मोठं स्वप्नं - मनोज येवले



⚜🎯🔮⚜🎯🔮⚜🎯🔮⚜🎯

प्रेरणा एक सुवर्णपान - 12

मोठं स्वप्नं - मनोज येवले

नमस्कार दोस्तहो...!
       परिस्थिती ही माणसाला शिकवणारी खूप छान शाळा आहे असे मी मानतो.चांगली अन् वाईट या दोन्ही गोष्टींच्या पलीकडे ती नसते हेही तेवढेच खरे. "मनू,तू सर्वांत लहान आहेस,तुला खूप शिकायचंय बरं."हे आण्णांचे शब्द पार हृदयात बसायचेत. आम्ही 11 भावंडे. 7 बहिणी आणि 4 भाऊ. मी सगळयात लहान आहे.सर्वजण एकत्र खेळायचो बागडायचो.सर्वांसोबत घडतांना खूप छान वाटते आजही. लहानपणी घरची परिस्थिती बिकट होती. वडील कॉन्ट्रॅक्टर होते. आमची घरची शेती होती. पण ती असून नसल्यासारखीच. माझी आई शेतावर जाऊन काबाड कष्ट करायची. मी लहान असताना वडिलांना ह्रृदय विकाराचा त्रास असल्यामुळे त्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागला. पूर्ण कुटुंबाची जबाबदारी शेती व्यवसायावर येऊन ठेपली. त्यात बहिणींच्या लग्नात भरपूर खर्च झाला. त्यामुळे कुटुंब कर्जाखाली अडकले. कर्ज घेऊन कुटुंब दिवस कसे काढत होते.हे जवळून अनुभवत होतो.

  प्राथमिक शाळा लोहटार माझी शाळा. चारचौघांसारखेच जीवन वाट्याला आले. आमच्या आण्णांना म्हणजे वडिलांना मला शिकवण्याची खूप तीव्र इच्छा होती. लहानपणापासून शाळेत असलेली हुशारी अन् वेळेवर काम करण्याची वृत्ती त्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास होता. हे आजही जाणवते.अशा परिस्थितीत मी जिद्दीने अभ्यास केला. गुरूजींचा मोलाचा सल्ला अन् नियमित,अभ्यास यामुळे इयत्ता 4 थीमध्ये स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम 3 मध्ये आलो.त्यामुळे वर्षाकाठी 100 ते 110 रुपयांची शिष्यवृत्ती मिळायची. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे दरवर्षी सुट्टीत दुसऱ्याकडे काम करायला जावे लागत असे. लहान वयातच गरिबीचे चटके सोसत होतो. कर्जाखाली असलेले स्वतःचे घर अनुभवत होतो.शाळेच्या दिवसांमध्ये गुरांचा गोठा साफ करणे, पाणी पाजणे अशी कामे करत होतो. माझी आई खूप कष्ट करायची. सर्व घरकामे आवरुन 9 वाजता सकाळी शेतात जायची आणि संध्याकाळी परत घरकाम करायची.सारं अनुभवत होतो.

  हे सर्व सोसून मनाला खूप वेदना व्हायच्या.आईच्या अणि आण्णांचा परिस्थितीला सामोरे जाण्याची संयमता खूप शिकवून जात होती. पैसा हा खूप शिकवत होता असे वाटायचे.त्याचवेळी काहीतरी दाखवायचे अशी जिद्द मनाशी बाळगली.

  पुढे गावातच पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले.मित्र परिवार अन् गुरूजनांमुळे घडत गेले. वेळेवर अभ्यास हेच माझ्या यशाचे गमक समजायचो. अभ्यास हाच जवळचा मित्र झाला होता.इयत्ता 7 वीत मी पुन्हा शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झालो. मनात आत्मविश्वास वाढला. वर्गात मी नेहमी प्रथम यायचो. परंतु 10 वीत मी वर्गात दुसरा आलो. त्याचे खूप वाईट वाटले. पहिल्या क्रमांकाची झालेली सवय, निकोप असलेली स्पर्धा यामुळे दहावीत अपयश आले असे वाटायचे.सावरलो. मनात ठरवले,की 12 वीत भरघोस यश मिळवायचे.

  11 वीला S.S.V.P.s Dhule College ला ॲडमिशन घेतले. मी खेडेगावातून जाऊन 11 वीत पूर्ण कॉलेजमध्ये प्रथम आलो. 12 वीत पण कॉलेजमध्ये प्रथम आलो. परंतु केमिस्ट्री विषयात कमी गुण मिळाल्यामुळे मला इंजिनिअरींग कॉलेजला ॲडमिशन मिळालं नाही. त्यामुळे मी बऱ्यापैकी खचून गेलो. मन लागत नव्हते. मला Agriculture College of Engineering, Rahuri येथे ॲडमिशन मिळालं. मनात जिद्द होती की काहीतरी करुन दाखवायचं.

  राहुरी कॉलेजमध्ये पुढचा प्रवास सुरू झाला. मी कॉलेजला असताना मेसच्या जेवणाचे पैसे भरण्यासाठी पैसे नव्हते. तसेच वहया, पुस्तके, कपडे घेण्यासाठी पैसे नसायचे. कुटुंबाने नेहमीच माझ्या स्वप्नांना साथ दिली. मनात नेहमी मोठा माणूस बनण्याची जिद्द असायची.ती जिद्द सदैव जागृत ठेवूनच अभ्यास करायचो.काहीतरी वेगळं अन् आदर्शवादी करायचेय ही खूणगाठ मनाशी होतीच. मन लावून अभ्यास करायचो.खूप शिकवलं पुस्तकांनी. इंजिनिअरींग कॉलेजच्या शेवटच्या वर्षी माझे सिलेक्शन महिंद्रा ॲन्ड महिंद्रा कंपनीत झाले. हा माझ्या आयुष्यातील पहिला आनंदाचा क्षण होता. कारण वृध्द आई वडिल व घरची बिकट परिस्थिती बघता हा वाळवंटातील झरा होता.

  नोकरी करत असताना घरावर कर्ज होते. सर्व कर्ज फेडले. शेतीसाठी ट्रॅक्टर घेतले. नोकरी करत असताना लहानपणीची मोठे होण्याची जिद्द मनात होती. मी महिंद्रा ॲन्ड महिंद्रा, न्यु हॉलंड ट्रॅक्टर्स, फोर्स मोटर्स या कंपन्यांमध्ये चांगल्या हुद्द्यावर काम केले. 15 वर्षे नोकरी केली. 

  नोकरीत मर्यादेच्या बाहेरकाम करता येत नसे. नोकरी करता करता 2004 साली व्यवसायाला सुरुवात केली. मनाशी बांधलेली खुणगाठ आता खुणवत होती.मोठं होण्याची जिद्द .लहानपणी पाहिलेलं स्वप्न. थोडी जीवनात जोखीम घ्यावी वाटली अन् ती घेतलीच.बांधकाम व्यवसायात जम बसल्यावर 2008 साली मी नोकरी सोडली.

  बांधकाम व्यवसाय जोमात सुरु केला. आम्ही प्लॅटीनम बिल्डकॉन नावाची कंपनी स्थापन केली. आज पुण्यात आमचे 4 प्रोजेक्ट्स सुरु आहेत.प्रवास सुरू आहे. मनाशी ठरवलेलं पूर्ण झाल्यासारखे वाटते. आव्हाने येतच असतात.सामोरं जातोय जिद्दीनं.देवाच्या कृपेने व आई वडिलांच्या आशीर्वादाने व्यवसायात प्रगती आहे. मला माझी सहचारिणी स्वाती हिने व्यवसाय स्थापन करण्यात सहकार्य व पाठींबा दिला. मला अभिनव व आयुष ही दोन मुले आहेत. माझ्या मोठ्या भावंडांच्या पाठींब्यामुळे शिकू शकलो हे ही महत्त्वाचेच.मिळालेले मित्र,गुरू,समाज,गाव यांचा सदैव ऋणी असेन.

  दोस्तहो...! माणसाची परिस्थिती खूप शिकवते.उजाडणारा अन् मावळणारा यावर विश्वास ठेवा.थोडा वेळ हा जाऊ द्यावा लागतोच पण त्या वेळेचे आपण किती सोने करतो हेही महत्वाचेच.स्वप्नं जरूर पहा.ती पहावीच माणसाने.तीच खरा आधारवड असतात आपली.त्यासाठी झोकून देऊन,प्रामाणिकपणे ती साकार करण्यासाठी प्रचंड मैहनतीची पण तयारी ठेवावी. अभ्यास हाच जवळचा मित्र मानला.पुस्तके हीच सोबती झाली. त्यांच्यासोबतच सुख दुःख बोललो अन् त्यांनीच दिशा दाखवली. मोठं बनण्याची जिद्द मनात कोरून ठेवली होती.त्यासाठी झोकून देऊन दिशा ठरवत होतो.यश अपयश दोघं सोबतीला होते, पण मनाशी पक्के ठरविले होते.पडलो तरी चालेल पण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करीन. प्रत्येक गोष्ट मनापासून करा.जिद्द,आत्मविश्वास,योग्य नियोजन,प्रामाणिकपणा यांच्या जोरावर माणूस प्रगती करु शकतो. स्वप्नं जरूर पहा पण ती साकार करण्यासाठी स्व झोकून देण्याची तयारी ठेवा.
धन्यवाद..!

👉🏻
मनोज रामदास येवले
CMD Platinum Buildcon
पुणे.

⚜🎯🔮⚜🎯🔮⚜🎯🔮⚜🎯

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

💎 *प्रेरणा एक सुवर्णपान ब्लॉग* 💎
https://prerana1suvarnpan.blogspot.in/p/blog-page_2.html?m=0

♻ *प्रेरणा एक सुवर्णपान फेसबुक पेज*
https://m.facebook.com/preranaeksuvarnpan/

♻ *Email प्रेरणा एक सुवर्णपान*
preranaeksuvarnpan@gmail.com

♻ *whatsapp प्रेरणा एक सुवर्णपान*
भरत पाटील- 9665911657

🔮🎇🔮🎇🔮🎇🔮🎇🎇🔮🎇

*प्रेरणा एक सुवर्णपान Broadcast ला ॲड व्हायचे असल्यास 9665911657  नंबरवर whatsapp करा.दर पंधरवाड्यात दीपस्तंभ आपल्या भेटीला...स्वअनुभव रेखाटत*

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

No comments:

Post a Comment