संघर्ष हाच अनुभव - प्रफुल्ल पाटील


🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣

⚜ *प्रेरणा एक सुवर्णपान- 15* ⚜

संघर्ष हाच अनुभव - प्रफुल्ल पाटील

शिक्षणातून संस्कार हेच खरे ज्ञान.मित्रहो,प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्या परिवारासाठी मेहनत घेऊन जीवन जगत असतो,पण काही गरीब कुटूंबातील तरुणांना लहानपणापासून एक चांगला मार्गदर्शक (गुरु) जर मिळाला तर खरेच त्याला यश नक्कीच येईल यात काही शंका नाही.

    सुख दु:खाच्या आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेला सुंदर रुमाल म्हणजे मानवी जीवन आणि अशा हया जीवनात संघर्ष करतांना प्रेरणा फार महत्वाची असते.

माझे बालपण तर काही फारसे आठवत नाही.आम्ही तीन भावंडे. दोन मोठया बहिणी व मी.मी सर्वात लहान असल्याने माझे बालपण मजेत गेले.माझे शिक्षण आमल्या गावीच झाले.१ली ते ४थी पर्यंतचे शिक्षण जि.प. शाळेतच झाले. मला १ली ते ४ थी पर्यंत वर्ग शिक्षक म्हणून गोसावी गुरुजी (अंतुर्लीकर) लाभले. ३ री ते ४थी पर्यंतची टयुशन ठाकरे गुरुजी यांच्याकडे होती.चांगले गुरुजी मिळाल्याने त्यांची शिकवण चांगल्या प्रकारे मिळाली. तसेच ५ वी ते १० चे शिक्षण आपल्या कै.सुं.सि.मालपुरे माध्यमिक विद्यालय लोहटार येथे झाले. येथील शिक्षकांचा सहवास चांगला लाभला.७ वी ते ८ वी पर्यंतचे माझे शिक्षण चांगले गेले. परंतु पुढील शिक्षणावर माझे दुर्लक्ष होऊ लागले.कारण घरात अठराविश्व दारिद्रय असल्यामुळे काही दिवस शाळेत,तर काही दिवस शेतात मजूरीसाठी जाऊ लागलो. *आमचे वर्गशिक्षक श्री. आर.पी.पाटील सर नेहमी म्हणायचे,"अभ्यास खूप करा,हेच वय असते,नाहीतर डोळ्यांच्या दोन धारा बंद होत नाहीत भविष्यात".* याचे खरोखर महत्त्व आज कळू लागले आहे.

        मी ९ वीत असतांना आमची वडिलोपार्जित असलेली २ एकर शेती विकण्याचा निर्णय माझ्या आई-वडीलांनी घेतला हेाता,कारण माझ्या दोन्ही बहिणींच्या लग्नासाठी तेव्हा माझ्या मामांनी ५० हजार रु.दिले होते.इतरही १० ते १५ हजार रु.चे कर्ज आमच्यावर होते.त्यामुळे शेती विकण्याशिवाय पर्यायही आमच्याकडे नव्हता परंतु माझ्या मामांनी आईला सांगितले की, "ताई,मी तुझ्याकडून पैसे मागणार नाही.माझ्याकडून ही मदत समज,शेती विकायची नाही". त्यामुळे आमची शेती तशीच आमच्याकडे राहिली. कारण आजच्या १७-१८ वर्षापूर्वी शेतीला ३० ते ३५ हजार रु. एकरी भाव त्यामुळे आज त्याचे महत्व कळते,की त्यावेळेस मामांनी केवढी मोठी मदत केली होती. त्यांचा सर्वात मोठा उपकार माझ्या परिवारावर झाला होता.लहान क्षेत्र होते पण ते अनमोल होते. *वेळेला मदत हीच खरी मदत असते.*

     मी २००२ ला १० वी पास झाल्यावर ११ वी बाहेरुन करण्याचे ठरविले.बिकट परिस्थितीमुळे मला कामाशिवाय पर्याय नव्हता.त्यामुळे मी ११ वीला भडगांव येथे प्रवेश घेतला. पुढे काही महिन्यातच वडिलांना पॅरालिसीस व ह्दयविकाराचा झटका आल्याने आसमानी संकट ओढवले.परंतु म्हणतात ना,की देव तारी त्याला कोण मारी.वडील बचावले.घरातील सगळीच जबाबदारी माझ्यावर येऊन पडली.या संकटामुळे आणखीनच कर्ज झाले होते. त्यामुळे मी रोज कामास जाऊ लागलो.आपला उदरनिर्वाह भागवू लागलो.यासाठी मला कोणीही सांगितले नाही,की तुला काय करायला पाहिजे. कारण मी लहानपाणासूनच माझ्या आईला कष्ट करतांना पाहत होतो. तिचे कष्टच सारं शिकवत होते.जीवनातले सारे प्रसंग जगत होतो. त्यामुळे आईला मदत करावी व आपला परीवार सुखी ठेवावा,यासाठी मी दिवस रात्र मेहनत करु लागलो. कारण जेव्हा  आम्ही सर्व झोपायचो,तेव्हा आई सगळीच रात्र जागून काढत होती.अन् ती रात्रच वेगळे शिखर गाठायचेय हे खुणावत होती.

     माझे सर्वात मोठे स्वप्न म्हणजे नवे घर बांधणे होते. तसे ते माझ्यासाठी एक मोठे आव्हानच होते. कारण ४० ते ५० रु. रोजंदारी मध्ये घर चालवायचे की, कर्ज फेडायचे,काय करावे सूचेनासे झाले होते.त्यामुळे मी ऑक्टोबर २००४ साली माझ्या मावशीकडे सुरत येथे हिरा घासने शिकून हिरा कंपनीत काम करण्याचे ठरविले.परंतु मंदी असल्याने मी सुरुवातीला ६ महिने मावशी यांची हॉटेल व पान दुकान होते,त्यावर मी ६ महिने तसेच चहाच्या दुकानावर ६ महिने काम केले.नंतर हिरा घासणे शिकून हिरा कंपनीत सुमारे दीड वर्ष काम कले.तेथे सारखी मंदी पडत असल्याने रोजंदारी देखील कमी पडत होती. त्यामुळे मी गावी येण्याचे ठरवले व निश्चय  केला की, यापुढे मी बाहेरगावी खाजगी कंपनीत जाणार नाही.मी 20 मे 2006 साली गावी परत आलो. रोजाने कामाला जावू लागलो. शेतीची कामे, ट्रॅक्टरवर वाळू, माती,शेणखत यासारखी कामे करत राहीलो व कामे करत असतांना ट्रॅक्टर चालवणे,घराचे खड्डे खोदणे,पाईपलाईन खोदणे, चार चाकी गाडी चालवणे यासारखी कामे देखील मी करत होतो. त्यामुळे माझा कुठलाच दिवस रिकामा जात नव्हता,मी हमालीची अत्यंत जड कामे केल्यामुळे रोजंदारी देखील चांगल्या प्रकारे मिळत होती. मित्रहो,जवळपास गावातील सर्व  बागायत शेतकरी यांच्याकडे मी कामे केली आहेत.त्यामुळेच मी माझ्या परिवाराचे कर्ज लवकर फेडू शकलो.हा विशिष्ट वाटेला आलेला क्षण सर्व परिवारासह जगलो.दररोज नवीन येणारा दिवस आव्हान घेऊन येत होता अन् सामोरा जात होतो.

 मनात कधीतरी विचार यायचा की आपले अपूर्ण राहिलेले पदवीचे शिक्षण पूर्ण करावे.पण नविन घराचे स्वप्न मला काही झोपू देत नव्हते.त्यामुळे मी पुढचे शिक्षण पूर्ण करु शकलो नाही. याची आजही खंत वाटते. रात्रंदिवस काम (कष्ट) केल्याने मी माझे नवीन घर बांधकाम करुन माझे स्वप्न पूर्ण केल्यामुळे आई-वडील खूप आनंदी झाले. *स्वप्नं ही पूर्ण होतातच मित्रांनो,फक्त ती पूर्ण करण्यासाठी लागणारी संघर्ष करण्याची क्षमता निर्माण व्हावी लागते.*

   मला संगणक येत असल्यामुळे मी प्रा.आ.केंद्रात (लोहटार) येथे अर्धवेळ रु. ३००० इतक्या मानधनावर काम केले. त्यामुळे शासकीय कार्यालयात काम केलयाने मला शासकीय नोकरीची ओढ लागली.मी पाचोरा येथे जावून शासकीय नोकरीचे आवेदन शोधू लागलो. तेव्हा (२०११ मध्ये) RPF मध्ये ऑल इंडिया लेव्हल ला भरती निघाली म्हणून मी हे आवेदन भरले व लगेच २ महिन्यांनी पोलिस भरती निघाली.त्या भरतीत माझे मित्र दत्तात्रय पाटील हे सुध्दा होते. यासाठी त्यांची भरपूर मेहनत,जिद्द होती. त्यामुळे ते या भरतीत यश मिळवून भरती झाले.परंतु माझी इच्छाशक्ती प्रबळ नसल्याने मला अपयश आले.दत्तात्रय पाटील यांची जिद्द,चिकाटी पाहून मी भारावून गेलो.त्यांची ती प्रेरणा मला खूप काही शिकवून गेली. कारण ते माझ्यापेक्षा वयाने मोठे व दोन मुलांचे बाप असून सुध्दा भरती होऊ शकतात,तर मी का नाही?. म्हणून जोराने सराव चालू केला.त्यापाठोपाठ गावात पेपर वाटायचे देखील काम सुरु केले.आरपीएफ चा फॉर्म भरलेला असल्याने जून २०१२ मध्ये मुंबई (भायंदर) येथे पेपर दिला.या परीक्षेत उत्तीर्ण झालो.त्यासाठी पुढील मैदानी परीक्षेसाठी भुवनेश्वर येथे निवड होऊन सदरची परीक्षा देखील उत्तीर्ण झालो.त्या ठिकाणी फक्त मागचे दिवस आठवले.१६०० मी. धावलो. इच्छाशक्ती प्रबळ झाली असल्याने व लहानपाणासून येणाऱ्या वाईट चांगल्या अनुभवांमुळेच ते शक्य झाले. आजपर्यंत कधीही १६०० मी.चा सराव केला नव्हता.प्रबळ इच्छाशक्तीमुळेच ते पूर्ण करु शकलो.आशा अधिकच पल्लवित झाल्या होत्या.परंतु मौखिक (मुलाखत) परीक्षा कधीही न दिल्याने मनात थोडी भिती येऊन ना ना प्रकारचे विचार येत होते.  विविध प्रश्न पडू लागले.त्यावर उपाय म्हणून मी मोतीलाल पाटील व मित्रपरिवार यांच्याकडून मागर्दर्शन घेतले व त्यांचे मार्गदर्शन खूप फायदेशीर ठरले.मला ज्या विषयांवर आमचा प्रश्न उत्तर सराव झाला होता.जवळपास तेच प्रश्न मुलाखतीमध्ये विचारण्यात आले होते.परिणामी चांगल्या मार्कांनी पास झालो होतो.अन् मला माझ्या आवडीचे मंडल मिळाले.खूप आनंद झाला होता.कुटुंबासह सर्वांना.ही नोकरी मिळवायला माझ्या गावातील काही लोकांच्या दुवा देखील कामात आल्या.गावातील बऱ्याच लोकांनी माझे नातेवाईक नसून देखील त्यांनी माझ्यासाठी चतुर्भूज नारायण मंदिरात देवाला आपापल्या परीने प्रसाद व तेल चढवले.हे सर्व फक्त माझ्या प्रेमापोटी त्यांनी केले होते.खरंच,निर्माण झालेली नाती ही रक्ताची होती.

   मला नोकरी लागल्याने माझे घरचे खूप खूश झाले.माझे आई-वडील यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता.परंतु हा आनंद काही जास्त काळ टिकू शकला नाही.कारणही तसेच होते, माझी १ नोव्हेंबर २०१४ रोजी जालंधर (पंजाब) येथे ट्रेनिंग सुरु झाली.सगळे काही व्यवस्थित असतांना १८ जानेवारी, २०१५ रोजी वडिलांची प्राणज्योत मावळली.मला यायला उशिर झाल्याने माझे बंधु सतिष पाटील, नातेवाईकांनी,गावाने वडिलांची सेवा केली.त्यामुळे त्यांचे मनापसून ऋण व्यक्त करतो.नशिब एवढे की,वडीलांसमोर स्वत:चे नवीन घर,नोकरी व सर्व काही व्यवस्थित झाले होते.परंतु आजही वडीलांची खूप आठवण येते.कारण आईवडीलांचे प्रेम कोणीही देवू शकत नाही.परंतु आज जे काही आहे. ते फक्त देवाच्या आशिर्वादाने, चांगल्या गुरुंच्या ज्ञानाने,चांगल्या मित्राच्या सहवासाने व आई-वडीलांच्या प्रेरणेमुळे !

  मित्रहो,जीवनात येणारे सर्व क्षण आनंदाने जगा.योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळतेच.सुखदुःखाला सामोरे जा.आलेला दिवस एक आव्हान घेऊन येतो त्याला सकारात्मक विचार करून जगा.प्रेरणा एक सुवर्णपान हया माध्यमातून होतकरु तरुणांसाठी किंवा विद्यार्थ्यांचे मनोबल अधिक उंचावेल व या माध्यमातून काही अनुभवांमुळे मार्गदर्शन मिळेल.हे सुवर्णपान दिशा दाखवेल.प्रयत्न हे आपल्यालाच करावयाचे आहेत.
धन्यवाद..!

प्रफुल्ल शिवाजी पाटील
RPF Commando (Central Railway, Mumbai)
9096327734

🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣

♻ *प्रेरणा एक सुवर्णपान फेसबुक पेज*
https://m.facebook.com/preranaeksuvarnpan/

⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜

♻ *Email प्रेरणा एक सुवर्णपान*
preranaeksuvarnpan@gmail.com

♻ *whatsapp प्रेरणा एक सुवर्णपान*
भरत पाटील- 9665911657

🔮🎇🔮🎇🔮🎇🔮🎇🎇🔮🎇

*प्रेरणा एक सुवर्णपान Broadcast ला ॲड व्हायचे असल्यास 9665911657  नंबरवर whatsapp करा.दर पंधरवाड्यात दीपस्तंभ आपल्या भेटीला...स्वअनुभव रेखाटत*

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

No comments:

Post a Comment