दिव्य स्वप्न - किशोर पाटील


🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣

⚜ प्रेरणा एक सुवर्णपान - 16⚜

दिव्य स्वप्न - किशोर पाटील

      लहानपण फारसे आठवत नाही.4 थी ते 10 वीचे आठवते. शिक्षण 10 वीपर्यंत लोहटार येथेच झाले. या काळात शिक्षकांकडून फार काही शिकायला मिळाले.वडिलांच्या शिस्तीमुळे आज काही तरी बनता आले.शाळेत असतांना खूप मजा केली.वडील शेती काम करायचे. तशी घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. पण वडिलांची मेहनत सतत डोळ्यांसमोर दिसत होती.ती आजही आठवते.सकाळी 4 वाजता उठून वडील सर्व काही काम करत होते.आणि त्यांची इच्छा होती,कि मी खूप शिकावे आणि काही तरी चांगले करावे.ते मला नेहमी बोलायचे, *चांगल्या मित्रांसोबत रहा.चांगल्या लोकांच्या घरी जात जा.त्यांचे उच्च विचार नेहमी स्विकार*.  मला नेहमी ते पी.के.पाटील सर (हेडसर) यांच्या घरी रोज घेऊन जात, त्यामुळे त्यांचे आणि आमचे जवळचे नाते असल्यासारखे संबंध झाले होते.ते मला नेहमी मार्गदर्शन करायचे.वाघ सर,सोनी सर
रमेश गुरुजी ह्या सरांचे मार्गदर्शन नेहमी असायचे.

     शाळेत पहिले 1 ते 10 नंबर येणाऱ्या मुलांसोबत मैत्री करायचो. (किशोर महाजन,किरण महाजन,दीपक परदेशी,पूनम वगैरे असा आमचा ग्रुप होता) हे सर्वजण ज्या सरांकडे शिकवणीला जात त्याच सरांकडे मीही जात होतो.घरची परिस्थिती जेमतेम असल्याने शेतीची कामे सुद्धा करावी लागायची. हिवाळ्यात चिड्या वळायला जाणे,म्हशी चारायला जाणे व सुट्टीच्या दिवशी शेतात गेल्याशिवाय पर्याय नव्हता.घरात कोणीही शिकलेले नव्हते. त्यामुळे मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते.शेतीमधून फारसे उत्पन्न येत नसल्यामुळे घरची परिस्थिती बिघडत होती.10 वीपर्यंत फुल चड्डीसुद्धा मिळाली नाही.घरी सायकल होती.परंतु वडिलांना रोज शेतात व गावी जाण्यासाठी लागायची त्यामुळे वडील तिला खूप जपायचे.10 वी पर्यंत हाफ चड्डी.ती ठिगळ लागलेली असायची.वडिलांच्या स्वभाव खूप कडक असल्यामुळे घाबरायचो.१०वीत होतो,परीक्षा सुरु असतांना वडिलांनी एकच सांगितले,'पास झाला तर घरात यायचे नाहीतर तिकडेच निघुन जायचे किंवा मरून जा'. धास्तावलो होतो.खूप भिती वाटत होती. 10 वीची परीक्षा झाली. माझी मावशी पुण्यात राहत होती. ती नेमकी परीक्षा झाली आणि गावी आली होती. मला वडिलांचा शब्द नेहमी आठवायचा. म्हणून मी त्या भीतीने ठरवले कि, मावशीसोबत पुण्याला जावे.मी परीक्षा झाली आणि 4 थ्या दिवशी मावशीसोबत पुण्याला आलो.

      पुण्यात आल्यावर मराठी व्यवस्थित बोलता येत नव्हते. सायकल सुद्धा येत नव्हती. पुण्यात आल्यावर काकांची सायकल शिकलो. महिनाभर घरीच होतो. मग काकांना सांगितले कि मला काहीतरी काम बघा. मी परत गावी जाणार नाही. काका म्हणाले तू काय काम करशील तुला काहीच येत नाही आणि हे पुणे शहर आहे. मी म्हणायचो कोणतेही काम करेल. पण आता पुण्यातून परत जाणार नाही. येथेच काहीतरी करून दाखवेन. मग मीच स्वतः हडपसर इंडस्ट्री एरियात पायी फिरायला सुरुवात केली. *जग खूप मोठे, आपण कुठं ह्याचा शोध घेत फिरत होतो.* मला आठ दिवसांनी 1 कंपनीत हेल्पर म्हणून काम मिळाले.दिवसाला १५ रु.रोज मग तेथे कामाला जाऊ लागलो.महिन्याला पगार आली ४५० रु-  त्यातले ३०० रु. मावशीला दिले. कारण त्यांच्याकडे राहत होतो. विचार केला १५० रुपयात काय करणार म्हणून तिथेच डबल ड्युटी म्हणजे १६ तास काम करायला लागलो.तेव्हा घरी पैसे देता आले. त्यानंतर 10 वी चा निकाल लागला.पास झालो.५५ टक्के मार्क्स मिळाले.मी ठरविले पाचोरा येथे दररोज जायचे म्हणजे पैसे लागणार. घरची परिस्थिती डोळ्यासमोर...मार्गदर्शन कोणी करणारं नाही,त्यापेक्षा बाहेरून कॉलेज करु असे ठरविले.पुण्यातच काम करून 11 वी 12 वी बाहेरून केली.
12 वीत Fail झालो आणि वडीलांनी त्याच वर्षी बहिणीचे लग्न करायचे ठरविले पण पैसे नव्हते.मला विचारले,'तुझ्याजवळ किती पैसे आहेत'.खरं माझ्या कडे 6000 रु.होते,पण 6000 रूपयात काहीच होणार नव्हते. पुण्यात येऊन दोन वर्ष झाली होती.त्यामुळे जीवाभावाची चार मित्र झाली होती. (सुनील, पप्पू, शिवा, सतीश) त्यांना सांगितले आणि  त्यांच्या मदतीने घरी 10000 रु.दिले. *मैत्रीत खूप मोठी ताकद असते.* तेव्हा पासून आतापर्यंत माझे मित्र माझे well wisher होते.मैत्रीचे जीवनात खूप मोठे स्थान असते.ते वेळोवेळी अनुभवत आहे.लग्नाला खर्च खूप झाला. वडीलांवर कर्ज झाले आणि शेतीचे उत्पन्न त्या प्रमाणात येत नव्हते. कायम डोक्यात विचार काय करावे? काहीच उमजेना.स्वतः ला सावरत होतो. *एकटेपणात माणूस स्वतः स्वतःचा जवळचा मित्र असतो.* स्वतःला प्रश्न करायचो, 'किशोर,तू काम कर सगळे चांगले होईल'.कंपनीत पगार वाढत नव्हता.विचारांचा सागर महासागर होत होता.

    काही दिवसांनंतर दुसरी कंपनी शोधायला सुरवात केली. एक ओळखीचे असलेले हिंगोण्याचे आमचे पाहुणे होते. त्यांचे जावई पुण्यात manager आहेत असे माहित होते मग त्यांना जाऊन भेटलो.चिंचवडला राहत होते.ते एका ice company चे manager होते. त्यांनी सांगितले कि 'माझ्याकडे तुझे शिक्षण नसल्यामुळे तुला हेल्परचेच काम करावे लागेल व आमच्याकडे सर्व कामगार बिहाराचे आहेत. तू कोणालाच सांगायचे नाही,कि तू माझा नातेवाईक आहे वा ओळखीचा आहे.पगार 30 रु.देणार आणि चहा साठी 4 रु. मिळणार'.हातांना काम मिळाले होते.दिवस थंडीचे ऑक्टोबर महिना होता. विचार केला १५ रु. वरून ३० रु. मिळणार होते.आनंदात होतो.कामाला गेलो. त्या कामगारांनी मला बर्फाच्या गोडाऊनमध्ये काम लावले. टेम्पो आला कि बर्फाच्या १०० किलोची लाद्या उचलून टेम्पोत भरायचे.भरपूर जड जात होत.पण इलाजच नव्हता. रहायले हडपसर.कंपनी चिंचवड ला होती.पगार ३० रु. बस भाडे ५रु.होते, विचार केला जाऊन येऊन १० रु.खर्च होणार हे परवडणार नव्हते.मग दररोज २५ ते ३० k.m.सायकलीवर जाऊ लागलो.सकाळी हडपसर मधून साडे सहा वा. निघालो 8 वाजता कंपनीत जायचे.दररोज सायकलीवर ५० ते 60 km. प्रवास अखंड सुरू झाला.इकडे नेमके मावशीला लहान मुलगी असल्यामुळे डब्बा बनवणे शक्य होत नव्हते.मग मावशीला सांगितले कि कंपनीत सर्वांचे डब्बे असतात.रोज चार रूपये चहाचे मिळायचे त्यात मी रोज दोन वडापाव खाऊ लागलो. वडीलांचा फोन यायचा त्यांना सर्व काही व्यवस्थित आहे असे सांगायचो. जीवनाचा आनंद लुटत होतो.मेहनत आणि पोट यांची होत असलेली फरफट मनातल्या मनात गिळत होतो.गोडाऊन मधून बर्फ काढताना खूप त्रास व्हायचा कारण थंडी खूप होती.तरी तसेच 4 महिने काम केले पण तिथे शिकण्यासारखे काहीच नव्हते. मनाला विचारले,पुढे कसे होणार आता ठीक आहे,अशा कामात माझे करिअर होणार नाही तितके वडीलांचे झालेले कर्ज हे डोक्यात होते. 

     पुन्हा नवीन जॉब शोधायला सुरवात केली.हडपसरमध्ये एका कंपनीत office boy च्या मुलाखतीसाठी गेलो. तेथे ३०लोकांचा  office staff होता. साहेब लोक सकाळी 9 वाजता येतात त्या अगोदर office झाडून पुसून झाले पाहिजे.( office 3 मजली ) आणि साडे नऊ वाजता सर्वांना चहा बनवून द्यायचा आणि प्रत्येक साहेबांकडून प्रत्येक कपाला 2:50 रु. घ्यायचे.भांडी व गॕस कंपनी देणार व इतर साहित्य ( चहा, साखर, दुध ) तुम्ही आणायचे. त्या नंतर दिवसभर MD च्या केबिनजवळ व इतर office कामे/पोस्टाची कामे करायची. मी विचार केला पगार १०० रु. व चहाचे कमीत कमी ६०० ते ७०० रू. मिळतील (१०० रु. वरून) १५०० ते  १६०० रु. मिळणार म्हणून तेथे येतो सांगितले.सगळ्यात महत्वाचे म्हणजे साहेब लोकांच्या सोबत राहता येईल ते कसे बोलतात, कसे वागतात हे कळेल आणि शिकायला मिळेल. हा विचार केला बाहेर पडलो तर बाहेर कामगार लोकांनी विचारले त्यांना सर्व काही सांगितले. ते म्हणाले येथे १५ वर्षात एकही office boy टिकला नाही. कारण साहेब लोक खूप त्रास देतात.काम खूप आहे.पण माझ्याकरिता मला पैशांपेक्षा साहेब लोकांमध्ये रहायला मिळणार अन् खूप जीवनोपयोगी शिकायला मिळणार हेच ध्येय बनले होते. तोच माझा (turning point) ठरला. खरंच खूप काम होते. साहेब लोक खूप त्रास देत होती. पण मी घाबरलो नाही.हिम्मत ठेवली आणि काम करत राहिलो. पहिला महिना काम केले.पगार ओव्हर टाईम पगार आला. १४०० रु. आणि चहाचे ९०० एकूण २३०० रु. खूप आनंद झाला. ९०० रु. वरून २३०० रु. अजून चांगल्या प्रकारे काम करू लागलो. सकाळी 7 वाजता कंपनीत जाऊन रात्री 8 वाजे पर्यंत थांबू लागलो. साहेब लोकांना सर म्हणून म्हणून त्यांच्या प्रत्येक काम करू लागलो. तेथे sales & account purchase हेही पाहू लागलो. सर्व साहेब असल्यामुळे त्यांच्याकडून ते कसे बोलतात,राहतात,वागतात यावर त्यांच्यावर लक्ष केंद्रित करू लागलो. त्यासाठी मी सकाळी 7 वाजता जाऊन सर्व झाडून पुसून 9.15 ला चहा देऊ लागलो. त्यामुळे साहेब लोकांना माझ्याप्रती गोडी निर्माण झाली. कोणत्याही साहेबांना उलट बोलत नव्हतो. हे सर्व करतांना खूप त्रास होत होता.एकच विचार येत होता.किशोर येथेच सर्व काही शिकायला मिळणार आहे आणि पैसा देखील. तेव्हाच विचार केला स्वतंत्र रूम करूया.मावशीकडे किती दिवस राहणार.. रूम केल्याने स्वतः काही वळण लागेल.रूम केली,हाताने स्वयंपाक करायचे ठरविले. आणि कितीतरी दिवस कच्चेपक्के अन्न खात होतो. कारण काहीच येत नव्हते. कधी कधी वाटायचे सर्व सोडून गावी जावे, कारण काम खूप असायचे, पण मन सांगायचे कि, गावी जाऊन काहीच होणार नाही, शिक्षण नाही,त्यापेक्षा जे करायचे ते येथेच करायचे,परंतु हे सर्व काही करतांना कोणालाच सांगितले नाही कि मी काय करतो,आणि किती त्रास होता. फक्त *एकच विचार ठेवला काहीतरी करायचे.* आणि पैसा कमवायचा. नेमक काय करायचे तेही ठरवू शकत नव्हतो. कारण बेस काहीच नाही,कोणी मार्गदर्शक नाही,पण स्वतःवर विश्वास होता कि तोच काहीतरी करू. आपण फक्त काम करत रहावे.तेच करत राहिलो. त्या कंपनीत जवळ जवळ अडीच ते तीन वर्ष काम केले. पण बरच काही शिकलो. त्यानंतर कंपनीत युनियन झाल्यामुळे मालकाने कंपनी बंद केली.आता पुन्हा टेन्शन काम शोधायचे 10 दिवस इकडे तिकडे फिरलो.काही काम भेटत नव्हते. 

       गावातील विजय आबांचे भाऊ हडपसरलाच राहतात. त्यांच्या मुलाची वर्कशॉप होती. तेथे part time काम करू लागलो. सकाळी 6 ते 10 व त्यानंतर कुरियर boy म्हणून जॉब मिळाला तेथे कुरियरच्या office मध्ये 1.30 ते 6 वाजेपर्यंत डिलेव्हरी करायचे. त्यातही पुण्यातील बराच एरिया माहित झाला. तेथे सुद्धा मन लागत नव्हते. कारण पुढे करियरचा विचार सतत डोळ्यात घुमत होता.हातात शिक्षणाची मोठी डिग्री नसतांना स्वतःमध्ये गुंतत होतो.काहीतरी करायचे. *वडील नेहमी सांगायचे,मेहनत करत रहा कामाला घाबरू नको. काम आपल्याला घाबरले पाहिजे. कामाची लाज वाटू देऊ नकोस.* मग पुढे एका distributor कडे salesman म्हणून काम मिळाले. तेथे 6 महिने काम केले. त्यात मार्केट मध्ये माझे स्वतःची एक ओळख केली.मार्केटमध्ये कामामुळे दुकानदार नावाने सर्व ओळखू लागले. पगार फक्त २५०० रु. होता. मग वडीलांनी लग्न करायचे ठरविले. 2000 मध्ये लग्न झाले.माझ्या आयुष्यात एक लक्ष्मीच्या रूपाने रेखा आली. आणि तिने घर सांभाळून मला साथ दिली. पगार पुरत नव्हता. पुढे एका कंपनीत जॉबची ऑफर आली. पगार 6000 रु. देणार पण महिन्यात २० ते २५ दिवस टूर करावी लागणार होती. रेखा म्हणाली आता आपल्याला पैशाची गरज आहे. तुम्ही join करा. मी घर सांभाळून घेईन मी join केले. महिन्याला २० ते २५ दिवस टूर करत होत होता.माझी मेहनत सुरूच होती आणि २००१ मध्ये मयूर जन्माला आला. अजून खर्च वाढला. पण हिम्मत वाढत गेली.कारण रेखा सतत सांगायची आणि वडीलसुद्धा कि मेहनत करत रहा,रस्ता आपोआप सापडेल.मी सतत टूर & टार्गेट च्या मागे लागलो. मला एक सवय लागली.मार्केटमध्ये प्रोडक्टची आतपर्यंत जाऊन माहिती काढायची.प्रत्येक गोष्ट शिकत गेलो.आणि हळूहळू माझा पगार वाढत वाढत अवघ्या 8 वर्षात ६५००० रु. झाला. माझी प्रगती वाढत गेली. मला माझे भविष्य समोर दिसू लागले. मग मला विचार येऊ लागला कि, कंपनीसाठी २० ते २५ दिवस टूर करतो.मग आपण का रिस्क घेऊ नये. 2014 मध्ये निर्णय घेतला कि आता रोजंदारी न करता स्वतः हा व्यवसाय करायचा आणि तो सुरु केला *श्री पेडकाई सेल्स & सर्विसेस* या नावाने. त्यात गॕस स्टोव्ह / gas water heater आणि spair parts चे होलसेल काम सुरु केले ते फक्त मेहनत आणि प्रामाणिकपणामुळे आज महाराष्ट्रामध्ये बरेच भागांमध्ये डीलर आहेत आणि आज रोजी पुण्यात 2 फ्लॅट,car व सोबत काम करणारी 8 माणसे आहेत.

      *घर सोडताना मनात ठरवले होते कि काही तरी करून दाखवायचे आणि आज ते प्रत्यक्षात उतरवले* मयूर आता डिप्लोमाच्या दुसऱ्या  वर्षाला आणि प्रथमेश पाचवीला आहे.मयूर खूप समजदार असल्यामुळे माझ्या व्यवसायात त्याची मला खूप मदत होते. onlin बँकिंग व मेलची सर्व कामे आता मयूरच सांभाळतो. माझी स्वप्न आहे कि स्वतःची कंपनी निर्माण करावी तसेच माझ्या गावातील मंदिरांची देखभाल अन् तरूणांना दिशादायी ठरेल असे काम करावे.सोबत धार्मिक कार्य करावे.वेळेवर सहकार्य करणाऱ्या सर्व मित्रांचे,नातेवाईकांचा मी सदैव ऋणी राहीन.एकच खंत वाटते कि हे सर्व काही झाले आणि हे बघण्यासाठी आज वडील नाहीत आजही त्यांची कमी मला खूप जाणवते.

    *मित्रहो, मनापासून कोणतेही काम केले तर यश नक्कीच मिळते.स्वतःवर विश्वास ठेवा.यशाची राईस प्लेट कधीही रेडीमेड मिळत नाही.आतून सारं झोकावं लागतं.माणसाचा सर्वांत जवळचा मित्र हा तो स्वतःच असतो. शिक्षण हे विशिष्ट वयातच झाले पाहिजे पण जीवन शिक्षण घेत गेलो.स्वप्न बघत असतांना ती जगायला शिकलो.सारं मेहनतीनं मिळवत असतांना पुन्हा वेगळे शिखर खुणावतेय.काळजातून मेहनत करीन.स्वतःला दिलेलं वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन.परीक्षेतलं यशअपयश म्हणजे जीवन साध्य नाही.खरी सुरूवात पुढेच असते.त्याच्या पलीकडे जीवन आहे.*
धन्यवाद

किशोर भावराव पाटील
पेडकाई सेल्स ॲण्ड सर्व्हीसेस,पुणे
Mob- 9673845588

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

💎 *प्रेरणा एक सुवर्णपान ब्लॉग* 💎
https://prerana1suvarnpan.blogspot.in/p/blog-page_2.html?m=0

🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣

♻ *प्रेरणा एक सुवर्णपान फेसबुक पेज*
https://m.facebook.com/preranaeksuvarnpan/

⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜

♻ *Email प्रेरणा एक सुवर्णपान*
preranaeksuvarnpan@gmail.com

♻ *whatsapp प्रेरणा एक सुवर्णपान*
भरत पाटील- 9665911657

🔮🎇🔮🎇🔮🎇🔮🎇🎇🔮🎇

*प्रेरणा एक सुवर्णपान Broadcast ला ॲड व्हायचे असल्यास 9665911657  नंबरवर whatsapp करा.दर पंधरवाड्यात दीपस्तंभ आपल्या भेटीला...स्वअनुभव रेखाटत*

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

No comments:

Post a Comment