विचारांचा,कर्तृत्वाचा वसा - शरद येवले


🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣

⚜ प्रेरणा एक सुवर्णपान- 18⚜

विचारांचा,कर्तृत्वाचा वसा- शरद येवले

सप्रेम नमस्कार ...
                आमच्या आठ भावंडांच्या कुटुंबातील मी सर्वात लहान.माझे वडील श्री.बापू सुपडू वाणी यांचा प्रमुख व्यवसाय हा सिविल कॉन्ट्रॅक्टरचा व दुय्यम शेती.त्यांच्या विचारांचा, कर्तृत्वाचा पगडा माझ्यावर नेहमीच राहिला. कुठलंही व्यावसायिक शिक्षण/प्रशिक्षण नसतांना तसेच घरच्यांचा पाठिंबा / अनुभव नसतांना त्यांनी मिळवलेले यश माझ्यासाठी जिद्द आणि प्रेरणा निर्माण करणारे होते. त्यांनीच आमच्या सर्व भावंडांमध्ये शिक्षणाचे बीज रोवले.माझे मोठे भाऊ श्री.जनार्दन बापू वाणी यांनी त्यावेळी B.Sc.(Agri) पूर्ण केले होते त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मला लाभले लाभले. कुटुंबातील माणसांचं आपलेपण अन् हक्काचं मार्गदर्शन मिळालं हे भाग्यच समजतो.

      रम्य ते बालपण …. आजही लोहटार येथील त्या दिवसांच्या आठवणी मनात घर करून आहेत. *पहिली ते चौथी मराठी शाळेत शिक्षण झाले.* सुरुवातीस शाळेत जाण्याची आवड नव्हती पण हळूहळू अभ्यासाची गोडी निर्माण झाली. तेली गुरुजी यांचा धाक आणि वाणी ताईंची शिकवण यामुळे असेल कदाचित. पाचवीपासून आपल्या पं.ज.ने माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथेच  पुढील आयुष्याचा पाय रचला गेला.* त्यात तेथील गुरुजन श्री पी के पाटील सर , एन आर पाटील सर , एम एस पाटील सर , सोन्नी सर , वाघ सर, व्ही पी वाणी सर , व्ही डी वाणी सर , के डी परदेशी सर , ए  बी महाजन सर , मोहन सर, पी के महाजन सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . *सर्व शिक्षकांनी त्यावेळी शिक्षकाची आणि पालकत्वाची दुहेरी भूमिका निभावली असे मला वाटते कारण शाळेत आमच्यावर बारकाईने लक्ष असायचे पण सुटीच्या दिवशी बाहेर जास्त खेळतांना दिसलो कि दुसऱ्या दिवशी कानउघडणी व्हायची. कदाचित दर्जेदार शिक्षणाचे तेच कारण असावे.

      पाचवी ते दहावी पर्यंत चांगल्या गुणांनी पास होत गेलो.. शाळेसोबत सुट्टीमध्ये शेतात जाणे,शेतीमाल विकण्यासाठी मार्केटमध्ये जाणे आदि गोष्टी कराव्या लागत त्यावेळी याचा कंटाळा येई पण कदाचित त्यामुळेच  शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान  वृद्धिंगत होत होते. समृद्ध जीवनासाठी योग्य वयात योग्य संस्कार होणे गरजेचेच असतात अन् ते मला माझ्या कुटुंबाकडून अन् शाळेकडून मिळत होते.

     अकरावीसाठी जयहिंद महाविद्यालय धुळे येथे प्रवेश घेतला,परंतु एका महिन्यात शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद येथे नवी Industrial Electronics ही शाखा सुरु झाल्याचे कळले आणि सर्वांच्या विचार विनिमयाने तेथे प्रवेश घेतला आणि औरंगाबाद येथे दाखल झालो आणि जीवनाची खरी कसोटी सुरु झाली.
खेड्या गावातून नवीन आणि मोठ्या शहरात , इंग्रजी माध्यम, नवीन वातावरण ,घरच्यांची आणि गावातील सर्व मित्रांची येणारी आठवण,यातून व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात झाली. समस्यांचा पाढा मानसिक पातळीवर निर्माण होत होता पण मनाशी बांधलेली खुणगाठ अन् ठरविलेले ध्येय पूर्ण करायचेच होते. औरंगाबाद येथे तिन्ही वर्ष पहिल्या तीन क्रमांकात राहिलो आणि शेवटच्या वर्षी बजाज आणि मेल्ट्रॉन या कंपन्या मुलाखतीसाठी आल्या आणि दोघींमध्ये माझी निवड झाली. पण पुढे जॉब करावा कि बी.ई. करावे याची घालमेल सुरु झाली आणि खूप विचारांती आणि काही अनुभवी नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार जॉब करावा असे ठरले.त्यात बजाज कि मेल्ट्रॉन असा घोळ सुरु झाला पण शेवटी मेल्ट्रॉन ही निमसरकारी आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील असल्यामुळे तिच्यावर शिक्कामोर्तब झाले.

मेल्ट्रॉन नागपूर येथे वयाच्या  १९ व्या वर्षी सब इंजिनियर या पदावर नोकरीस रुजू झालो व विद्यार्थीदशेतून व्यावसायिक विश्वात स्थलांतर झाले. मेल्ट्रॉन मध्ये सुरुवातीला Customer Support डिपार्टमेंट मिळाले त्यात खूप दौरे करावे लागत त्यातून जवळपास पूर्ण भारत भ्रमण झाले.वेगवेगळ्या कस्टमर्सशी संपर्क आला त्यामुळे टेक्निकल व मॅनेजमेंटचा अनुभव वाढत गेला. दरम्यान शैक्षणिक दृष्ट्या फक्त डिप्लोमावर न राहता पुढचे पदवीचे शिक्षण पूर्ण करावे अशी इच्छा बळावली. त्यावेळी दोन पर्याय समोर आले,जॉब सोडून पूर्ण वेळ पदवीचे शिक्षण किंवा जॉब करून (Externally) अभियांत्रिकेची पदवी मिळवणे. जॉब करताना टुरिंगचा /व्यावसायिक कौशल्य वृद्धीचा अनुभव आनंद देत होता व सोबत पैसे ही मिळत होते त्यामुळे अर्थातच स्वालंबन घालवण्याची इच्छा नसल्याने Learning while Earning या तत्वावर बाहेरून बी.ई. करण्याचे ठरविले  आणि दिल्ली येथील IETE  या संस्थेत प्रवेश घेतला. परंतु जॉब करून त्यात सारखे टुर आणि त्यातून अभ्यासासाठी वेळ काढणे ,  self study ,मार्गदर्शकांचा अभाव आणि फक्त परीक्षेच्या वेळापुरती आणि तीही महप्रयत्नांनी मिळणारी रजा त्यात परीक्षेला जबलपूर येथे जाणे या सर्व कसरतींतून पहिले सेमिस्टर झाले. त्यात पाच पैकी चार विषयांमध्ये चांगल्या गुणांनी पास झालो आणि एका विषयात दोन गुणांनी फेल  झालो. आयुष्यात प्रथमच कुठल्या विषयात नापास झाल्यामुळे खूपच वाईट वाटले परंतु बदलेल्या परिस्थिची जाणीव आणि स्वतःला दिलासा देत पुढचा प्रवास चालू ठेवला आणि चार वर्षात पदवी शिक्षण पूर्ण केले.

      मेल्ट्रॉन मधील आठ वर्षांच्या कार्यकाळात Customer Support , Production , R & D  या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे रेल्वे, दूरदर्शन,आकाशवाणी,महाराष्ट्र पोलीस , इंडियन आर्मी,BSNL  अश्या बऱ्याच सरकारी / निमसरकारी / खासगी  संस्थांशी संपर्क आला.
दरम्यान डिसेंबर १९९८ मध्ये लग्न झाले आणि शिल्पा पत्नी म्हणून आयुष्यात आली. अभियांत्रिकीची मिळवलेली पदवी आणि मेल्ट्रॉनचा अनुभव याबळावर इतरत्र आवेदन केले  आणि बऱ्याच मुलाखती दिल्या आणि माझी  भारतीय विमानपत्तन प्राधिकरण ( Airports Authority of India ) मध्ये Manager ( इलेक्ट्रॉनिक्स) या पदावर नियुक्ती झाली.अलाहाबाद येथील ६ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर मंगलोर विमानतळावर नियुक्ती झाली. एक वेगळच आणि आव्हानात्मक क्षेत्र ज्यामध्ये विमानांच्या सुरक्षित आणि समयबद्ध अवगमनासाठी लागणारी संचार(Communication ), दिकचालन ( Navigation ), निगराणी (Surveillance ) प्रणालींचे नियोजन ,व्यवस्थापन, अनुरक्षण करण्याची जबाबदारी असते,मंगलोर येथे अडीच वर्ष होतो.दरम्यान क्षितिजा नामक कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर राजकोट ,औरंगाबाद, सिल्चर (आसाम) आणि पुन्हा औरंगाबाद विमानतळांवर नियुक्त्या झाल्या. प्रत्येक ठिकाणी वेगळी भाषा , संस्कृती , वेगळं खानपान यासोबत जुळवून घ्यायला लागत होते आणि त्याचबरोबर ते सर्व जवळून अनुभवण्याचा आनंद ही मिळत होता. राजकोट येथे आम्ही " हम दो हमारे दो " झालो अर्थात अथर्व चे कुटुंबात आगमन झाले..

      या दरम्यान Sr. Manager , Asst . General Manager , Deputy General Manager या पदांवर प्रमोशन मिळाले आणि टेक्निकलसोबत प्रशासन आणि व्यवस्थापनच्या जबाबदाऱ्यांची व्याप्ती वाढत गेली. Aviation क्षेत्रातील प्रगत प्रणालींचे प्रशिक्षण व अभ्यासासाठी जर्मनी व फ्रांसचे दौरे करण्याची संधी मिळाली. दरम्यान औरंगाबाद येथे असताना externally MBA (मार्केटिंग) पूर्ण केले. 

      २०१६ मध्ये औरंगाबाद विमानतळ निदेशक ( Airport Director ) चा पदभार मिळाला आणि विमानतळाचा प्रमुख म्हणून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा जवळपास पाचशे जणांच्या टीमचे नेतृत्व करण्यास मिळाले आणि याचवेळी नेतृत्व गुणांची आणि व्यवस्थापन कौश्यल्याची खरी कसोटी लागली. शेड्युल्ड विमानांच्या सुरक्षित अवागमनासोबत मंत्री / उद्योगपती/बॉलीवूड कलाकार यांच्या  खाजगी विमानांची परवानगी देणे तसेच अति महत्वाच्या व्यक्ती ( राष्ट्रपती , पंतप्रधान , उपपंतप्रधान व मुख्यमंत्री )  यांच्या दौऱ्याच्या वेळेस स्थानिक प्रशासन जसे कलेक्टर , पोलीस कमिशनर यांच्याशी समन्वय साधून अतिशय सावधगिरीने त्यांच्या विमानांचे अवागमन यशस्वीरित्या पार पाडणे, एकीकडे राजनीतिक दलातील लोकांचे विमानतळ प्रवेश पासेससाठी दबाव व दुसरीकडे नियमांचे पालन असा समतोल साधतांना कस लागे.
       विमानतळ म्हणजे उचभ्रु ( High  Profile ) लोकांची ये जा त्यामुळे तेथील सुखसुविधांचा स्तर सतत उंचावण्याची गरज, तसेच त्यांचे विमानतळावरील transition अतिशय smooth आणि hassle free करणे व त्याचवेळी जगभरातील दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट म्हणजे विमानतळ त्यामुळे प्रवाश्यांना अनेक सुरक्षा कवचातून जावे लागणे याची सांगड घालावी लागते. या कार्यकाळात स्थानिक हॉस्पिटल मधून ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीचे हृदय, किडनी असे अवयव मुंबई , चेन्नई येथील गरजू रुग्णांना पाठविले.ते काही तासातच पोहचवून त्याचे प्रत्यारोपण होणे गरजेचे असते त्यासाठी green corridor स्थापित करावा लागतो त्याचा विमानतळ अतिशय महत्वाचा भाग असतो कारण येथूनच खास विमानाने ते इतरत्र पाठवले जातात त्यासाठी लागणाऱ्या  सर्व मान्यता /प्रक्रिया  पूर्ण करून केवळ तीन ते पाच मिनिटात विमानाचे उड्डाण करविले आणि प्रत्यारोपण यशस्वी झाल्याचे व तीन जणांना जीवनदान मिळाल्याचे  कळल्यावर आपणास त्यात थोडेफार योगदान देता आले याची धन्यता वाटली.
      आमच्या ऑफिसच्या Corporate Social Responsibility ( कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व ) या योजने अंतर्गत औरंगाबाद येथील म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या १९  शाळांमध्ये मुलींसाठी २७ स्वच्छतागृह ( टॉयलेट्स) बांधण्यासाठी औरंगाबाद  म्युनिसिपल कॉर्पोरेशनला ८५ लाखांची मदत केली.
प्रत्येक वर्षी हज यात्रेसाठी जवळपास मुस्लिम समाजातील ३००० यात्रेकरू औरंगाबाद येथून सरळ जेद्दाह येथे जातात त्यावेळी त्यांच्या इंटरनॅशनल विमानाची व्यवस्था ,त्यांना सोडायला /घ्यायला येणाऱ्यांचा खूप मोठा जमाव त्यात नियमित विमानांच्या प्रवाश्यांची व्यवस्था/सुरक्षा  हे सर्व स्थानिक प्रशासन आणि पोलीस , व CISF  यांच्या समन्वयाने चोख नियोजन करून यशस्वीरित्या पार पाडले. त्यावेळी हज कमिटी द्वारे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
        कुठल्याही प्रदेशाच्या पर्यटन विकासासाठी विमानतळाचा सहभाग महत्वाचा असतो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे औरंगाबाद व मराठवाडा पर्यटन विकासासाठी राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये आम्ही सहभागी झालो त्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे खासदार संभाजी राजे यांच्या हातून पर्यटन मित्र हा पुरस्कार मिळाला.

  असा एकंदरीत प्रवास त्यात बदल्यांमुळे सारखे बदलणारे स्थान,बदललेली परिस्थीशी /वातावरण यांचेशी जुळवून घेत ,  कुटुंबाची मिळालेली साथ महत्वाची ठरली.

      बालपणी मिळालेली कौटुंबिक,शालेय,सामाजिक संस्कार शिदोरी जीवन जगतांना आपल्याला योग्य दिशा देत असते.विचारांचा अन् कर्तृत्वाचा वसा हा कुटुंबातूनच मिळत असतो.आयुष्याचं मापन पास नापास यावर अजिबात करू नका.ते टप्पे आहेत.त्यांना सामोरं जावंच लागतं.स्वतःवर विश्वास ठेवा.हो मी करू शकतो हा विश्वासच आपल्याला जिंकवून देतो.यश मिळवण्यासाठी आपल्यातला सर्वांत चांगला द्या,निश्चितच यशस्वी व्हाल.योग्य अभ्यासाचे नियोजन,वेळेचे व्यवस्थापन,अचूक मार्गदर्शन मिळाल्यास ठरवलेलं ध्येय गाठता येतेच.अन् हो, उमलत्या वयात छोटी-मोठी वाटेला आलेली कामे हीच जबाबदारीची जाणीव करून देत असतात.तेथूनच नेतृत्व अन् व्यवस्थापनाचे धडे गिरवले जात असतात.यशस्वी व्हा...

................धन्यवाद !
📝
श्री.शरद बापू येवले
उपमहाप्रबंधक,
औरंगाबाद विमानतळ 

🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣

शरद येवले यांचा प्रेरणादायी व्हीडीओ पहा..

💎 प्रेरणा एक सुवर्णपान ब्लॉग
https://prerana1suvarnpan.blogspot.in/p/blog-page_2.html?m=0

♻ प्रेरणा एक सुवर्णपान फेसबुक पेज
https://m.facebook.com/preranaeksuvarnpan/

⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜

♻ Email प्रेरणा एक सुवर्णपान
preranaeksuvarnpan@gmail.com

♻ whatsapp प्रेरणा एक सुवर्णपान
भरत पाटील- 9665911657

🔮🎇🔮🎇🔮🎇🔮🎇🎇🔮🎇

प्रेरणा एक सुवर्णपान Broadcast ला ॲड व्हायचे असल्यास 9665911657  नंबरवर whatsapp करा.दर पंधरवाड्यात दीपस्तंभ आपल्या भेटीला...स्वअनुभव रेखाटत

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

No comments:

Post a Comment