर (चावडीवर) बसून दिवसभरातून केलेल्या अभ्यासावर गृप डिस्कशन करायचो.अभ्यासाला पण मन लागायला लागले.आता 200 गुण डोळयांसमोर ठेवून सर्वजण भरती ची तयारी करीत होते.75 गुण पेपर +100 ग्राऊंड+ 25मुलाखत = 200 गुण एकूण... हे करतांना कुठे कमी पडतो ते सुधारण्याचा प्रयत्न करायचो.सारं नियोजनबद्ध सुरू होते.जीवनात तयार झालेला गृप वाटेवरचं क्षितीज दाखवत होता.

    2007 ची भरती प्रक्रिया चालू झाली.माझी तयारी चांगली झाली होती आणि आव्हान पेलण्यासाठी मी तयार होतो.या भरतीत मी सर्व प्रक्रिया पूर्ण करुन मेरीट लिस्ट कधी लागेल याची वाट पहात होतो.मेरीट लिस्ट लागली आणि पुन्हाी मी मेरीटला बसलो नाही.माझे टोटल मेरीट होते 152 आणि भरतीचे मेरीट 156 लागले होते. अवघ्या 4 गुणांनी मी मेरीटला बसलो नाही.परत एकदा प्रचंड मनस्ताप, खूपच नाराज झालो.ज्यांना माझे प्रयत्न माहिती होते ते म्हणत असत..प्रयत्न चालू ठेव,तू नक्की भरती होणार.जो तो सहानुभूती देत होता.जमेल तसे मार्गदर्शन करत होते आणि ज्या लोकांना यातला गंधही नाही ते टोमणे मारायलाही कमी करायचे नाही. मुंबई फिरायला जातात ते...मजा करायला जातात... त्याचे काय खरे नाही.... एवढया वर्षापासून भरती करतायेत... अशा लोकांचे बोलण ऐकून खूप राग यायचा. पण त्यांच्या बोलण्याने पुन्हा तयारी करायला प्रेरणा पण मिळत होती.सहानुभूती अन् टोमणे यात अडकलोच नाही.योग्य वाट अन् एकमेव क्षितीज पोलीस तर होणारचं...कष्टाला पर्याय नाही हे तर हृदयातही वसले होते.

    आतापर्यंत मला धक्के सहन करण्याची ताकद आली होती.मागे वळून बघण्याची सवयही आता नव्हती.आपण कुठे कमी पडलो,याच्यावर मात्र विचार करायचो तर लक्षात आले की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कितीही केला तरी परीक्षेला काय विचारतील याचा काही नेम नसतो.जनरल नॉलेज,चालू घडामोडी,गणित,मराठी,इंग्रजी असा अभ्यासक्रम असायचा. त्यात जनरल नॉलेजचा अंत तुम्ही पाहू शकत नाही.त्यात महाराष्ट्र, भारत,जग यातील कोणत्याही घटनेविषयी विचारतील याचा नेम नाही म्हणजेच सुर्याखालील सर्वच..या प्रक्रियेत येत मी आतापर्यंत बऱ्याच गोष्टी शिकलो ते म्हणजे प्रश्नाचे उत्तर लिहीतांना आपल्याला विचारण्यात आलेले चारही ऑप्शन पडताळण्याची कला,सर्वात पहिले येणारे प्रश्न सोडविणे,मुलाखतीत मला बऱ्याच वेळेस नावावरुन विचारायचे.एकनाथांविषयी काय माहिती आहे? जगन्नाथपूरी कुठे आहे,मुलाखतीला काहीही विचारु शकतात हा सर्व अभ्यास केला. मराठी व्याकरणाच्या नोट्स भरत कडून मिळवल्या.ग्राऊंडवर सराव करतेवेळी 100 मी.रनिंगसाठी कॉल कसा मारायचा काही मायक्रोसेकंद जरी कॉल सक्सेस झाला तरी मार्कांमध्ये भरपूर फरक पडायचा.800 मी. रनिंगसाठी चार राऊंड कसे मारायचे, रिधम कसा ठेवायचा, लांब उडी फॉल होणार नाही, गोळा फेक कसा करायचा याचा सराव जोरदार सुरु होता. माझ्यासाठी मिशन 2008 हे मिशनच होते.माझ्यासाठी ही शेवटीची भरती म्हणून मी हया भरतीकडे बघत हातो.सतत मी भरतीच्या विचारातच असायचो आमाचा गृप पण एकत्र जमले तर 2 ते 3 तास कसे बोलण्यात जायचे कळायचे सुध्दा नाही. लोहटार बांबरुड फाटयाजवळ एका पडित जमिनीवर बांबरुडच्या मुलांनी मोठे ग्राऊंड तयार केले होते.त्याच ग्राऊंडवर आमाचा गृपपण सरावासाठी जात होता. त्या ग्राऊंडवर रोज 80 ते 90 मुले सरावासाठी असायची.तेथे गेल्यावर असे वाटायचे.जसे भरती प्रक्रिया येथेच सुरु आहे.त्या ग्राऊंडला एका ॲकॅडमीचे स्वरुप प्राप्त झाले होते.त्याच ग्राऊंडवर मी पण जीवापाड मेहनत घेत होतो.

       2008 ची भरती प्रक्रिया सुरु झाली.मी मुंबईमध्ये परत एकदा नशिब आजमावयाचे ठरविले.मुंबईचा एक डॉयलॉग नेहमी माझा पाठ असायचा. मुंबई सबको देती है, लेनेवाला चाहीये.मुंबईसाठी 1600 जागा होत्या. मी मुंबईसाठीच अर्ज भरला होता. पूर्ण जिद्दीने मी सराव करत होतो.  ग्राऊंडला कधी बोलावतात याची वाट पहात होतो.याच दरम्यान मी शेतातले सर्व कामेही नित्यनियमाने करत होतो.शेतातच काम करतांना माझ्या उजव्या पायात खूप खोलवर मोठा काटा गेला होता.पाय पुर्णपणे सुजला होता.याच दरम्यान मला मुंबई ग्राऊंडसाठी बोलावण्यात आले. मला खूप मनस्ताप होत होता. दोन दिवस आहेत माझ्याकडे मग मी पाचोऱ्याला जयंत डॉक्टरकडे गेलो.पायातला काटा काढायला पण डॉक्टरांना सांगितले.माझी पोलीस ग्राउंड भरती दोन दिवसांवर आहे.डॉ. म्हटले अरे, काटा खूप खोलवर गेला आहे. त्यामुळे लवकर पायाची सूज उतरणार नाही.निदान तुला 5 ते 6 दिवस तरी लागतील.ड्रेसिंग करुन तेथून निघालो.घरी आलो . घरातले सर्वच सांगत होते.एवढा पाय सुजला आहे. तू मूंबईला जावू नको.पण मनाचा निर्णय पक्का होता.जे होईल ते बघू आणि त्याच दिवशी रात्री मुंबई जायला निघालो.आधी ठाण्याला बहिणीकडे गेलो.संध्याकाळी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांना सर्वकाही सांगितले आणि संगितले की,"डॉक्टरसाहेब मला अशी गोळी दया जी मला हया वेदनेपासून अर्धा ते एक तास सांभाळू शकेल".डॉक्टरांनी गोळया दिल्या.रात्रीतून तुला आराम पडेल आणि उदया तू ग्राऊंडवर जाण्याआधी थोडा नाश्ता कर अन् एक गोळी घे असे सांगितले.
   सकाळी मी नायगाव पोलीस हेडक्वार्टर ग्राऊंडवर सकाळी ९:०० वाजता हजर झालो. पायाची सूज थोडया फार प्रमाणात कमी झाली होती. त्यावेळी मी पायाला नरम मऊ अशा कापसाच्या पट्टया आणि नरम टॉवेलच्या पट्टया बांधल्या. इव्हेंट सुरु झाले आणि माझे सर्व इव्हेंट यशस्वीरित्या पार पडले. आणि मला ग्राऊंडला गुण होते 100 पैकी 86.दरवर्षी पेक्षा 3 ते 4 गुण कमी होते.पण समाधान देखिल होते.ग्राऊंडच्या बाहेर आल्यावर पाय पुन्हा खूप सुजला होता.रक्ताळलेला भाग डोळ्यांत अश्रू जमा करत होता.आता काही टेन्शन नव्हते माझे ग्राऊंड झाले होते.परत गावी आलो.

     परीक्षेला 1 महिना बाकी होता.अभ्यासाला पूर्णपणे वेळ होता.ग्राऊंडला 3-4 गुण कमी हाते.भरती प्रक्रियेत असे बोलले जायचे जायचे,1 गुण कमावला तर 1000 मुलांना मागे टाकले. मला दरवर्षी पेक्षा कमी गुण असल्यामुळे मी खूप मन लावून अभ्यास करत होतो.पायाच्या असय्य वेदना आठवत होत्या अन् अभ्यासात उणीव भरून काढायची हे मनोमन पक्के ठरविले होते.माझ्याकडे असलेले सर्वच्यासर्व पुस्तक वाचून झाल्यावर मी माझ्या मित्रांची पुस्तके वाचायला आणायचो.घरी मित्र किंवा कोणीही आले तर त्यांच्याजवळ पुस्तके देऊन त्यांना कोणतेही प्रश्न विचारा म्हणून सांगायचो.विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी बरोबर देत होतो.एकदा आमचे नाना घरी आले होते.त्यांनाही मी पुस्तके देवुन प्रश्न विचारायला सांगितले तेव्हा ते म्हणाले,तयारी चांगली झाली आहे.फक्त नियोजनपूर्वक आत्मविश्वासाने पेपर सोडव.परीक्षा आली.मला पेपर चांगला गेला.केलेल्या अभ्यासाचा मला फायदा झाला.परीक्षेला मला 75 पैकी 56 गुण पडले. माझी टोटल आता 142 झाली होती. आणि आता पुढील टप्प 25 मार्क मुलाखतीचा होता. हया भरतीला मुंबईला एकूण 1 लाख 80 हजार  मुले होती.त्यातून आता मुलाखतीला एका जागेसाठी 15 मुले घेणार होते.मुलाखत झाली.माझी मुलाखत खूपच छान झाली होती.आता वाट पहात होतो.फायनल मेरीटट लिस्टची. आणि मेरीट 163.माझा फायनल मेरीटमध्ये नंबर आला होता.माझे पोलीस दलात सिलेक्शन झाले होते.मला मुलाखतीत 25 पैकी 21 गुण मिळाले होते.एकूण गुण 163 झाले.मला खूप आनंद झाला होता.शेवटी आपण जी गोष्ट मनापासून करतो प्रामाणिक प्रयत्न करतो,जिद्द,चिकाटीने मेहनत करतो,त्यात आपल्याला यश मिळतेच. जिथून मला काहीतरी स्पर्धा परीक्षेला उपयुक्त मिळेल,ते कोठूनही कोणाकडूनही शिकत होतो.लहान असो की मोठा फक्त शिकायचं ठरवलं होतो.अन् लहानपणी मिळालेले खास गुण प्रत्यक्षात जीवनात यशस्वी ठरत होते.पायात काटा अन् जखम हीच प्रेरकशक्ती ठरली होती हे आजही तेवढेच प्रेरणादायी आहे.

    आज मी बृहन्मुंबई पोलीस दलात ॲन्टॉप हिल पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांच्याकडे पीटर ऑपरेटर म्हणून काम पाहतो. उगवणारा प्रत्येक दिवस नवीन चॅलेंज म्हणून असतो.नवनवीन अडचणी,तक्रारी असतात.प्रचंड प्रमाणात दु:खी व कष्टी लोक पोलीस स्टेशनला येत असतात. त्यांच्या अडचणी जाणून घेवून सोडविण्याचा प्रयत्न करत असतो.स्कॉटलँड यार्ड पोलिस नंतर आपल्या मुंबई पोलिस दलाचा नंबर कार्यतत्परेतच लागतो हे भरती झाल्यावर कळाले.काम करत असतांना आपण स्वप्नात पण विचार केलेला नसतो,अशी मंडळी भेटतात हे सर्व मी माझ्या कामाच्या निमित्ताने एन्जॉय करतो आहे.
“Don’t work hard, work smart.” ------------------------------------------------------
   मित्रांनो,एवढेच सांगावेसे वाटते,आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळविण्यासाठी खूप कष्ट, मेहनत चिकाटी, प्रामाणिकपणा ठेवा.प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा.मग तो लहान-मोठा कोणीही असो.प्रत्येकाकडून काहीना काही शिकण्यासारखे असते.चांगला मित्र परिवार ठेवा.यश तुमचेच आहे.स्वतःशी खूप प्रामाणिक रहा.परिस्थितीचा सामना करा.

एकनाथ पाटील
मुंबई पोलीस.
मो. 9594973281

*****************************************************************************************

        प्रेरणा एक सुवर्णपान ब्लॉग
https://prerana1suvarnpan.blogspot.in/p/blog-page_2.html?m=0

        Email प्रेरणा एक सुवर्णपान
preranaeksuvarnpan@gmail.com

       whatsapp प्रेरणा एक सुवर्णपान
          भरत पाटील- 9665911657

*प्रेरणा एक सुवर्णपान Broadcast ला ॲड व्हायचे असल्यास 9665911657  नंबरवर whatsapp करा.दर पंधरवाड्यात दीपस्तंभ आपल्या भेटीला...स्वअनुभव रेखाटत*

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

*दिवाळीच्या आपल्या कुटुंबास व आपणास हार्दिक शुभेच्छा...!*

HAPPY DIWALI

🎆🎇🎇🎆🎆🎇🎇🎆🎆🎇🎇

No comments:

Post a Comment